
डावखुरा सलामीवीर शिखर धवनच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर युवा खेळांडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाने बांगलेशवर ६ गड्यांनी मात करीत कोलंबोतील प्रेमदास स्टेडियमवर खेळविण्यात येत असलेल्या निदाहास तिरंगी क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयासह आपले खाते खोलले. पहिल्या लढतीत भारताला यजमान श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
बांंगलादेशकडून मिळालेले १४० धावांचे विजयी लक्ष्य भारतीय संघाने १८.४ षट्कांत गाठले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली होती. कर्णधार रोहित शर्मा (१७) आणि युवा ऋषभ पंत (७) झटपट तंबूत परतले. रोहितला मुस्तफिझुरने तर ऋषभला रुबेल हुसेनने त्रिफळाचित केले. परंतु शिखर धवनने खेळाची सूत्रे आपल्या हाती घेत अनुभवी डावखुरा फलंदाज सुरेश रैनाच्या साथीत तिसर्या विकेसाठी ६८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करीत संघाला शंभरीच्या पार नेले. रैना २८ धावा जोडून रुबेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. धवन ५ चौकार व २ षट्कारांनिशी ५५ धावांची अर्धशतकी खेळी करून परतला. त्यानंतर मनीष पांडे (नाबाद २७) आणि दिनेश कार्तिक (नाबाद २) यांनी आणखी गडी बाद होऊ न देता भारताचा विजय साकारला. बांगादेशतर्फे रुबेल हुसेनने २ तर मुस्तफिझुर रेहमान व तस्किन अहमद यांनी प्रत्येकी १ बळी मिळविला.
तत्पूर्वी भारताच्या सूत्रबद्ध गोलंदाजीमुळे बांगलादेशला २० षट्कांत ८ गडी गमावत १३९ अशी धावसंख्या उभारता आली होती. त्यांच्या लिटन दासने सर्वाधिक ३४ तर सब्बिर रेहमानने ३० धावांचे योगदान दिले. अन्य फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. भारतातर्फे डावखुरा द्रुतगती गोलंदाज जयदेव उनाडकटने ३, विजय शंकरने २ तर शार्दुल ठाकुर व युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
धावफलक
बांगलादेश ः तमिम इक्बाल झे. जयदेव उनाडकट गो. शार्दुल ठाकुर १५, सौम्य सरकार झे. युजवेंद्र चहल गो. जयदेव उनाडकट १४, लिटन दास झे. सुरेश रैना गो. युजवेंद्र चहल ३४, मुश्फिकुर रहिम झे. दिनेश कार्तिक गो. वियज शंकर १८, महमुद्दुला झे. शार्दुल ठाकुर गो. विजय शंकर १, सब्बिर रेहमान झे. दिनेश कार्तिक गो. जयदेव उनाडकट ३०, मेहदी हसन झे. मनीष पांडे गो. जयदेव उनाडकट ३, तस्किन अहमद नाबाद ८, रुबेल हुसेन धावचित (सुरेश रैना) ०, मुस्तफिझुर रहमान नाबाद १.
अवांतर ः ११. एकूण २० षट्कांत ८ बाद १३९ धावा.
गोलंदाजी ः जयदेव उनाडकट ४/०/३८/३, वॉशिंग्टन सुंंदर ४/०/२३/०, शार्दुल ठाकुर ४/०/२५/१, युजवेंद्र चहल ४/०/१९/१, विजय शंकर ४/०/३२/२.
भारत ः रोहित शर्मा त्रिफळाचित मुस्तफिझुर रहमान १७, शिखर धवन झे. लिटन दास गो. तस्किन अहमद ५५, ऋषभ पंत त्रिफळाचित रुबेल हुसेन ७, सुरेश रैना झे. मेहदी हसन गो. रुबेल हुसेन २८, मनीष पांडे नाबाद २७, दिनेश कार्तिक नाबाद २ धावा. अवांतर ः ४. एकूण १८.४ षट्कांत ४ बाद १४० धावा. गोलंदाजी ः मुस्तफिझुर रहमान ४/०/३१/१, तस्किन अहमद ३/०/२८/१, रुबेल सरकार ३.४/०/२४/२, मेेहदी हसन ४/०/२१/०, सौम्य सरकार १/०/८/०, महमुद्दुला १/०/११/०, नझरुल इस्लाम २/०/१५/०.