टीम इंडियाची जिगरबाज झुंज

0
263
  • सुधाकर रामचंद्र नाईक

गेल्या सोमवारी सीडनी मैदानावर भारतीय संघाने ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १३१ षटके धीरोदात्त झुंज देत ५ बाद ३३४ धावा नोंदवीत ऐतिहासिक अनिर्णित मुकाबल्याची नोंद केली आणि १९७९ मधील ओव्हल मैदानावरील स्मृतींना उजाळा मिळाला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या कसोटीतील दुसर्‍या डावात भारतीय ङ्गलंदाजांनी विलक्षण, विस्मयकारी, जिगरबाज खेळीचे अमोघ दर्शन घडवीत सामना अनिर्णित राखून मालिकेतील १-१ अशी बरोबरी जारी राखली. अखेरपर्यंत रोमांचक, थरारक, उत्कंठावर्धक ठरलेल्या पाचव्या तथा अंतिम दिवशी भारताने प्रारंभास बिनधास्त, बेदरकार, जिगरबाज आणि अखेरीस कमालीचा संयत बचाव अशा सुरेख क्रिकेटचा नजराणा पेश करीत यजमानांचे विजयाचे मनसुबे उधळून लागले. टीम इंडियाच्या या जिगरबाज, धीरोदात्त कामगिरीने १९७९ मधील ओव्हल मैदानावरील स्मृतींना उजाळा मिळाला. ओव्हलवरील या कसोटीतील इंग्लंडने दिलेल्या ४३८ धावांच्या अवघड आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने १५०.५ षटके अभेद्यपणे किल्ला लढवीत ८ बाद ४२९ धावा नोंदवून सामना सन्मान्यजनकरीत्या अनिर्णित राखला होता. गेल्या सोमवारी सीडनी मैदानावर त्याचा पुनप्रर्त्यय घडविताना भारतीय संघाने ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १३१ षटके धीरोदात्त झुंज देत ५ बाद ३३४ धावा नोंदवीत ऐतिहासिक अनिर्णित मुकाबल्याची नोंद केली.

नियमित कर्णधार वीराट कोहलीची अनुपस्थिती, तसेच प्रारंभापासूनच मालिका हुकलेला अनुभवी द्रूतगती ईशांत शर्मा, ऍडिलेड कसोटीत जायबंदी ठरलेला द्रुतगती मोहम्मद शामी, मेलबर्न कसोटीत ‘हॅमस्ट्रिंग इंज्युरी’मुळे संघाबाहेर गेलेला द्रुतगती उमेश यादव आदी प्रतिकूलतेत आणखी भर म्हणजे तिसर्‍या कसोटीत अष्टपैलू जडेजाच्या अंगठ्याला झालेली गंभीर इजा तसेच मैदानात उतरल्यावर हनुमा विहारीला उद्भवलेली स्नायुदुखी अशा अडचणींच्या पर्वतावर भारतीय संघाने जिगरबाजपणे मात करीत तिसरी कसोटी निश्‍चयी, निग्रही झुंजीत अनिर्णित राखीत कांगारूचे मालिका आघाडीचे स्वप्न भंगविले.

सीडनी मैदानावरील या तिसर्‍या कसोटीत नाणेङ्गेकीच्या अनुकूल कौलानंतर प्रथम ङ्गलंदाजी स्वीकारलेल्या ऑसिसने माजी कर्णधार स्टीव स्मिथच्या शतकाच्या बळावर पहिल्या डावात ३३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव २४४ वर आटोपला. पहिल्या डावातील ९४ धावांच्या आघाडीसह यजमानांनी दुसरा डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषित करीत पाहुण्यांपुढे ४०७ धावांचे तगडे आव्हान खडे केले. रोहित शर्मा (५२) आणि शुभमन गिल (३१) यांनी भारताला आश्‍वासक प्रारंभ करून देताना अर्धशतकी सलामी दिली, पण मोठी भागी रचण्यात त्यांना यश आले नाही आणि भारताची चौथ्या दिवसाअखेर २ बाद ९८ अशी स्थिती बनली. पाचव्या व अंतिम दिवशी भारताला विजयासाठी आणखी ३०९ धावांची गरज होती तर ऑसिसला आठ विकेटस्‌ची गरज होती. दुसर्‍या कसोटीतील सामनावीर, कर्णधार अजिंक्य रहाणे (४) स्वस्तात बाद झाला, पण नंतर आलेल्या ऋषभ पंतने सामन्यात जान आणताना ज्येष्ठ साथी चेतेश्‍वर पुजाराच्या सहयोगात शतकी भागी नोंदवीत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. दुखापतग्रस्त पंतने चेतेश्‍वरला सुरेख साथ देताना प्रारंभास सावध खेळी केली, पण एकदा नजर स्थिरावल्यावर आपल्या नैसर्गिक आक्रमकतेचे दर्शन घडविले. ऋषभ आणि चेतेश्‍वरला साधलेली लय पाहून भारतीय संघ १९७६ मधील वेस्ट इंडिजविरुद्धच्या संस्मरणीय विजयाची पुनरावृत्ती घडविणार अशा आशा जागल्या होत्या. पोर्ट ऑङ्ग स्पेनमधील कसोटीत ‘लिटल मास्टर’ सुनिल गावस्करच्या २२१ धावांच्या बळावर भारतीय संघाने चौथ्या डावात ४ बाद ४०६ धावा नोंदवीत ऐतिहासिक विजय नोंदवला होता. ऋषभचा आक्रमक धडाका आणि चेतेश्‍वरची नजाकतदार ङ्गटकेबाजी पाहता सीडनीतही इतिहासाची पुनरावृत्ती घडणार असे सुरेख स्वप्न भारतीय क्रिकेटशौकिनांच्या मनात जागले होते. पण शतकासमीप ठेपलेला ऋषभ पंत जोखीमपूर्ण ङ्गटक्याच्या नादात बाद झाला. बिकट परिस्थितीतही आक्रमक झुंजीचा अनोखा नजराणा घडविलेल्या पंतने ११८ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांसह ९७ धावा चोपल्या. मालिकेत दुसरे अर्धशतक नोंदलेला अनुभवी चेतेश्‍वरही (२०५ चेंडूत ७७ धावा) दुसरे अर्धशतक झळकवून त्रिङ्गळाचित झाला. प्रमुख ङ्गलंदाज तंबूत परतल्याने भारतापुढे पुन्हा बिकट आव्हान उभे राहिले. पण स्नायुदुखीमुळे ‘रनिंग बिटवीन दी विकेट’मध्ये असमर्थ ठरलेला हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्‍विन जोडीने परिस्थितीचे गांभीर्य जाणून विलक्षण संयमी खेळीत कांगारूंच्या बेङ्गाम गोलंदाजीचा धीरोदात्तपणे मुकाबला करीत जिगरबाजपणे खिंड लढवीत आणखी पडझड होऊ दिली नाही. पुढील ङ्गलंदाज रविंद्र जडेजाच्या बोटाला झालेली गंभीर दुखापत ध्यानात ठेवीत विहारी-अश्‍विन या ‘संकटमोचक’ जोडीने किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशही मिळवीत कांगारूंचे मनसुबे उधळविले. ऑस्ट्रेलियन द्रूतगती गोलंदाजांनी केलेल्या आखुडटप्पी गोलंदाजीचा सामना करीत दिवसअखेरची चाळीसहून अधिक षटके खेळून काढण्याची मोहीम या ‘संकटमोचक’ जोडगोळीने यशस्वीपणे हाताळली. कमिन्स, हेझलवूड या द्रूतगती गोलंदाजांनी ‘बाउन्सर्स’चा सर्रास अवलंब केला आणि त्यात अश्‍विनला दंड, खांदा, छाती आणि पोटावरही प्रहार झेलावे लागले. बचावाच्या प्रयत्नातील अश्‍विनला एकदा ‘कॉट बिहाईंड’ही देण्यात आले, पण ‘टीव्ही रिप्ले’मध्ये बॅट वा ग्लोव्हजला चेंडूचा स्पर्श झाला नसल्याचे स्पष्ट झाले. हनुमाच्या स्नायुदुखीमुळे ‘रनिंग बिटवीन विकेट’ही अवघड ठरले होते. उभय ङ्गलंदाज बव्हंशी बचावच करत असल्याने ऑसिसने ङ्गलंदाजाच्या आसपास तब्बल पाच क्षेत्ररक्षकांचे कडे लावून दबाव आणण्याचा प्रयत्नही केला, पण बिहारी-अश्‍विनची ‘संकटमोचक’ खेळी भेदण्यात कांगारूना यश आले नाही आणि अखेर एक षटक बाकी असताना ऑसिस कप्तान टीम पेनने सामना अनिर्णिततेला सहमती दर्शविली. हनुमा-अश्‍विनचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी कांगारूंनी आपल्या सर्व अस्त्रांचा अवलंब केला. अखेरीस हॅझलवूड आणि नॅथन लॉयन यांच्या ङ्गिरकीची जादूही विहारी-अश्‍विनला विशेष अडचणीत आणू शकली नाही. हनुमा आणि अश्‍विनने ४२.२ षटके अभेद्यपणे खिंड लढवताना २५८ चेंडूंचा सामना करीत ६२ धावा जमवल्या. तिसर्‍या कसोटीत बव्हंशी कांगारूंचे वर्चस्व दिसून आले, पण चौथा डाव मात्र निश्‍चितच भारताच्या ‘जखमी वाघां’चा ठरला. चौथ्या डावात भारतातर्ङ्गे रोहित शर्मा (९८ चेंडू), शुभमन गिल (६४ चेंडू) या सलामीवीरद्वयीने पन्नासहून अधिक तर चेतेश्‍वर पुजारा (२०५ चेंडू), ऋषभ पंत (११८ चेंडू), हनुमा विचारी (१६१ चेंडू) आणि रचिवंद्रन अश्‍विन (१३९ चेंडू) या चार ङ्गलंदाजांनी शंभरहून अधिक चेंडूंचा सामना करीत ६२ धावांची अविभक्त भागी केली. विहारीने १६१ चेंडूत नाबाद २३ तर अश्‍विनने १२८ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. जागतिक दर्जाच्या ऑसिस गोलंदाजीला नामोहरम बनविले. ऑस्ट्रेलियाने सोडलेले चार झेलही महागात पडले. कर्णधार तथा यष्टिरक्षक टीम पेन याने ऋषभ पंतचे दोन आणि हनुमा विहारीचा एक तर राखीव क्षेत्ररक्षक ऍबोटने अश्‍विनचा झेल सोडला. भारताच्या ‘जखमी वाघां’ची ही कामगिरी निश्‍चितच ऐतिहासिक असून हा संवेग जारी राखीत अंतिम कसोटी जिंकून ‘अजिंक्य’ कामगिरीसह दौर्‍याची सांगता करील, या शुभेच्छा!
भारताची चौथ्या डावातील सर्वाधिक षटकांची दर्जेदार कामगिरी
षटके प्रतिस्पर्धी सामना स्थळ वर्ष
१५०.५ वि. इंग्लंड ओव्हल १९७९
१३६.० वि. वेस्ट इंडीज कोलकाता १९४८-४९
१३२.० वि. वेस्ट इंडीज मुंबई १९५८-५९.
१३१.० वि. पाकिस्तान दिल्ली १९७९-८०
१३१.० वि. ऑस्ट्रेलिया सीडनी २०२०-२१.