टीम इंडियाची ‘कसोटी’ उद्यापासून

0
120

>> यजमान न्यूझीलंडविरुद्ध लागणार कस

>> इशांतला खेळविण्याचे कोहलीचे संकेत

क्रिकेटच्या सर्वांत लोकप्रिय टी-ट्वेंटी प्रकारात यजमान न्यूझीलंडचा टीम इंडियाने ५-० असा व्हाईटवॉश केला होता. तर यजमानांनी याचा वचपा काढताना एकदिवसीय मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले होते. त्यामुळे कसोटी मालिका या दोन्ही मालिकांप्रमाणेच एकतर्फी होते की तुल्यबळ झुंज पहायला मिळते याचे संकेत मालिका सुरु होताच मिळणे अपेक्षित आहे.

भारतीय संघाचा विचार केल्यास सर्वप्रथम सलामी जोडीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मायदेशात खोर्‍याने धावा जमवलेल्या मयंक अगरवाल याने सराव लढतीच्या दुसर्‍या डावात परिपक्वता दाखवून पहिल्या कसोटीसाठी आपली जागा जवळपास पक्की केली आहे. त्याचा जोडीदार पृथ्वी शॉ याच्या वाट्याला मात्र दोन्ही डावात अपयश आले आहे. पर्यायी सलामीवीर शुभमन गिल याचे तंत्र तर सराव सामन्यात पुरते उघडे पडले. या तिघांव्यतिरिक्त हनुमा विहारीच्या रुपात सलामीवीराचा अजून एक पर्याय टीम इंडियाकडे आहे. या तिघांपेक्षा अधिक सक्षम तंत्र विहारीकडे आहे. सराव लढतींत स्विंग होणार्‍या चेंडूचा नेटाने सामना करताना त्याने प्रभावदेखील पाडला होता. तिसर्‍या स्थानावर चेतेश्‍वर पुजारा, चौथ्या स्थानावर कर्णधार विराट कोहली व पाचव्या स्थानावर उपकर्णधार अजिंक्य रहाणे फलंदाजी करणे अपेक्षित आहे. केवळ यष्टिरक्षणाचा विचार केल्यास सहाव्या स्थानासाठी वृध्दिमान साहा ऋषभ पंतपेक्षा नक्कीच उजवा ठरतो. एखादा सोडलेला झेल किंवा यष्टिचीत, धावचीत करण्याची गमावलेली संधी संघाच्या पराभवाचे कारण ठरू शकते. त्यामुळे सराव लढतीत वेगाने धावा जमवलेल्या पंतपेक्षा साहा पहिली पसंती असू शकते. आता पाच गोलंदाज घेऊन खेळावे की सात-चार अशा रणनीतीसह उतरावे याचा निर्णय सर्वस्वी कोहलीला घ्यावा लागणार आहे. केवळ चार गोलंदाजांचा निर्णय झाल्यास रविचंद्रन अश्‍विनच्या रुपात एकमेव फिरकीपटू व जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी ही चौकडी खेळणे अपेक्षित आहे. पाच खेळविल्यास उमेश यादव व नवदीप सैनी यांच्यात चुरस असेल. अतिरिक्त फलंदाजाचा पर्याय निवडल्यास हनुमा विहारीला संधी मिळणे अपेक्षित आहे. २०१४च्या दौर्‍यात वेलिंग्टन कसोटीत अजिंक्य रहाणेने ११८ धावांची दमदार खेळी केली होती. त्यामुळे या मैदानाच्या रम्य आठवणी त्याच्याकडे जमा आहेत. कर्णधार विराट कोहलीनेदेखील या मैदानावर शतकी वेस ओलांडली आहे.

टीम इंडियाच्या तुलनेत न्यूझीलंडचा संघ स्थिर आहे. गोलंदाजी विभागातील त्यांचा आक्रमक पर्याय असलेल्या नील वॅगनर याची पत्नी गर्भवती असल्यामुळे वॅगनर ऐनवेळी अनुपलब्ध असल्यास
पहिल्या कसोटीसाठी मॅट हेन्री याची ‘बॅकअप’म्हणून निवड करण्यात आली आहे. पण, वॅगनर खेळू शकला नाही तर वनडे मालिकेत चमक दाखवलेला काईल जेमिसन ‘अंतिम ११’मध्ये त्याची जागा घेऊ शकतो. ऐजाझ पटेलच्या रुपात आक्रमक फिरकीपटूचा संघात समावेश करून न्यूझीलंडने आपल्या व्यूहरचनेचे संकेत यापूर्वीच दिले आहे.

केवळ धावा रोखण्याचे काम करणार्‍या मिचेल सेंटनरला बाहेर बसवून त्यांनी भारतीय वंशाच्या पटेलला संधी दिली आहे. बोल्ट, साऊथी, वॅगनर, पटेलच्या रुपात फिरकी गोलंदाज व कॉलिन डी ग्रँडहोमच्या उपयुक्त मध्यमगती मार्‍यावर न्यूझीलंडचा संघ अवलंबून असेल.