>> बांगलादेशचा केला १८ धावांनी पराभव
युवा सलीमीवीर शफाली वर्माच्या झंझावाती ३९ धावा व लेगस्पिनर पूनम यादवच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने काल सोमवारी महिला टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतील आपला सलग दुसरा विजय नोंदविताना बांगलादेशचा १८ धावांनी पराभव केला. भारताने विजयासाठी ठेवलेल्या १४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश संघाला केवळ ८ बाद १२४ धावांपर्यंतच मजल मारता आली.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारल्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. आजारी असलेल्या स्मृती मंधाना हिच्या जागी यष्टिरक्षक फलंदाज तानिया भाटियाने शफालीसह भारतीय डावाची सुुरुवात केली. सलमाच्या गोलंदाजीवर पुढे सरसावत खेळण्याच्या नादात तानिया बाद झाली. शफालीने ‘सेहवाग’ शैलीत फटकेबाजी करताना विशेषकरून त्यांची प्रमुख जलदगती गोलंदाज जहानारा आलमला लक्ष्य केले. केवळ १७ चेंडूंचा सामना करताना तब्बल ४ षटकार व २ चौकारांसह तिने ३९ धावा कुटत मोठ्या धावसंख्येसाठी तिने पाया रचला. मधल्या फळीतील फलंदाजांना मात्र यावर कळस रचणे शक्य झाले नाही. ३४ धावांसाठी जेमिमा रॉड्रिगीसने ३७ चेंडूंचा सामना केला. हरमनप्रीत, दीप्ती व रिचा यांनादेखील फारसा प्रभाव पाडता आला नाही. वेदा कृष्णमूर्तीने केवळ ११ चेंडूंत नाबाद २० धावा जमवत संघाला १४२ धावांपर्यंत मजल मारून दिली. धावांचा पाठलाग करताना मुर्शिदा खातून, निगार सुलताना फहिमा खातून यांनी उपयुक्त धावा केल्या. परंतु, दुसर्या गड्यासाठी झालेली ४१ धावांच्या भागीदारीचा अपवाद वगळता त्यांना दुसरी मोठी भागीदारी रचण्यात अपयश आले. ठराविक अंतराने त्यांचे गडी बाद होत राहिले. पूनम व शिखा यांनी धावा आटवतानाच मोक्याच्या क्षणी बळी घेत बांगलादेशचा संघ विजयापासून दूर राहणार याची दक्षता घेतली.
धावफलक
भारत ः तानिया भाटिया यष्टिचीत निगार गो. सलमा २, शफाली वर्मा झे. शमिमा गो. पन्ना ३९ (१७ चेंडू, २ चौकार, ४ षटकार), जेमिमा रॉड्रिगीस धावबाद ३४ (३७ चेंडू, २ चौकार, १ षटकार), हरमनप्रीत कौर झे. रुमाना गो. पन्ना ८, दीप्ती शर्मा धावबाद ११, रिचा घोष झे. नाहिदा गो. सलमा १४, वेदा कृष्णमूर्ती नाबाद २० (११ चेंडू, ४ चौकार), शिखा पांडे नाबाद ७, अवांतर ७, एकूण २० षटकांत ६ बाद १४२
गोलंदाजी ः जहानारा आलम ४-०-३३-०, सलमा खातून ४-०-२५-२, नाहिदा अख्तर ४-०-३४-०, पन्ना घोष ४-०-२५-२, रुमाना अहमद २-०-८-०, फहिमा खातून २-०-१६-०
बांगलादेश ः शमिमा सुलताना झे. शर्मा गो. पांडे ३, मुर्शिदा खातून झे. घोष गो. रेड्डी ३० (२६ चेंडू, ४ चौकार), संजिदा इस्लाम झे. भाटिया गो. पूनम १०, निगार सुलताना झे. रेड्डी गो, गायकवाड ३५ (२६ चेंडू, ५ चौकार), फरगाना हक झे. भाटिया गो. रेड्डी ०, फहिमा खातून झे. शफाली गो. पूनम १७ (१३ चेंडू, २ चौकार), रुमाना अहमद त्रि. गो. पांडे १३ (८ चेंडू, २ चौकार), सलमा खातून नाबाद २, नाहिदा अख्तर नाबाद २, अवांतर २, एकूण २० षटकांत ८ बाद १२४
गोलंदाजी ः दीप्ती शर्मा ४-०-३२-०, शिखा पांडे ४-०-१४-२, राजेश्वरी गायकवाड ४-०-२५-१, अरुंधती रेड्डी ४-०-३३-२, पूनम यादव ४-०-१८-३
श्रीलंकेने पुन्हा संधी दवडली
ऑस्ट्रेलियाला नमविण्याची मिळालेली सुवर्णसंधी श्रीलंकेने काल दवडली. त्यामुळे टी-ट्वेंटी विश्वचषकात सलग दुसरा पराभव लंकेला पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ६ बाद १२२ अशी सन्मानजनक मजल मारली. कर्णधार चामरी अटापटूने ३८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५० धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेने ३ बाद १० अशी केविलवाणी स्थिती केली होती. मेग लेनिंग (४१) व राचेल हेन्स (६०) यांच्या भागीदारीमुळे श्रीलंकेचा पराभव झाला. श्रीलंकेच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे कांगारूंचा विजय सुकर झाला. १९.३ षटकांत ५ गडी गमावून ऑस्ट्रेलियाने विजय संपादन केला.