टीम इंडियाचा श्रीलंकेवर मालिका विजय

0
114

>> तिसरा टी-ट्वेंटी सामना ७८ धावांनी जिंकला

>> शार्दुल सामनावीर तर सैनी मालिकावीर

शार्दुल ठाकूर याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने तिसर्‍या व शेवटच्या टी-ट्वेंटी सामन्यात श्रीलंकेचा ७८ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. पावसामुळे मालिकेतील पहिला सामना रद्द करावा लागला होता. भारताने विजयासाठी दिलेल्या २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव १५.५ षटकांत १२३ धावांत कोलमडला.

श्रीलंकेचा कर्णधार मलिंगाने दवाचा होणारा परिणाम लक्षात घेता नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लंकेच्या गोलंदाजांना मात्र कर्णधाराचा हा विश्‍वास सार्थ ठरवता आला नाही. राहुल व धवन यांनी ९७ धावांची सलामी देत मोठ्या धावसंख्येसाठी मजबूत पाया रचला. धवन पहिल्या गड्याच्या रुपात परतल्यानंतर नवोदित मधली फळी साफ कोलमडली. त्यामुळे बिनबाद ९७ वरून भारताची ४ बाद १२२ अशी घसरगुंडी उडाली. सहाव्या स्थानावर फलंदाजीस उतरलेल्या कर्णधार कोहलीने मनीष पांडेसह पाचव्या गड्यासाठी ४२ धावांची भागीदारी रचली. चोरटी धाव घेण्याच्या नादात विराट धावबाद झाला. वॉशिंग्टन सुंदर पहिल्याच चेंडूवर परतल्याने भारतीय संघ ६ बाद १६४ असा संकटात सापडला. शार्दुलने यानंतर लंकेला इंगा दाखवताना चौफेर फटकेबाजी करत केवळ ८ चेंडूंत नाबाद २२ धावा जमवल्या. १८ चेंडूंत ३१ धावा करून मनीष पांडे नाबाद राहिला. श्रीलंकेकडून चायनामन गोलंदाज संदाकन याने सर्वाधिक ३ गडी बाद केले.

विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना लंकेची सुरुवात डळमळीत झाली. पॉवरप्ले संपेपर्यंत त्यांचे चार गडी तंबूत परतले होते. मॅथ्यूज याने धनंजय डीसिल्वाच्या साथीने पाचव्या गड्यासाठी ६८ धावांची भागीदारी केली. सुंदरने ही जोडी फोडल्यानंतर लंकेच्या शेपटाने फार प्रतिकार केला नाही. धनंजय डीसिल्वा (५७) वगळता इतरांनी निराशा केली. भारताकडून सुंदर व शार्दुलने प्रत्येकी २, नवदीपने ३ तर बुमराहने १ गडी बाद केला. शार्दुल सामनावीर तर सैनी मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

धावफलक
भारत ः लोकेश राहुल यष्टिचीत परेरा गो. संदाकन ५४ (३६ चेंडू, ५ चौकार, १ षटकार), शिखर धवन झे. गुणथिलका गो. संदाकन ५२ (३६ चेंडू, ७ चौकार, १ षटकार), संजू सॅमसन पायचीत गो. हसारंगा ६, मनीष पांडे नाबाद ३१ (१८ चेंडू, ४ चौकार), श्रेयस अय्यर झे. व गो. संदाकन ४, विराट कोहली धावबाद २६, वॉशिंग्टन सुंदर झे. संदाकन गो. कुमारा ०, शार्दुल ठाकूर नाबाद २२ (८ चेंडू, १ चौकार, २ षटकार), अवांतर ६, एकूण २० षटकांत ६ बाद २०१
गोलंदाजी ः लसिथ मलिंगा ४-०-४०-०, अँजेलो मॅथ्यूज ३-०-३८-०, धनंजय डीसिल्वा १-०-१३-०, लाहिरु कुमारा ४-०-४६-१, वानिंदू हसारंगा ४-०-२७-१, लक्षन संदाकन ४-०-३५-३
श्रीलंका ः दनुष्का गुणथिलका झे. सुंदर गो. बुमराह १, अविष्का फर्नांडो झे. अय्यर गो. ठाकूर ९, कुशल परेरा त्रि. गो. सैनी ७, ओशादा फर्नांडो धावबाद २, अँजेलो मॅथ्यूज झे. पांडे गो. सुंदर ३१, धनंजय डीसिल्वा झे. बुमराह गो. सैनी ५७, दासुन शनका झे. व गो. ठाकूर ९, वानिंदू हसारंगा धावबाद ०, लक्षन संदाकन यष्टिचीत सॅमसन गो. सुंदर १, लसिथ मलिंगा झे. कोहली गो. सैनी ०, लाहिरु कुमारा नाबाद १, अवांतर ५, एकूण १५.५ षटकांत सर्वबाद १२३
गोलंदाजी ः जसप्रीत बुमराह २-१-५-१, शार्दुल ठाकूर ३-०-१९-२, नवदीप सैनी ३.५-०-२८-३, वॉशिंग्टन सुंदर ४-०-३७-२, युजवेंद्र चहल ३-०-३३-०