यजमान न्यूझीलंडने दुसरा कसोटी सामना ७ गडी राखून जिंकत दोन सामन्यांच्या मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केले. एकदिवसीय मालिकेत सपाटून मार खावा लागल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंड दौर्यात सलग दुसर्या ‘व्हाईटवॉश’चा सामना करावा लागला. भारताने विजयासाठी दिलेले १३२ धावांचे आव्हान न्यूझीलंडने ३ गडी गमावून पूर्ण करत तिसर्याच दिवशी सामना खिशात घातला. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचा हा दुसरा पराभव ठरला. मालिका जिंकलेल्या न्यूझीलंडने १२० गुण आपल्या खात्यात जमा केले.
दुसर्या दिवशीच्या ६ बाद ९० धावांवरून काल पुढे खेळताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. हनुमा विहारी साऊथीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर ऋषभ पंतने खेळपट्टीवर राहण्याची तसदी घेतली नाही. मोहम्मद शमीदेखील फार योगदान देऊ शकला नाही. रवींद्र जडेजाने फटकेबाजी करत भारताला शतकी आघाडी मिळवून दिली. बोल्टच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बुमराह धावबाद झाला आणि भारताचा दुसरा डाव १२४ धावांमध्ये आटोपला. न्यूझीलंडकडून दुसर्या डावात बोल्टने ४, साऊथीने ३ तर ग्रँडहोम आणि वॅगनर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
विजयासाठीच्या १३२ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने पहिल्या सत्रात बिनबाद ४६ धावांपर्यंत मजल मारली. उपहाराच्या सत्रानंतरही खेळपट्टीवर जम बसवलेल्या लेथम आणि ब्लंडल जोडीने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत धावफलक हलता ठेवला. यादरम्यान लेथमने आपले १८वे अर्धशतक साजरे करताना ५२ धावा केल्या.
पहिल्या डावातही त्याने नेमक्या ५२ धावाच केल्या होत्या. संघाची धावसंख्या १०३ धावांवर उमेश यादवने लेथमला यष्टीरक्षक पंतकरवी झेलबाद केले. यानंतर जसप्रीत बुमराहने बाऊंसर चेंडू टाकत कर्णधार विल्यमसनला आपल्या जाळ्यात अडकवले. यानंतर टॉम ब्लंडलने आपले पहिलेच कसोटी अर्धशतक झळकावत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडले, मात्र वैयक्तिक ५५ धावांवर खेळत असताना जसप्रीत बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर अनुभवी रॉस टेलर आणि हेन्री निकोल्स यांनी किवींच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. भारताकडून बुमराहने २ तर उमेश यादवने १ बळी घेतला.