टीम इंडियाचा विजयी चौकार

0
122
विजयानंतर भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे अभिनंदन करताना वेस्ट इंडीज खेळाडू. सोबत रवीचंद्रन आश्वीन.

कर्णधार महेंद्र सिंह धोनीने लय साधताना ठोकलेल्या नाबाद ४५ धावांवर भारताने काल आयसीसी विश्‍व चषक ‘ब’ गटात वेस्ट इंडीजवर ४ गडी राखून संघर्षमय विजय मिळविला. टीम इंडियाने या सलग चौथ्या विजयासह उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.भारतीय गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजीत वेस्ट इंडीजला १८२ धावात उखडले, पण वाका मैदानाच्या वेगवान व उसळत्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनाही कडवा संघर्ष करावा लागला. भारताचा अर्धा संघ १०७ धावांवर तंबूत परतला होता; पण धोनीने (५६ चेंडूत ३ चौकार आणि एका षट्‌कारासह नाबाद ४५) कर्णधारपदास साजेशा खेळीत रविचंद्रन अश्‍विनच्या साथीत (नाबाद १६) भारताला विजय मिळवून दिला. १८३ धावांच्या उद्दिष्टाच्या पाठलागातील भारताचे सलामीवीरद्वय शिखर धवन (९) आणि रोहित शर्मा (७) स्वस्तात बाद झाले. बहरातील वीराट कोहली (३३) आणि अजिंक्य रहाणेने (१४) तिसर्‍या यष्टिसाठी डाव सावरण्याचा प्रयत्न केला; पण ही जोडी फुटली आणि भारतावर दडपण आले. अष्टपैलू रवींद्र जडेजाही (१३) विशेष टिकाव धरू शकला नाही आणि दडपण वाढले. मात्र, धोनीने संयत खेळीत अश्‍विनच्या साथीत अविभक्त अर्धीशतकी भागी नोंदवित तब्बल ६५ चेंडू राखीत भारताचा विजय झळकविला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीत वेस्ट इंडीजचा डाव १८२ धावांवर आटोपला. या सामन्यात सर्वांचे लक्ष होते ते विस्ङ्गोटक ङ्गलंदाज ख्रिस गेलकडे. धुवॉंधार फटकेबाजी स्टेडियमवर कॅरेबियन वादळ निर्माण करण्याची ताकद असलेल्या ख्रिस गेलचा धोका जाणून कॅप्टन कूल धोनीने योग्य डावपेच आखताना ख्रिस गेल यष्टिवर असेपर्यंत पहिली दहा षटके मोहम्मद शमी आणि उमेश यादव या मुख्य तेज गोलंदाजांकडून करवून घेतली. पहिल्या चार षटकांत अचूक टप्प्यात गोलंदाजी करून मोहम्मद शमी आणि उमेश यादवने गेलला मोठा ङ्गटका मारण्याची संधीच दिली नाही. धावसंख्येला आळा बसल्याने गेलवर दडपण वाढले. त्यातच दुसर्‍या बाजूला सलामीवीर स्मिथ यष्टिमागे झेलबाद आणि मर्लोन सॅम्युअल्सदेखील धावचित झाल्याने त्याचे संतुलन बिघडले. दोन जीवदानांचाही तो लाभ उठवू शकला नाही. उमेश यादव आणि शमी गेलचा अवघड झेल टिपण्यात असफल ठरले; पण शमीच्या गोलंदाजीवर मोहित शर्माने यावेळी कोणतीही गल्लत न करता झेल घेत गेलला तंबूत धाडले.
वाकाच्या उसळत्या खेळपट्टीवर विंडीजची २५व्या षट्‌कात ७ बाद ८५ अशी बिकट स्थिती बनली होती. पण कर्णधार जेसन होल्डरच्या झुंजार ५२ धावा आणि त्याने नवव्या यष्टिसाठी जेरोम टेलरच्यासाथीत (११) केलेल्या ५१ धावांच्या भागीमुळेच विंडीजला १८२ धावांचा टप्पा गाठता आला. भारतातर्फे मोहंम्मद शामीने ३/३५ तर त्याला उत्तम साथ देताना उमेश यादवने ४२ धावात २, मोहित शर्माने ३५ धावात १, रवींद्र जडेजाने २७ धावांत २ तर रविचंद्रन अश्‍विनने ३८ धावात १ बळी घेतला.
धोनीने मोडला गांगुलीचा विक्रम
भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने काल विडिंजविरुद्धचा सामना जिंकत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विदेशात ५८ सामने जिंकण्याचा विक्रम मोडला. धोनीने ११२ एकदिवसीय सामने खेळत ५९ तर गांगुलीने ११० सामन्यात ५८ वेळा भारताला विजय मिळवून दिला आहे. या क्रमवारीत कपिलदेव यांनी ४२ सामन्यांत २१, राहुल द्रविडने ४३ सामन्यात २१ आणि महम्मद अझरुद्दीन याने ११६ सामन्यांत ५० विजय प्राप्त करून दिले आहेत.