>> ७ गडी व १५ चेंडू राखून केला पराभव
टीम इंडियाने दुसर्या टी-ट्वेंटी सामन्यात श्रीलंकेचा ७ गडी व १५ चेंडू राखून पराभव करत २०२० वर्षाची सुरुवात धमाकेदार विजयाने केले. मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर उभय संघांसाठी दुसरा सामना महत्त्वाचा होता. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेले १४३ धावांचे माफक लक्ष्य भारताने केवळ १७.१ षटकांत गाठताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ताशी १४५ किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने सातत्यानने गोलंदाजी करत दोन बळी घेतलेला नवदीप सैनी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने प्रथम गोलंदाजी निवडली. लंकेच्या सलामीवीरांनी डावाची सुरुवात आश्वासक केली होती. अविष्का फर्नांडो आणि दनुष्का गुणतिलका यांनी पहिल्या गड्यासाठी ३८ धावांची भागीदारी केली. सुंदरला पुढे सरसावत खेळण्याच्या नादात अविष्का बाद झाला व भारताला पहिले यश मिळाले. ताशी १४७.५ किलोमीटर वेगाने टाकलेल्या सैनीच्या यॉर्करवर गुणथिलका याला आपली यष्टी गमवावी लागली. यानंतर लंकेचे एक-एक फलंदाज माघारी परतत राहिले. कुशल परेराने भारतीय गोलंदाजांचा सामना करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. त्याने २८ चेंडूत ३ षटकारांसह ३४ धावा केल्या. मात्र कुलदीप यादवने त्याला बाद केल्यानंतर लंकेचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. बुमराहने टाकलेल्या डावातील शेवटच्या षटकातील अखेरच्या तीन चेंडूंवर हसारंगा याने सलग तीन चौकार लगावत लंकेला १४०चा टप्पा ओलांडून दिला. भारताकडून शार्दुल ठाकूरने ३, नवदीप सैनी व कुलदीप यादवने प्रत्येकी २ तर जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या १४३ धावांचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. धवन व राहुलमध्ये धावा जमवण्यासाठी चढाओढ दिसून आली. हसारंगाच्या ‘गुगली’वर राहुल चकला व भारताला पहिला धक्का बसला. विराटने तिसर्या स्थानावर स्वतः न उतरता श्रेयसला पाठवले. शिखर धवन बाद झाल्यानंतर विराट फलंदाजीस आला. कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी फटकेबाजी करत भारताला विजयाच्या जवळ आणून ठेवलं. विजयासाठी ६ धावांची गरज असताना श्रेयस अय्यर माघारी परतला. यानंतर विराटने ऋषभ पंतच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. क्षेत्ररक्षण करताना गुडघ्यावर पडल्यामुळे प्रमुख गोलंदाज इसुरु उदाना याने गोलंदाजी केली नाही.
धावफलक
श्रीलंका ः दनुष्का गुणथिलका त्रि. गो. सैनी २०, अविष्का फर्नांडो झे. सैनी गो. सुंदर २२, कुशल परेरा झे. धवन गो. कुलदीप ३४, ओशादा फर्नांडो यष्टिचीत पंत गो. कुलदीप १०, भनुका राजपक्षा झे. पंत गो. सैनी ९, दासुन शनका त्रि. गो. बुमराह ७, धनंजय डीसिल्वा झे. दुबे गो. ठाकूर १७, वानिंदू हसारंगा नाबाद १६, इसुरु उदाना झे. सैनी गो. ठाकूर १, लसिथ मलिंगा झे. कुलदीप गो. ठाकूर ०, लाहिरु कुमारा नाबाद ०, अवांतर ६, एकूण २० षटकांत ९ बाद १४२
गोलंदाजी ः जसप्रीत बुमराह ४-०-३२-१, शार्दुल ठाकूर ४-०-२३-३, नवदीप सैनी ४-०-१८-२, वॉशिंग्टन सुंदर ४-०-२९-१, कुलदीप यादव ४-०-३८-२
भारत ः लोकेश राहुल त्रि. गो. हसारंगा ४५, शिखर धवन पायचीत गो. हसारंगा ३२, श्रेयस अय्यर झे. शनका गो. कुमारा ३४, विराट कोहली नाबाद ३०, ऋषभ पंत नाबाद १, अवांतर २, एकूण १७.१ षटकांत ३ बाद १४४
गोलंदाजी ः लसिथ मलिंगा ४-०-४१-०, लाहिरु कुमारा ३.३-०-३०-१, धनंजय डीसिल्वा २-०-१५-०, दासुन शनका ४-०-२६-०, वानिंदू हसारंगा ४-०-३०-२