त्रिनबागो नाइटरायर्ड (टीकेआर) आणि सेंट ल्युसिया झूक्स संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेत काल शानदार विजयांची नोंद केली.
काल खेळविण्यात आलेल्या स्पर्धेतील ९व्या लढतीत कीरॉन पोलार्ड, कोलिन मुन्रो आणि डॅरेन ब्राव्होच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर त्रिनबागो नाइटरायडर्सने बार्बाडोस ट्रायडंटस्वर १९ धावांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना टीकेआरने ३ गडी गमावत १८५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. लेंडल सिमेन्स (२१) व सुनील नारायण (८) हे दोघे सलामीवर झटपट तंबूत परतले. परंतु डॅरेन ब्राव्हो (४ चौकार व ४ षट्कारांसह ३६ चेंडूत नाबाद ५४) व कोलिन मुन्रो (७ चौकार व २ षटकारांसह ३० चेंडूत ५०) यांनी आकर्षक अर्धशतके नोंदवीत संघाचा डाव सावरला.
मुन्रो माघारी परतल्यानंतर कर्णधार कीरॉन पोलार्डने ब्राव्होच्या साथीत चौथ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी करीत प्रतिस्पर्ध्यांसमोर १८६ धावांचे लक्ष्य ठेवले. पोलार्डने विस्फोटक खेळी करताना १ चौकार व ४ षटकारांसह १७ चेंडूत ४१ धावा कुटल्या. बार्बाडोस ट्रायडंटस्कडून जेसन होल्डर, ऍश्ले नर्से व रेमोन रिफर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात खेळताना बार्बाडोस ट्रायडंटस् संघाला ६ गड्यांच्या मोबदल्यात १६६ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यांच्या जॉनसन चार्ल्स (४ चौकार व ३ षटकारांसह ३३ चेंडूत ५२), शाय होप (३६), कर्णधार जेसन होल्डर (नाबाद ३४) आणि ऍश्ले नर्से (२१) यांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु ते अपुरे ठरले. टीकेआरकडून अली खान, खारी पिएरे, जायडन सीएल्स, सुनील नारायण आणि फवाद अहमद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. कोलिन मुन्रोची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली.
दरम्यान, स्पर्धेतील १०व्या सामन्यात सेंट ल्युसिया झूक्सने गयाना एमेझॉन वॉरियर्स संघावर १० धावांनी मात करीत आपला सलग दुसरा विजय नोंदविला. प्रथम फलंदाजी करताना झोक्सने ७ गडी गमावत १४४ अशी धावसंख्या उभारली. रॉस्टन चेसने ५ चौकार व २ षटकारांसह ५१ चेंेडूत ६६ तर मोहम्मद नाबीने २७ व जावेल ग्लेनने १९ धावांचे योगदान दिले. गयाना एमेझॉन वॉरियर्सकडून इम्रान ताहिरने सर्वाधिक ३ तर ओडीयन स्मिथने २ गडी बाद केले.
प्रत्युत्तरात खेळताना गयाना एमेझॉन वॉरियर्स संघाला ८ गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावाच करता आल्या. निकोलस पूरनने ७ चौकार व १ षटकारासह केलेली ६८ धावांची खेळी त्याच्या संघाला विजय मिळवून देण्यात कमी पडली. चंदरपॉल हेमराज व कीमो पॉलने प्रत्येकी १५ धावा जोडल्या. विजयी संघाकडून स्कॉट कुगेलजीनने ३ तर केमार होल्डर व केस्रिक विल्यम्स यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. रॉस्टन चेसची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली.