‘टिकटॉक’ चा शॉक!

0
223
  • ऍड. प्रदीप उमप

टिक टॉक हे लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग ऍप सुरक्षित नसल्याचे अमेरिकेत दाखल झालेल्या एका खटल्यातून समोर आले आहे. अमेरिकेच्या सिनेट सदस्यांनीही या ऍपवर आक्षेप घेतला असून, चीनच्या परराष्ट्र धोरणास अनुकूल व्हिडिओ प्रसारित केल्याचा आणि प्रतिकूल व्हिडिओ सेन्सॉर केल्याचा आरोप टिक टॉकवर पूर्वीच झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर, हा ‘लोकप्रिय धोका’ किती काळ कायम राहतो, हे पाहावे लागेल.

टिक टॉक या आपल्याकडील लोकप्रिय अशा व्हिडिओ शेअरिंग ऍपविरुद्ध अमेरिकेत गुन्हा दाखल झाला आहे. वापरकर्त्यांचा डेटा मोठ्या प्रमाणावर चोरून चीनला पाठविल्याचा आरोप या चिनी ऍपवर ठेवण्यात आला आहे. वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय त्याचा कंटेन्ट आणि डेटा घेत असल्याचा आरोप टिक टॉकवर आहे. बाइट डान्स या बीजिंगमधील कंपनीकडे टिक टॉकची मालकी आहे. अमेरिकी युवकांमध्ये टिक टॉक खूपच लोकप्रिय आहे. भारतातही या ऍपचे सुमारे २० कोटी वापरकर्ते आहेत. संपूर्ण जगभरात टिक टॉकचे ५० कोटींपेक्षा अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. गाणे, संगीत, विनोद किंवा चित्रपटातील व्हिडिओसोबत मिश्रण करून, आपल्या मर्जीनुसार एडिट करून वापरकर्ते आपला १५ सेकंदांपर्यंतचा व्हिडिओ या ऍपवर टाकू शकतात, हे या ऍपचे वैशिष्ट्य आहे. अर्थात उत्तर अमेरिकेत डेटा संग्रह आणि सेन्सॉरशिपच्या चिंतांमुळे या ऍपला दबावाचा सामना करावा लागत आहे. कॅॅलिङ्गोर्नियातील न्यायालयात गुदरलेल्या खटल्यानुसार, ओळख पटण्यायोग्य वापरकर्त्यांचा व्यक्तिगत डेटा गुप्त स्वरूपात चीनमध्ये पाठविल्याचा आरोप या ऍपवर ठेवण्यात आला आहे. या डेटाचा वापर करून भविष्यात किंवा वर्तमानातही अमेरिकेतील एखाद्याची ओळख पटविली जाऊ शकेल आणि त्या व्यक्तीवर नजर ठेवता येईल. टिक टॉकच्या विरोधात खटला दाखल करणारी मिस्टी हॉंग ही कॅलिङ्गोर्नियातील एका विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे.

हॉंगने केलेल्या दाव्यानुसार तिने गेल्या वर्षी टिक टॉक ऍप डाउनलोड केले होते; मात्र स्वतःचे अकाउंट उघडले नव्हते. काही महिन्यांनंतर आपले अकाउंट आपसूक तयार झाल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्याचबरोबर जे व्हिडिओ तिने कधीच प्रसिद्ध करायचे नाहीत असे ठरविले होते, ते व्हिडिओही अकाउंटवर दिसू लागले. हा डेटा चीनमध्ये सर्वदूर पाठविला गेला. अलिबाबा आणि टेन्सेन्टनेही याला दुजोरा दिला आहे. टिक टॉक अशा प्रकारे डेटा विकून प्रचंड नङ्गा कमावीत आहे, असा आरोप खटल्यात करण्यात आला आहे. जाहिरातींमधून होणार्‍या कमाईच्या स्वरूपात हा नङ्गा आहे, असा दावा करण्यात आला आहे. या आरोपांविषयी टिक टॉककडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. वापरकर्त्यांमध्ये टिक टॉक प्रचंड लोकप्रिय आहे. सामान्यतः एखाद्या तयार साउंड ट्रॅकच्या अनुषंगाने आपल्या हालचाली करून अभिनय करणे वापरकर्त्यांना खूप आवडते आणि त्याचा अंतिम व्हिडिओ मनोरंजक असतो. वेगवेगळ्या स्रोतांमधून मिळालेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये जगभरातील पाच सर्वाधिक डाउनलोड केल्या गेलेल्या ऍपमध्ये टिक टॉकचा समावेश आहे. जागतिक पातळीवर टिक टॉक ऍप सुमारे ६२.५ कोटी मासिक सक्रिय वापरकर्ते असल्याचाही एक अंदाज सांगितला जातो. ङ्गेसबुकचे २.४५ अब्ज मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. म्हणजेच, ङ्गेसबुकचे वापरकर्ते कितीतरी अधिक आहेत. परंतु नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, टिक टॉक वापरणार्‍यांची संख्या दरवर्षी ८५ टक्क्यांनी वाढत आहे. अर्थात, या लोकप्रियतेच्या पार्श्‍वभूमीवरही विशेषतः अमेरिकेत टिक टॉकला प्रखर विरोध सहन करावा लागला आहे.

‘द गार्डियन’मध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तांतानुसार, चिनी सरकारला आपली परदेश व्यवहारविषयक धोरणे अन्य देशांत राबविणे सोपे व्हावे, अशा पद्धतीने टिक टॉक ऍपचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. हे ऍप आपल्या मर्जीनुसार कोणतेही व्हिडिओ प्रकाशित करते, असेही वृत्तांतात म्हटले आहे. आपल्या मर्जीनुसार ऍप व्हिडिओंचे संचालन करते आणि प्रसारित करते. उदाहरणार्थ, हॉंगकॉंगमधील दंगलींच्या बाबतीत कोणताही व्हिडिओ सर्च केल्यास केवळ सभ्य किंवा सौम्य पोस्ट्‌सच पाहायला मिळतील; तसेच चीनमधील उइगर प्रांताविषयी एक जरी पोस्ट टाकली गेली, तरी ती ऍपच्या सेवेतून बाहेर काढली जाते. बाइट डान्स ही चिनी कंपनी असल्याचे वास्तव नजरेआड करता येण्याजोगे नाही. चिनी कम्युनिस्ट पक्षाला अनुकूल नसलेले व्हिडिओ सेन्सॉर करण्याच्या तसेच चिनी सरकारची भलावण करणार्‍या पोस्ट जास्तीत जास्त प्रसारित करण्याच्या बाबतीत बाइट डान्सची प्रसिद्धी आहे. गोपनीयता अबाधित राखण्याची हमी टिक टॉक देते; मात्र अमेरिकी किंवा युरोपीय संघाच्या गोपनीयतेच्या नियमांची पर्वा न करता चीनच्या धोरणांनुसार चालते, हा चिंतेचा विषय आहे. याचाच परिणाम म्हणून अमेरिकेच्या परदेशी गुंतवणूक समितीने एक चौकशी सुरू केली आहे. वास्तविक, बाइट डान्स कंपनीने डॉट ली या कंपनीचे अधिग्रहण करून तिला टिक टॉकचे नाव आणि स्वरूप दिले. अधिग्रहणाच्या या कराराला मंजुरी घेतली नसल्याचाही आरोप आहे. याखेरीज अमेरिकी सिनेटच्या नेत्यांनीही राष्ट्रीय सुरक्षा तपास करण्यास सांगितले आहे. टिक टॉककडून केल्या जात असलेल्या डेटा संग्रहावर आक्षेप घेतला आहे. अमेरिकेतील ११ कोटी वापरकर्त्यांच्या माहितीची चिनी सेन्सरद्वारे तपासणी केली जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळेच या ऍपचे धोके दुर्लक्षित करता येण्याजोगे नाहीत.

अमेरिकेतील नियामक संस्थांनी व्यक्त केलेली चिंता आणि भारतीय नियामक यंत्रणेची चिंता समान आहे, हे मुद्दाम अधोरेखित करावे लागेल. भारतात असा तर्क दिला जात आहे की, अनेक आयटी कंपन्या भारतीयांकडून माहितीचे एकत्रीकरण करतात. परंतु ती माहिती भारत सरकारला देण्यास विरोध करतात. हीच चिंता दूर करण्यासाठी भारताने स्थानिक पातळीवर डेटा संग्रहणाचा आग्रह केला आहे. दुसरीकडे, इंटरनेटच्या आजच्या युगात अमेरिकेला असे वाटू लागले आहे की, अशा एका कंपनीकडे अमेरिकी नागरिकांची माहिती आहे, जिच्यावर अमेरिकी कायद्यांचा अंमल चालत नाही. वस्तुतः जगातील सर्व आयटी कंपन्या अमेरिकेच्या न्यायिक कक्षेत येतात. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे ज्या देशातील कंपनीविषयी अमेरिकेला शंका आहे, त्या देशाचे अमेरिकेशी व्यापार युद्ध सुरू आहे. येत्या काही महिन्यांत अमेरिका याविषयी नवीन नियमावली जारी करेल, अशी अपेक्षा आहे. टिक टॉकच्या अमेरिकी वापरकर्त्यांची माहिती स्थानिक पातळीवरच संग्रहित केली असल्याचे आणि चीनपासून ती दूर असल्याचे स्पष्टीकरण टिक टॉकने दिले आहे.

जगभरात टिक टॉक ऍप १.५ अब्ज वेळा डाउनलोड केले गेले आहे. एकट्या भारतातच ४६६.८ दशलक्ष वेळा हे ऍप डाउनलोड करण्यात आले आहे. म्हणजेच, भारत ही टिक टॉकसाठी सर्वांत मोठी बाजारपेठ ठरली आहे आणि जगात सर्वाधिक टिक टॉक डाउनलोड भारतातच झाले आहेत. १.५ अब्ज डाउनलोडच्या आकड्यामुळे टिक टॉक आता जगातील सर्वाधिक वेगाने पसरणारे ऍप बनले आहे. विशेष म्हणजे, टिक टॉकची मालकी असणारी बाइट डान्स ही कंपनी चीनमधील असूनसुद्धा भारतात चीनपेक्षा अधिक वेळा हे ऍप डाउनलोड झाले आहे. टिक टॉक डाउनलोड होण्याच्या बाबतीत अमेरिकेचा जगात तिसरा क्रमांक आहे. परंतु अमेरिकेने नॅशनल सिक्युरिटी रिव्ह्यू सुरू केल्यामुळे आता अमेरिकेतील हे ङ्गॅड आटोक्यात येण्याची चिन्हे आहेत. पुढील काळात आणखीही धोके समोर येऊ शकतात. टिक टॉकचे धोके समोर आल्यामुळे या बाबतीत अमेरिका आणि इतर देश काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.