- मीना समुद्र
‘लहानसुद्धा महान असती’ ही फक्त बालगाण्यातली शिकवण नाही किंवा सूचन नाही; इवलंस ‘टिंब’ हे संपूर्ण साहित्यविश्वात किती महान आहे, त्याचं किती महत्त्व आहे हे त्या कवितेच्या निमित्तानं पाहता आलं आणि पुनरावलोकनानं अनुभवता आलं!
कुणाची ते माहीत नाही; पण व्हॉट्सऍपवर ‘टिंब’ नावाची एक कविता प्रसृत झाली होती. मागेही ती एकदा येऊन गेलेली. तेव्हाही आवडली होतीच. यावेळी मात्र तिची दखल घ्यायचं ठरवलं. कुणालाही आवडेल अशी ती कविता-
एकदा एक टिंब इकडे तिकडे हिंडलं
शब्दांच्या बागेत उगीचच हुंदडलं
नदीचा केला नंदी, माडीची केली मांडी
बाबूचा झाला बांबू अन् कुडी झाली कुंडी
शेडी झाली शेंडी, अगं झाले अंग
भाडे बनले भांडे अन् रग बनला रंग
हिंडून हिंडून असे पार दमून गेले
वाक्याच्या शेवटी गेले अन् पूर्णविराम बनले.
एका टिंबाची एवढी गफलत झाली
की मंदिराऐवजी मदिरा खुली झाली
एखाद्या लहान मुलासारखं शब्दांच्या बागेत हिंडणारं, हुंदडणारं टिंब- ही कल्पनाच खूप गंमतशीर वाटली आणि मग शब्दांना खुलविणार्या, सार्थक वा निरर्थक बनविणार्या टिंबांचे शब्द शोधण्याचा खेळ खेळण्याचा नाद मनाला लागला. अर्थात पूर्वी बालवाडीसाठी असे काही शब्द शोधले होतेच; आणि त्याला नाव दिले होते टिकल्यांची गंमत. टिकल्या म्हणजे टिंब नव्हे, कारण काही टिकल्या वेगवेगळ्या आकाराच्या असू शकतात. पण शीर्षबिंदू या अर्थानं गोल आकाराची टिकली टिंब होऊ शकते. मग असे टिंबवाले खूप खूप शब्द आठवले आणि त्या शब्दातल्या अक्षरांची जागा टिंबाने बदलली की त्याचा अर्थ पूर्णपणे बदलून शब्दाचा कायापालट होतो हे अनुभवलं. उदा. साधा सांधा होतो, गंजचा गज बनतो. मंदचा मद, मेंदूचा मेदू आणि सोंड- सोड हे क्रियापद बनते.
शोभादर्शकातल्या (कॅलिडिओस्कोप) काचतुकड्यांच्या हलक्याशा धक्क्याने बदलणार्या आकृत्यांसारखं टिंबानं जरा शब्दातली जागा बदलली की त्या शब्दाचा बदलता अर्थ, त्यातला कधी खोल तर कधी उथळ, कधी गंभीर तर कधी खट्याळ आशय शोधण्याचा हा खेळ मग डोक्यात चालूच राहिला. टिंबाच्या करामती पाहून खूप गंमत वाटली आणि मेंदूला जरा चालनाही मिळाली. काही शब्दांचा अर्थ मात्र टिंब असले तरी तोच राहतो. जसे, पथ-पंथ. मराठीत विनंती हिंदीत ‘विनति’ होते. दोन्हीचा अर्थ एकच- प्रार्थना.
टिंब कधी विसर्ग होतात- स्वतः, नमःशिवाय अशा शब्दांना शेवटी ‘ह’कार देतात. अनुस्वार बनून ती अक्षरांच्या काना-मात्रेवर स्वार होतात. पण असे करतानाही टिंब काही शिस्त पाळतात. अक्षर आणि काना यांच्यावर मध्येच टिंब येते (कांदा), शंकर, नंदी यांच्या दांडीवरच ते शीर्षबिंदू येते. वेलांटी र्हस्व असो की दीर्घ टिंबाचे स्थान लिहिणार्याच्या उजव्या बाजूलाच (किंवा, भिंतींना) असते. डोक्यावरून पदर घेणार्या स्त्रीच्या एकाच कानातले कर्णफूल दिसावे तसे ते टिंब दिसते. कधी कडेवर बसलेल्या बाळासारखे तर कधी खांद्यावर बसून मिटिमिटी डोळ्यांनी अक्षरांची जत्रा पाहणार्या लहानग्यासारखे ते वाटते. काही टिंब चक्क चंद्रावर जाऊन बसतात आणि चंद्रचांदणी होऊन ‘चंद्रबिंदू’ हे सुंदर नामाभिधान त्यांना मिळते. ॐ, चॉंद असे शब्द या चंद्रबिंदूमुळे खूप शोभायमान होतात. टिंब शब्दांना, अक्षरांना अलंकृत करतात असं वाटतं. टिंब काही प्रश्नचिन्हाखाली जाऊन बसतात, तर कधी स्वल्पविरामाच्या डोक्यावर बसून त्याला अर्धविराम बनवत थोडा दम खातात. कधी अर्धवट बोलल्यानंतरची टिंबं (लेखनातली) अर्थ सूचित करतात किंवा पूर्णही करतात. किंवा समस्यापूर्तीसाठी टिंब देऊन जागा सोडलेली असते आणि गाळलेल्या जागा दाखवण्यासाठी टिंबांची योजना केलेली असते. एखादा अर्वाच्च शब्द उच्चारायला नको वाटत असल्यास टिंबच कामी येतात.
वाक्यातल्या क्रियापदाची वाचिक उच्चारणाची पूर्तता करण्यासाठी (झालं, गेलं, केलं) टिंबच सहाय्यक होतात. नाहीतर असं हिंडून हिंडून दमलं की टिंब वाक्याच्या शेवटी जाऊन आराम करतात, ती पूर्णविरामं होतात. गणितात टक्केवारी दाखवण्यासाठी तिरक्या रेषेच्या अलीकडे-पलीकडे ती जाऊन बसतात (१००%). घड्याळाची वेळ दाखवताना तास-मिनिटे-सेकंदांच्या मध्ये येतात (७ः१५ः१०).
फुलातले परागकण म्हणजे नवनिर्मितीच्या- टिंबांच्या खुणा. या फुलावरून त्या फुलावर उडणार्या फुलपाखरांप्रमाणे ही टिंबं अशी साहित्याच्या, अक्षरांच्या बागेत स्वच्छंद संचार करतात तरी त्यांची सूत्रं असतात ती लेखकाच्या हाती आणि व्याकरणातील नियमांच्या हाती. काना-मात्रा-वेलांट्या या वाद्ययंत्राच्या तारा असतात. पण टिंब त्या तारा छेडतात. त्यामुळेच टिंबयुक्त शब्दांना एक नाद असतो. टिंब याला ‘थेंब’ हा पर्यायवाची शब्द आहे. थेंब म्हणजे पाऊसलिपीतली टिंबंच असावीत. टिंब म्हणजे ठिपका असाही अर्थ आहे. दूर जाऊन एखादी व्यक्ती वा वस्तू अगदी लहान ठिपक्यासारखी दिसू लागते. यातूनही त्याचं सूक्ष्मत्व आणि अंतर सूचित होतं. रांगोळीतले ठिपके, स्वस्तिकात दिलेले ठिपके हे रेषा सांधणारे, सौंदर्य देणारे बिंदूच. ‘अनुस्वार’ ही टिंबाची साहित्यिक परिभाषा वाटते. सानुुुनासिक किंवा अनुनासिक शब्दांसाठी टिंब उपयोगी पडते किंवा टिंबाचा उपयोग करण्याचा नियम आहे. ङ् (संकेत), त्र् (संयम), ण् (घंटा), न् (बंद), म् (कंबर) अशी टिंबांची योजना केली जाते. शब्दांचं अनेकवचनी रूपही (मुलांनो, मुलींनो) टिंबाद्वारे व्यक्त होते. टिंबं सरळ पळत गेली की रेषा तयार होते. दगडी पाटीवर पाढे लिहिण्यासाठी पांढर्या पेन्सिलीने पट्टीला लगटून अशा टिंबांच्या रेषा आखलेल्या आठवतात. ही टिंबं- अनुस्वार मात्र भरीव असतात. पूज्य किंवा शून्य ही हवा भरलेली पोकळ टिंबे असं फारतर म्हणता येईल.
‘अविदित गतयामा रात्रिरेव व्यरंसीत्’ हे टिंबाच्या आशयघनतेचे, अर्थसौंदर्याचे अप्रतिम उदाहरण. यातले टिंब असल्याने व काढल्यामुळे ‘रात्री गेल्या, गप्पा तशाच राहिल्या’, ‘रात्री कशा निघून गेल्या कळलंच नाही’ असा आशय व्यक्त होतो. ‘लहानसुद्धा महान असती’ ही फक्त बालगाण्यातली शिकवण नाही किंवा सूचन नाही; इवलंस ‘टिंब’ हे संपूर्ण साहित्यविश्वात किती महान आहे, त्याचं किती महत्त्व आहे हे त्या कवितेच्या निमित्तानं पाहता आलं आणि पुनरावलोकनानं अनुभवता आलं, हे मात्र खरं!