
मडगाव (क्री. प्र.)
टाटा उद्योग समूहाच्या आंतर कंपन्यांच्या फुटबॉल स्पर्धेस रविवार २२ ऑक्टोबरपासून बाणावली येथील मैदानावर प्रारंभ झाला. टाटा स्पोर्ट्स क्लबतर्फे दर वर्षी त्यांच्या देशभरातील विविध राज्यांतील कंपन्यांसाठी या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यंदा गोव्यात पहिल्यांदाच २२ ते २७ ऑक्टोबरपर्यंत फुटबॉल स्पर्धा आयोजित केली गेली आहे.
इंडिया इंडियन हॉटेल्स लिमिटेड (ताज, विवांता आणि जिंजर) यांच्या यजमानपदाखालील या स्पर्धेत टाटा स्टील जमशेदपूर, टायटन बेंगळुरू, टाटा मोटर्स जमशेदपूर, टाटा पॉवर मुंबई, टाटा मोटर्स पुणे. टाटा ट्रस्ट, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पुणे आणि टाटा स्पोर्ट्स क्ल मुंबई आदी महत्त्वाच्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत.
गोव्याचे माजी प्रख्यात फुटबॉलपटू तथा टाटा समूहासाठी जनसंपर्कचे वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम केलेले फोर्तुनाटो फ्रँको हे उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त हॉकीपटू क्लॅरेन्स लोबो, आणि टाटा स्पोर्ट्स क्लबच्या प्रशासन विभागाचे व्यवस्थापक सुरेंदर कुमार यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.