गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहून ठेवलेल्या विपुल साहित्यावर अजून कित्येक दर्जेदार व अभिजात असे चित्रपट बनवणे शक्य असून नव्या दमाच्या चित्रपट दिग्दर्शकाने हे शिवधनुष्य उचलावे, असा सूर काल ‘टागोर इन सिनेमा’ या विषयावरील परिसंवादातून बोलताना वक्त्यांनी व्यक्त केला.
या परिसंवादात सुप्रसिद्ध अभिनेत्री मूनमून सेन, टागोर यांच्या साहित्याच्या अभ्यासक शोभा चटर्जी टागोर यांच्यावर चित्रपट बनवलेले दिग्दर्शक पाबलो सिझर यांनी सहभाग घेतला. वाणी त्रिपाठी यांनी कार्यक्रमाचे संकलन केले.
यावेळी बोलताना शोभा चटर्जी म्हणाल्या, गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनी विपुल साहित्य संपदा निर्माण करून ठेवलेली आहे. त्यांनी असंख्य अशा सुंदर लघुकथा लिहून ठेवलेल्या असून त्यांच्यावर कित्येक अभिजात अशा चित्रपटांची निर्मिती करणे शक्य आहे.
रे यांनी अप्रतिम चित्रपट बनविले
गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्यावर आतापर्यंत विविध भारतीय भाषांतून चित्रपट बनवण्यात आले. मात्र त्यांच्या साहित्यावर सर्वांगसुंदर असे चित्रपट बनवले ते सत्यजीत रे यांनीच, असे शोभा चटर्जी यांनी यावेळी स्पष्ट केले. काही वेळा तर सत्यजीत रे यांनी बनवलेले चित्रपट पाहून ते टागोर यांच्या साहित्यापेक्षाही सरस असल्याचे जाणवते, असे त्या म्हणाल्या. रे यांनी टागोर यांच्या साहित्यावर चित्रपट बनवताना कथादृष्य चित्रपटासाठी आवश्यक असे बदलही घडवून आणल्याचे त्या म्हणाल्या. टागोरांच्या ‘नाश्टोविडा’ या कादंबरीवर जेव्हा रे यांनी ‘चारूलता’ हा चित्रपट बनवला तेव्हा बंगालमधील सवर्णांच्या टिकेला रे यांना सामोरे जावे लागले होते. असेही चटर्जी म्हणाल्या. टागोर यांचे विपुल व दर्जेदार असे साहित्य उपलब्ध असले तरी या साहित्यावर आधारित चित्रपट बनवणे हे निर्माते व दिग्दर्शक यांच्यासाठी एक आव्हान आहे ही गोष्टही नजरेआड करता येणार नसल्याचे त्या म्हणाल्या.
टागोर यांच्या जीवनावर चित्रपट बनवलेले दिग्दर्शक पाब्लो सिझर म्हणाले, टागोर यांच्या एकूण साहित्याचा अभ्यास करण्यासाठी एक जन्म अपुरा आहे. सिझर यांनी टागोर यांच्यावर ‘थिकिंग ऑफ हिम’ या वादाचा चित्रपट बनवलेला असून या चित्रपटानेच यंदाच्या इफ्फीचा समारोप होणार आहे. हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर व अर्जेटिनाची साहित्यिक व्हिक्टोरिया ओ कांपो यांच्यातील आध्यात्मिक संबंधावर आधारित आहे. २००८ साली आपण जेव्हा गोव्यात इफ्फीसाठी आलो होता तेव्हाच या चित्रपटाविषयीची बोलणी आपण केली होती असे ते म्हणाले.
अभिनेत्री मुनमून सेन म्हणाल्या, टागोर यांच्या साहित्याशी आपली ओळख आपली माता व अभिनेत्री सुचित्रा सेन यांनी करून दिली होती. नंतर महाविद्यालयात टागोर यांचा साहित्याशी आपली ओळख झाली. आपल्या मुलीनी टागोर यांच्या साहित्यावर आधारित असलेल्या कित्येक चित्रपटात काम केले असल्याचे त्या म्हणाल्या. पाब्लो रिझर यांच्या चित्रपटातही आपल्या एका मुलीने अभिनय केला असल्याचे त्या म्हणाल्या.