टपाली मतदानात पारदर्शकता येणार

0
13

>> पात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास कक्ष स्थापन

>> राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या हजेरीत मतदान

>> मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मांची माहिती

लोकसभा निवडणुकीत टपाली (पोस्टल) मतदानास पात्र असलेल्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) रमेश वर्मा यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. या मतदानाची प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मतदान कक्षात उपस्थित राहण्यास मान्यता दिली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

पूर्वीच्या निवडणुकांमध्ये टपाली मतदानासाठी पात्र मतदारांना मतदान केंद्रावर वैयक्तिकरित्या मतदान करण्याऐवजी मेलद्वारे मतदान करावे लागत होते. निवडणूक आयोगाने अलीकडेच या संदर्भातील नियमांमध्ये बदल करून खास मतदान केंद्रांद्वारे मतदान करण्याची संकल्पना मांडली आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघांतील उमेदवारांना खर्च मर्यादा 75 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. या बैठकीत राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना लोकसभा निवडणूक आचारसंहितेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. राजकीय पक्षांनी निवडणूक आचारसंहितेच्या कक्षेत राहून प्रचार करण्याची सूचना करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघन प्रकरणी कडक कारवाई केली जाणार आहे.

या बैठकीत भाजप, काँग्रेस, आरजीपी, गोवा फॉरवर्ड आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पोस्टल मतदानासाठी खास केंद्र स्थापन करून त्या ठिकाणी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याच्या निर्णयाचे गोवा फॉरवर्ड, आरजीच्या प्रतिनिधींनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्वागत केले.

5 मेपर्यंत टपाली मतदानासाठी मुदत
लोकसभा निवडणुकीत टपाली मतदानासाठी पात्र असलेले सरकारी कर्मचारी आणि इतरांना येत्या 5 मेपर्यंत मतदान करावे लागणार आहे. मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांकडून टपाली मतदानासाठी केंद्रे स्थापन केली जातील. त्या केंद्रामध्ये टपाली मतदानासाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान करावे लागणार आहे, असेही रमेश वर्मा यांनी सांगितले.