>> गिरीश चोडणकर यांचे मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र
राज्यातील सत्ताधारी भाजपचे उमेदवार टपालाद्वारे मतदान करणार्या सरकारी कर्मचार्यांना आपणाला मते देण्यासाठी पैसे देत असल्याची तक्रार गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना एक पत्र लिहून केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या या पत्रात चोडणकर यांनी, आपल्या तक्रारीद्वारे माहिती देताना म्हटले आहे की, गेल्या १४ रोजी राज्यात निवडणूक झाली. तर १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सध्या राज्यात निवडणूक आचारसंहिताही लागू आहे. राज्यात सरकारी अधिकारी व अन्य कर्मचारी तसेच पोलीस कर्मी यांचे टपालाद्वारे मतदान चालू आहे. आणि ह्या मतदारांची ही मते आपणाला मिळावीत यासाठी सत्ताधारी भाजपचे उमेदवार ह्या मतदारांना हजारो रुपये देत असल्याची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. ह्या मतदारांना पैसे देणे तसेच मतांसाठी धमकावणे चालू असल्याची माहिती आम्हांला मिळाली आहे. ह्या संबंधी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने गेल्या १५ व १६ फेब्रुवारी रोजी राज्यातील मुख्य निवडणूक अधिकार्यांकडे तक्रारही केली असल्याचे चोडणकर यांनी या पत्रातून नमूद केले आहे. त्याशिवाय टपालाद्वारे दिली जाणारी मते ही भाजपच्याच उमेदवारांना दिली जावीत यासाठी सरकारी अधिकारी व दृकश्राव्य माध्यमांचाही वापर करून आचारसंहितेचा भंग केला जात असल्याचेही पत्रातून नमूद केले आहे.
बाबू कवळेकरांविरोधात
ध्वनिफीत असल्याचा दावा
भाजपचे केपेतील उमेदवार बाबू कवळेकर हे टपालाद्वारे केल्या जाणार्या मतांसाठी आपल्या मतदारसंघातील मतदारांना पैशांचे आमीष दाखवत असल्याची ध्वनिफीत आपणाकडे असल्याचे चोडणकर यांनी ट्विटरद्वारे स्पष्ट केले आहे. कवळेकरांविरुद्ध आपणाकडे असलेला हा सबळ पुरावा असून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल त्यांच्यावर कारवाई करतील का असा असा प्रश्न चोडणकर यांनी केला आहे.