झेंडू

0
715
  •  पौर्णिमा केरकर

रोजीण रंग-रूपाने आकार-प्रकाराने आकर्षक, टवटवीत. तिचे रंगच एवढे आकर्षक की कोणतेही रसिकमन तिच्या प्रेमात आकंठ बुडावे. दसरा-दिवाळीच्या निमित्ताने तिचे भावही वधारले आहेत. असे असूनही ती निगर्वी… कधी मोठेपणाचा आव आणून भाव खात नाही.

वांझेच्या पोरसात
ही गे फुलली
गोणी रोज, फुलली
गोणी रोज…
वांझ ती बघी मौज
शेजेच्या गे बाळकांची…
ही एक जात्यावरची ओवी. लक्ष्मीआईच्या मुखातून जेव्हा ती ऐकायचा योग येतो तेव्हा त्यातील शब्दाशब्दांतून प्रतिबिंबित होणारे कारुण्य हृदय विदीर्ण करते. जिवंत होत जातो तो प्रसंग ज्यात मूलबाळ नसलेल्या स्त्रीला जेव्हा समाज हिणवतो. तिला नको नको ते बोलून टोचून, बोचून खातो. ती तरी बिचारी काय करणार? समाजमनाची मानसिकताच अशी होती आणि आहेही की जर एखाद्या स्त्रीला मूल झाले नाही तर तिला वांझ ठरवून तिच्याकडे उपेक्षित नजरेने पाहिले जाते. प्रसंगी दोष कोणाचा याचाही विचार केला जात नाही. हे अगदी परंपरेने चालत आलेले आहे.

आज एकविसाव्या शतकात अक्षरओळख असलेले समाजमनही जेव्हा अशीच संकुचित मनोवृत्ती बाळगते तेव्हा पारंपरिक रूढी-रिवाजांच्या प्रवाहातून आलेल्या महिलांनी स्वतःच्या मनाला अभिव्यक्त करण्यासाठी जात्याला सखी मानले. एवढेच नाही तर आपली कूस उजवली नाही, याची मनातळातील खंत फुलाफळांना सांगितली. अशीच एक मालन परसबागेतील भरभरून फुललेल्या रोजा म्हणजे झेंडूच्या फुलझाडांकडे पाहात राहते. तिला त्यावरील फुललेली गोणी रोजांची फुले आकर्षित करतात. ती मनोमन तिला पाहून विचार करत असावी की, परसातील रोजीणीला ही गोणी रोजी फुलून आलेली आहेत. गोणी रोज म्हणजे तिच्या सुफळतेचे प्रतीक. तीसुद्धा फुलू-फळू शकते. आपण मात्र नाही. मला मात्र मूलबाळ नाही. इतर मुलांना पाहूनच मला आयुष्य कंठावं लागेल. रोजांचा संदर्भ येथे मनाला दिलासा देतो. या मालिनीच्या रोजा, झेंडूच्या या फुलांना लोकपरंपरेत मोठे महत्त्व आहे. श्रावण-भाद्रपद मासांत या फुलांच्या लागवडीसाठी तयारी सुरू होते. या फुलांशी माझे बालपणापासूनचे नाते आहे. प्रत्येक टप्प्यावर ती विविध अंगाने मला भेटत राहिली. आई खरेया जागेत पोरसू करायची. त्या पोरसात मिरची लागवड प्रामुख्याने असायची. त्यानंतर त्यात अनेक आंतरपिके घेतली जायची. त्यात वाल, वांगी, चवळी, मुळा, तांबडी भाजी या सर्वांमध्ये मेरेच्या शेजारी एका रांगेत रोजिणी असायच्या. त्यावेळी यांची रोपे काही मुद्दामहून लावली जात नसायची. भाजीच्या वगैरे बियांतून आपोआपच उगवायची. ती भाजीच्या मध्ये मध्ये रुजायची. आई त्या रोपांना काढून मेरेच्या कडेने ओळीत लावायची. फुलं खूप सुंदर. पाकळ्या एकावर एक थर चढवत झुबकेदार गोंडस झालेली गोणी रोजीची फुलं पिवळ्या-केशरी रंगात खुलून दिसायची. दाणी रोजसुद्धा याच दोन रंगात, परंतु आकार लहान. पाकळ्यांचे थर कमी. एक एक पाकळी सुटी सुटी केली की तिच्या खालील टोकाला काळी लांब बी. सगळ्या पाकळ्या एकत्रित आल्यावर खूप सुंदर दिसतात. गोणी रोजांची लागवड अलीकडे तर सर्रास बागांतून दिसते. आसामच्या भ्रमंतीत तर मोठ्या आकाराची झेंडूची फुले मी मोठ्या प्रमाणात अनुभवलेली आहेत. या फुलांचे झाड तसे नाजूक. पाने बारीक कात्रीची, उग्र वास फुलांसकट
पानांनाही.

फुलं आवडणार्‍या सर्वच रसिकमनांना हा झेंडू फुलांचा गंध आवडेलच असे सांगता येणार नाही. हा गंध तर बराच वेळ हाताला चिकटून राहातो. फुलांना धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दसरोत्सवाला तर खूपच मोठ्या प्रमाणावर फुलांची उलाढाल होते. वाहन, घरे, देवघर, मंदिर सजावटीसाठी झेंडूचीच फुले अग्रणी मानली जातात. दिवाळी-दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर दाराला झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते. त्यात आंब्याची पाने गुंफून त्या तोरणाची सात्त्विक संस्काराची प्रतिमा अधिक वाढवली जाते. अश्विन हा पूर्ततेचा… परितृप्ततेचा महिना. सोनेरी उन्हाची पखरण याच महिन्यात होते. फुलांचे रंग वैविध्यपूर्णतेने खुलविणारा हाच महिना. प्रत्येक रंगालाच सोनेरी छटा समरसून गेलेली. झेंडूच्या फुलांनाही ती लगडून आहे. ही मखमलीची फुले असेही त्यांना संबोधले जाते, तर देशावर ते गेंदफूल म्हणून ओळखले जाते.

या गेंदफुलाविषयी दंतकथा सांगितली जाते ती अशी की, शेषांच्या मस्तकावरील गेंदफूल
एकदा म्हणे अर्जुनाने कृष्णाच्या सांगण्यावरून काढून आणले. खरे तर त्यावेळी अर्जुन शेषकन्या उलुपीवर भाळला होता. त्याने तिच्याशी लग्न लावणार असल्याचा निर्धार करून दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर लग्न लावून आपला हट्ट पुरा केला. तेच हे गेंदफूल दारादारांत तोरणातून झुलते… फुलते आहे… या फुलाशिवाय तर दसरा-दिवाळी पूर्णच होऊ शकत नाही. आदिवासी वेळीप समाज असो अथवा धनगरी समाज, झेंडूच्या फुलाशिवाय धील्लो नृत्य होणार नाही की दसर्‍याची मंडपी सजणार नाही. पारिजात स्वर्गातून या भूतलावर आला, तर झेंडू पाताळातून! तुळशी विवाहाच्या प्रसंगी एका दिवसाचे अहेवपण भोगणार्‍या तुळशीला, तिच्या धेडीला म्हणजेच मैत्रिणीला झेंडू फुलांनीच सजवले जाते. खाप्री रोज म्हणून या झेंडूचा
प्रकार खूप आकर्षक. गडद लाल, केशरी, मातीच्या रंगाचा. या प्रकारच्या फुलांची झाडेही झुबकेदार गर्द हिरव्याच रंगाची. बंगल्यांची, बागांची शोभा वाढविण्यासाठी बर्‍याच ठिकाणी ती लावली जातात. झेंडूच्या फुलांना असे धार्मिक अधिष्ठान लाभल्याने अनेकांची ती उपजीविकेचे साधनसुद्धा बनलेली आहेत. दिवाळीच्या पाडव्यात तर सांगे-कोणकोण तालुक्यांतील वेळीप समाजाच्या घराघरांत झेंडू फुलांच्या विविध प्रकारच्या माळा गुंफण्यात तिथले लोकमन व्यस्त असलेले दिसेल. तसे बघायला गेलो तर झेंडू फुल हे सर्वसामान्यांचे फूल. ते भरभरून उमलते. प्रतिसाद देते. घटस्थापना करते वेळी घटावरची माळ असो अथवा शस्त्रपूजा- झेंडू हवाच! आता तर झेंडूच्या फुलांना बाजारात बराच भाव मिळतो. त्यांची खास शेती केली जाते. रोपं काहीशी नाजूक, फूल मात्र तेवढे नाजूक होऊन मिरवीत नाही. गोणी रोज टवटवीत म्हणूनच कोणा एखाद्या बाळाचे हात जर काहीसे फुगलेले, टुपटुपित दिसले तर म्हटले जायचे ‘हात बरे दिसतात गोणे कसे!’ गोणे याचाच अर्थ गोंडस असाही अभिप्रेत असावा. बाळसेदार अशीच ही फुले. बालपणी तर या झाडांना आमच्या वाड्यावरील प्रत्येक घराच्या अंगणात अनुभवले होते. दसर्‍याला हवीत म्हणून ती राखून ठेवलेली असायची. दिवाळीच्या पाडव्याला शेणाचा गोठा घातला जायचा. तो सजविण्यात झेंडूचीच फुले अग्रक्रमाने लागायची. मुद्दामहून निगुतीने लावली नसली तरी ती जगतात. आपली आपली जागा करीत वाढतात, बहरतात, अंगणाची शोभा बनतात.

जात्यावरील जी ओवी आहे तिच्यात मूलबाळ नसलेल्या स्त्रीच्या अंगणात गोणी रोज आहे, ही रोजीणच तिला बाळसेदार गुटगुटीत बाळासारखी दिसते. ती त्या फुलातच आपले बाळ शोधते, त्यातूनच मनाचे समाधान तिला गवसत असावे. रोजीण रंग-रूपाने आकार-प्रकाराने आकर्षक, टवटवीत. तिचे रंगच एवढे आकर्षक की कोणतेही रसिकमन तिच्या प्रेमात आकंठ बुडावे. दसरा-दिवाळीच्या निमित्ताने तिचे भावही वधारले आहेत. असे असूनही ती निगर्वी… कधी मोठेपणाचा आव आणून भाव खात नाही.