झुवारी पुलावरून उडी मारलेल्या हवालदाराचा मृतदेह सापडला

0
5

गोवा पोलीस हवालदार प्रथमेश गावडे (22) याचा मृतदेह किनारी पोलिसांनी एमपीटी बर्थ 9 वर पाण्यातून बाहेर काढण्यात आला. गावडे याने शुक्रवारी रात्री झुवारी पुलावरून उडी मारली होती.

वास्को रेल्वे पोलीस स्थानकावर पोलीस शिपाई म्हणून तैनात असलेल्या कुंकळ्ळी येथील 22 वर्षीय प्रथमेश गावडे याने शुक्रवारी संध्याकाळी नवीन झुवारी नदीच्या पुलावरून नदीत उडी मारली होती. समुद्रात त्याचा शोध घेण्याचे काम गेले दोन दिवस तटरक्षक दलाच्या मदतीने सुरू होते. वास्कोतील रेल्वे पोलीस स्थानकात तो सेवा बजावत होता. वर्षभरापूर्वीच पोलीस सेवेत भरती झाला होता. रेल्वे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर पोलीस शिपाई जीवाला बरे नसल्याचे सांगून दोन दिवसांच्या रजेवर गेला होता. मात्र, संध्याकाळी घरी जाण्याचे सोडून तो कुठ्ठाळीतील झुवारी नदीवरील नवीन पुलावर आला व त्याने थेट पाण्यात उडी घेतली. त्याने आत्महत्येचे पाऊल का उचलले याचे कारण स्पष्ट झालेले नाही. सदर घटना काल शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता घडली होती.

काल रविवारी सकाळी प्रथमेश गावडे याचा मृतदेह किनारी पोलिसांना एमपीटी बर्थ 9 वर पाण्यावर तरंगताना दिसला. याविषयी मुरगाव पोलिसांना माहिती दिली असता मुरगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला असता त्याची ओळख पटली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. नंतर संध्याकाळी कुंकळ्ळी येथे त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती मुरगाव पोलिसांनी दिली. पुढील तपास मुरगाव पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक यशवंत रायकर करीत आहेत.