झुवारीनगर येथे अपघातात महिलेचा जागीच मृत्यू

0
14

झुवारीनगर येथे काल झालेल्या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार झाली. इनोव्हाच्या चाकाखाली येऊन सदर महिलेचा मृत्यू झाला. दिल्लीस्थित एक जोडपे ती वापरत असलेली भाड्याची ॲक्टिवा परत मालकाकडे नेऊन देण्यासाठी जात असताना हा अपघात घडला. दुचाकीने येत असताना महामार्गावर नादुरुस्त झाल्याने बंद पडलेल्या व्हॅगनार कारला सदर दुचाकीने धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला उसळून रस्त्याच्या मध्यभागी पडल्याने मागून येणाऱ्या इनोव्हाच्या चाकाखाली सापडली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा नवरा जखमी झाला. सदर घटना काल बुधवारी दुपारी 12.30 वाजता घडली.

जीए 06 टी 5276 या ॲक्टिवा दुचाकीने दिल्लीस्थित नवरा-बायको वेर्णाहून दाबोळी विमानतळाकडे जात असताना झुआरीनगर येथे बिटस पिलानी परिसरात पोचताच त्यांच्या दुचाकीची धडक महामार्गाच्या बाजूला पार्क करून ठेवलेल्या व्हॅगनआर या चारचाकी वाहनाला बसली. सदर कार पंक्चर झाल्याने कालपासून तिथेच उभी करून ठेवण्यात आली होती असे सांगण्यात आले. या कारला त्या दुचाकीची ठोकर बसताच दुचाकीवर मागे बसलेली महिला उसळून रस्त्याच्या मधोमध पडली. याचवेळी वेर्णाहून दाबोळीच्या दिशेने जाणारी इनोव्हा कार तिच्यावरून गेली व ती जागीच गतप्राण झाली. इनोव्हा कार चालकाला ब्रेक लावण्याचीही संधी मिळाली नसल्याने कार सरळ तिच्यावरून गेली. यावेळी महिलेच्या हातात बॅग होती. तर तिचा नवरा दुचाकी चालवत होता. दोघेही जोडपे दिल्लीस्थित असून ती दुचाकी मालकाकडे ॲक्टिवा परत करण्यासाठी दाबोळी विमानतळावर जात होते. याचवेळी सदर अपघात घडला. सदर जोडपे 10 नोव्हेंबर रोजी गोव्यात आले होते.