केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनच्या लोकार्पण केल्यानंतर कालपासून झुआरी पूल पूर्ण क्षमतेने कार्यरत झाला असून पुलाच्या आठही लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत.
शुक्रवार दि. 22 रोजी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते एका भव्यदिव्य सोहळ्यात झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनचे लोकार्पण करण्यात आले होते. याव्यतिरीक्त या पुलावर 280 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार असलेला निरीक्षण मनोरा तसेच पर्वरी येथील नियोजित सहापदरी उड्डाणपुलांच्या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली होती.
दरम्यान, काल सकाळी लोकार्पण करण्यात आलेली दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. त्यानुसार कालपासून झुआरी पूल पूर्ण क्षमतेने कार्यरत झाला. पुलाच्या आठही लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. या पुलामुळे राज्यातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. काल दुसरी लेन खुली करण्यात आली. यावेळी दुलीप बिल्डकऑन लिमिटेडचे अधिकारी उपस्थित होते.