>> पुलाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती
नव्या झुआरी पुलाची एक मार्गिका येत्या ३० एप्रिल २०२२ पर्यंत जनतेसाठी खुली करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी झुआरी पुलाच्या कामाची पाहणी व आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
झुआरी पुलाच्या कामामुळे आगशी, कुठ्ठाळी या भागात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या झुआरी पूल आणि रस्त्याच्या कामाला २०१६ मध्ये प्रारंभ करण्यात आला होता. डिसेंबर २०२१ पर्यंत झुआरी पुलाची एक मार्गिका खुली करण्याची घोषणा करण्यात आली होती; मात्र पुलाचे काम अपूर्णावस्थेत असल्याने ती अद्याप खुली करण्यात आलेला नाही.
गोवा वेल्हा ते बांबोळी उड्डाण पूल येत्या ३० डिसेंबरला वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. या पूल प्रकल्पाचा अंदाजे खर्च १४०० कोटी एवढा निश्चित करण्यात आला होता. कोविड महामारीमुळे पुलाचा खर्च १८०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि पोलीस अधिकार्यांची बैठक घेऊन वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना केली आहे.