झुआरीनगर येथील मार्केट प्रकल्पाला चालना

0
144
झुआरीनगर गोवा पुनर्वसन मंडळातर्फे करण्यात येत असलेल्या बहुद्देशीय मार्केट प्रकल्पाचे बांधकाम.

वास्को (न. प्र.)
गोवा पुनर्वसन मंडळातर्फे झुआरीनगर येथे बहुद्देशीय मार्केट प्रकल्पाच्या कामाला पुन्हा चालना मिळणार आहे. आमदार एलिना साल्ढाणा यांच्याकडून प्रयत्न चालू आहेत.
झुआरीनगर येथे रस्त्याकडेला भाजीपाला, मासळी विक्रेते व गाळे थाटून बेकायदा व्यवसाय करणार्‍या गाडेधारकांमुळे येथील वाहतूक रहदारीला अडगळ होत आहे. त्यामुळे या विक्रेत्यांचे स्थलांतर करण्याची मागणी होत होती. या समस्येचे निवारण करण्यासाठी सांकवाळ पंचायतीने आमदार तथा पुनर्वसन मंडळाच्या अध्यक्ष एलिना साल्ढाणा यांच्यासमोर ही समस्या मांडली.
याविषयी सखोल अभ्यास केल्यानंतर या विक्रेत्यांसाठी नवा मार्केट प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमीन झुआरी ऍग्रो केमिकल्सकडून मिळवण्यात आली व या प्रकल्पासाठी सुमारे ३०५ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला व सदर मार्केट प्रकल्प कामाला सुरुवात करण्यात आली.
दरम्यान या प्रकल्पाचे काम अर्धेअधिक पूर्ण झाले असून मध्यंतरी या प्रकल्पात काही त्रुटी आढळल्याने गेले वर्षभर या प्रकल्पाचे काम रेंगाळले. या प्रकल्पाच्या आराखड्यात काही तांत्रिक बदल करणे भाग पडल्याने विलंब झाल्याचे कारण पुढे करण्यात आले. या प्रकल्पासाठी ८००० चौ. मी. अतिरिक्त जागा झुआरी ऍग्रोकडून ताब्यात घेण्यात आली आहे. हा प्रकल्प येत्या काही महिन्यात पूर्ण होणार असल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले.