बिर्ला-झुआरीनगर येथील झुआरीनगर पोलीस चौकीच्या मागील बाजूस असलेल्या सांकवाळ कोमुनिदादच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेली 64 पैकी सुमारे 18 घरे बुधवारी जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर उर्वरित बांधकामे हटवण्याची कारवाई काल सकाळपासून सुरू करण्यात आली. दिवसभरात 46 घरे पाडण्यात आली, अशी माहिती सांकवाळ कोमुनिदादचे अध्यक्ष प्रताप म्हार्दोळकर यांनी दिली. बेकायदेशीर बांधकामे हटवताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, कोमुनिदाद जमिनीवरील घरे कधीही पाडली जाणार नाहीत, या गैरसमजात कोणी राहू नये, असेही म्हार्दोळकर म्हणाले.
बुधवारपासून बेकायदा घरे हटवण्यास सुरुवात झाली होती. लोकांनी साहित्य बाहेर काढल्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने घरे जमीनदोस्त करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यातील 18 बेकायदा घरे बुधवारी पाडण्यात आली होती.
काल सकाळपासून कारवाईला पुन्हा सुरुवात करून उर्वरित 46 बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे काम पूर्ण करण्यात आले.
दोन वर्षांत घरांची संख्या 64 वर
या जमिनीत पूर्वी फक्त दोन-तीन बांधकामे होती; तेव्हा आम्ही बांधकामे न करण्याची सूचना केली होती; परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. गेल्या दोन वर्षांत बांधकामांची संख्या 64 झाली. सर्वे करताना तेथील काहीजणांनी आम्हाला शिवीगाळ करून धमक्या दिल्या. या जमिनीवरील 32 घरमालकांची नावे मिळतात, तर 32 अज्ञात आहेत. चार बांधकामे स्लॅबची आहेत. काही घरांना वीज, पाणी जोडणी होती. अशा जोडण्या मिळाल्यावर घरे कायदेशीर झाल्याचा गैरसमज संबंधितांचा होतो, असे प्रताप म्हार्दोळकर म्हणाले.
बेकायदा बांधकामांना अभय नको
कोमुनिदाद कायद्यात काही सुधारणा झाल्या असतील; पण कोमुनिदाद जमिनीवरील बेकायदेशीर घरे नियमित करण्याची तरतूद नाही, असे प्रताप म्हार्दोळकर यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी बेकायदेशीर घरे नियमित करण्यासाठी कायदा दुरुस्ती करण्याचे विधान केले असेल, परंतु तो कायदा लागू करावा लागेल. खरे तर सरकारने अशा बेकायदा बांधकामांना अभय देता कामा नये, असेही म्हार्दोळकर म्हणाले.
मायमोळेतही 3 बेकायदा घरे पाडली
साईनगर, वरुणापुरी-मायमोळे येथील शेतजमिनीत अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे उभारलेल्या चार घरांपैकी तीन घरांवर मुरगाव पालिकेने बुलडोझर फिरविला. ज्या शेतजमिनीत बेकायदेशीर घरे उभारण्यात आली, तेथूनच सार्वजनिक बांधकामच्या रस्ते विभागामार्फत रस्ता करण्यात येणार असल्याने ही घरे पाडण्यात आली.
मुरगाव पालिका प्रभाग 18 मधील साईनगर येथील शेतजमिनीत बिगरगोमंतकीयांनी बेकायदेशीर 4 पक्की घरे उभारली होती. सदर चारही घरे बेकायदेशीर असल्याने मुरगाव पालिकेने ती पाडण्याचा आदेश जारी केला होता. त्यातील एकाने न्यायालयात जाऊन स्थगिती मिळविली. त्यामुळे काल सकाळी मुरगाव पालिकेने चार पैकी तीन घरे बुलडोझरद्वारे जमीनदोस्त केली. या जागेवरून सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता बांधणार आहे. तेथेच बेकायदेशीर घरे उभारली असल्याने रस्त्याला अडथळा निर्माण झाला होता. अखेर मुरगाव पालिकेने कडक कारवाई करून तीन बेकायदेशीर घरे जमीनदोस्त केली.