झिंबाब्वे क्रिकेटची दशा अन् दिशा

0
144

– धीरज गंगाराम म्हांबरे

अनेक बड्या क्रिकेटपटूंची कारकीर्द झिंबाब्वेतील अस्थिर राजकीय स्थितीमुळे अकाली संपली. तसेच झिंबाब्वेचा कसोटी दर्जादेखील काही काळासाठी निलंबित करण्यात आला होता. यंदाच्या श्रीलंका दौर्‍यापर्यंत या संघाचे भविष्य अंधकारमय वाटत होते. एका दौर्‍याने त्यांना जोमाने पुढे सरण्याची ताकद दिली आहे.

झिंबाब्वेचा संघ नुकताच श्रीलंका दौर्‍यावर येऊन गेला. येताना रिकाम्या हाताने आलेल्या या ‘दुबळ्या’ संघाने जाताना मात्र भरभरून नेले. झिंबाब्वेचा लंका दौरा निश्‍चित झाला त्यावेळी भारताच्या लंका दौर्‍यापूर्वी फलंदाजी तसेच गोलंदाजीचा चांगला सराव होईल, अशीच भावना लंकेच्या खेळाडूंमध्ये होती. पण दौरा संपेपर्यंत झिंबाब्वेने श्रीलंकेवर आत्मपरीक्षणाची वेळ आणली आहे. कसोटीत १० व्या, वनडेत ११ व्या व टी-२० मध्ये १२ व्या स्थानावर असलेल्या या देशातील क्रिकेटला आशेचा किरण या लंका दौर्‍यातून दिसला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-२ असा मिळविलेला विजय व एकमेव कसोटीत दाखवलेली जिगरबाज वृत्ती झिंबाब्वेच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरणार आहे. ऑक्टोबर महिन्यात झिंबाब्वेचा संघ वेस्ट इंडीज दौर्‍यावर जाणार आहे. विंडीजचा संघ ‘बलाढ्य’ राहिलेला नसला तरी मायदेशात व झिंबाब्वेपेक्षा तरी नक्कीच सरस आहे. त्यामुळे आशिया खंडातील फिरकीला पोषक खेळपट्‌ट्यांवर फिरकीपटूंची फौज घेऊन यशस्वी ठरलेल्या झिंबाब्वेला विंडीजमधील संथ खेळपट्‌ट्यांवर निभाव लागण्यासाठी वेगळी रणनीती आखावी लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर झिंबाब्वेचा संघ नवखा असला तरी त्यांच्या क्रिकेट इतिहासाला शंभराहून जास्त वर्षांची परंपरा आहे. र्‍होडेशियाने (आत्ताचा झिंबाब्वे) १९०४ ते १९३२ व १९४६ ते मुक्तीपर्यंत सातत्याने दक्षिण आफ्रिकेतील देशांतर्गत स्पर्धा असलेल्या करी कप स्पर्धेत खेळला आहे. युनायटेड किंगडमकडून १९८० साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास वर्षभरातच आयसीसीने त्यांच्या क्रिकेटची दखल घेत २१ जुलै १९८१ रोजी त्यांना आपले सलग्न सदस्यत्व बहाल केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थिरावत असतानाच १९८३ साली झिंबाब्वेने आपली पहिली विश्‍वचषक स्पर्धा खेळली. नवखा संघ असल्याने अपेक्षांचे ओझे या संघावर नव्हते. साखळी फेरीत तर सर्वच संघांनी झिंबाब्वेविरुद्धचा विजय गृहितच धरला होता. बहुतांशी तसेच झाले. परंतु स्पर्धेबाहेर जाताजाता त्यांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाला मात्र तडाखा दिला. या पराभवामुळे कांगारूंचे काही वाकडे झाले नसले तरी झिंबाब्वेने विश्‍वचषकातील आपल्या पहिल्या विजयाची नोंद एखाद्या कमी ताकदवान किंवा बेभरवशी संघाविरुद्धच्या विजयाने न करता ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला नमवून केली हे विसरून चालणारे नाही.
१९८७ च्या विश्‍वचषकात झिंबाब्वेच्या हाती काही लागले नाही. १९९२ मध्ये त्यांनी इंग्लंडला नमविले खरे, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कसोटी दर्जा मिळविणारा नववा संघ म्हणून १९९२ साली झिंबाब्वेला आयसीसीने पूर्ण सदस्यत्वाचा दर्जा दिला. यावेळी इतर सर्व कसोटी देशांनी आयसीसीच्या या निर्णयावर टीकादेखील केली. आयसीसीने धिसाडघाईने निर्णय घेतल्याचे यावेळी अनेकांचे मत होते. झिंबाब्वेने आपल्या कामगिरीने या सर्वांचे म्हणणे खरे ठरवले. पहिल्या ३० कसोटी सामन्यांत केवळ १ विजय त्यांच्या हाती लागला. १९९२ ते १९९६ हा कसोटी क्रिकेटमधील प्रारंभीचा काळ त्यांच्यासाठी खूपच खडतर होता. १९९७ सालापासून त्यांच्या सुवर्णकाळाची सुरुवात झाली. ग्रांट फ्लॉवर, अँडी ब्लिग्नॉट, हिथ स्ट्रीक, मरे गुडविन, डेव्हिड हॉटन, ऍलिस्टर कॅम्पबेल, पॉल स्ट्रँग या प्रतिभाशाली खेळाडूंसह रिव्हर्स स्वीपचा तज्ज्ञ अँडी फ्लॉवर, हॅट्‌ट्रिकवीर ऍडो ब्रँडस, सलामीचा फलंदाज व नव्या चेंडूने वेगवान गोलंदाजी करणारा नील जॉन्सन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतानाच झिंबाब्वे क्रिकेटला चांगले दिवस दाखवले. नव्वदचे दशक संपत असताना झिंबाब्वेने पाकिस्तानला कसोटीत मालिकेत धूळ चारली. याचवेळी देशातील राजकीय स्थिती बिघडल्यामुळे क्रिकेट संघाची कामगिरी झाकोळली गेली.
१९९९ च्या विश्‍वचषकात तर त्यांनी पाचवे स्थान मिळवून कमाल केली. याच स्पर्धेत त्यांनी भारताचा ३ धावांनी पराभव केला. तसेच पूर्ण क्षमतेनिशी खेळणार्‍या दक्षिण आफ्रिकेला ४८ धावांनी नमविले. या स्पर्धेनंतर निवृत्ती स्वीकारलेल्या नील जॉन्सनने फलंदाजीत ७६ धावा करतानाच गोलंदाजीत ३ बळी घेत विजयाचा शिल्पकार म्हणून मान मिळविला. केवळ निव्वळ धावगती कमी असल्यामुळे त्यांची उपांत्य फेरी हुकली. २००३ पासून त्यांच्या संघाला उतरती कळा लागली. देशातील वेगाने बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे खेळाडूंनी बंड केले. अँडी फ्लॉवर व झिंबाब्वेचा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू हेन्री ओलोंगा यांनी २००३ च्या विश्‍वचषकात देशातील राजकीय परिस्थितीचा विरोध करण्यासाठी आर्मबँड बांधल्याने त्यांची संघातून हकालपट्टी केली. त्यामुळे या द्वयीने तातडीने देश सोडणे पसंत केले. अनेक बड्या क्रिकेटपटूंची कारकीर्द झिंबाब्वेतील अस्थिर राजकीय स्थितीमुळे अकाली संपली. तसेच झिंबाब्वेचा कसोटी दर्जादेखील काही काळासाठी निलंबित करण्यात आला होता. यंदाच्या श्रीलंका दौर्‍यापर्यंत या संघाचे भविष्य अंधकारमय वाटत होते. एका दौर्‍याने त्यांना जोमाने पुढे सरण्याची ताकद दिली आहे.
आयसीसीच्या नवीन आर्थिक धोरणामुळे झिंबाब्वेला २० मिलियन डॉलर्स अतिरिक्त मिळणार आहेत. त्यामुळे आर्थिक संकटातून बाहेर पडणे त्यांच्यासाठी शक्य होणार आहे. आपले आर्थिक हित ध्यानात ठेवून इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेटची वाट धरलेला माजी कर्णधार ब्रेंडन टेलर व वेगवान गोलंदाज काईल जार्विस यांना पुन्हा झिंबाब्वे संघात सामावून घेण्यासाठी झिंबाब्वे क्रिकेटचे नवीन अध्यक्ष तावेंगवा मुकूहलानी यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. खेळाडूचे हित पाहून या नवीन प्रशासकाने काही नवीन उपक्रम राबविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. टेलर किंवा जार्विस यांच्यापैकी एकाला जरी संघात घेण्यात झिंबाब्वेचा संघ यशस्वी ठरला तर २०१९ च्या विश्‍वचषकासाठी पात्र ठरण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना नवीन बळ मिळणार आहे. सिकंदर रझा या पाकिस्तानी वंशाच्या खेळाडूच्या रूपात त्यांना चांगला फलंदाज मिळाला आहे. अनुभवी सलामीवीर हॅमिल्टन मासाकाद्झा जोडीला आहेच. त्यामुळे लंका दौर्‍यातून यश फ्लुक नसल्याचे दाखवून देण्यासाठी या दौर्‍यातील कामगिरीद्वारे प्रेरणा घेत सातत्य राखण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असेल.