झिंबाब्वेला नमवून भारताची हॅट्‌ट्रिक

0
160

>> ‘बी’ गटात अव्वलस्थान

>> शुभमन-देसाईची चमकदार कामगिरी

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या अंडर-१९ विश्‍वचषक स्पर्धेत भारताने काल शुक्रवारी आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात झिंबाब्वेवर दहा गडी राखून विजय मिळविला. तसेच या विजयामुळे सलग दोन सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला दहा गडी राखून पराभूत करण्याच्या करण्याच्या इंग्लंडच्या २००८ मधील विक्रमाशी भारताच्या अंडर-१९ संघाने बरोबरी साधली.

बाद फेरीपूर्वी मधल्या फळीतील फलंदाजांना फलंदाजीचा सराव मिळावा यासाठी निमयित सलामीवीरांऐवजी शुभमन गिल आणि हार्विक देसाई यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. गिल याने केवळ ५९ चेंडूंत १४ चौकार व १ षटकारासह नाबाद ९० धावा चोपल्या तर हार्विकने नाबाद ५६ धावा केल्या. या दोघांच्या बळावर भारताने १७० चेंडू राखून विजयाला गवसणी घातली.

तत्पूर्वी, झिंबाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांना फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही. झिबाब्वेच्या संघाने ४८.१ षटकांमध्ये सर्वबाद १५४ धावा केल्या. भारताकडून डावखुरा फिरकीपटू अनुकूल रॉयने झिंबाब्वेचे सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर अभिषेक शर्मा आणि अर्शदीपने प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले. पहिले दोन्ही सामने जिंकून भारताने यापूर्वीच बाद फेरीत प्रवेश केला असून कालच्या विजयासह भारतीय संघ ‘बी’ गटात अव्वल राहिला आहे. कालच्या अन्य सामन्यांत पाकिस्तानने श्रीलंकेचा ३ गड्यांनी तर कांगारुंनी पीएनजीचा ३११ धावांनी पराभव केला.

धावफलक
झिंबाब्वे ः ग्रेगरी डॉलर त्रि. गो. मावी ४, वेस्ली माधेवेरे त्रि. गो. पराग ३०, डिऑन मायर्स झे. शॉ गो. अर्शदीप १०, मिल्टन शुंबा यष्टिचीत देसाई गो. रॉय ३६, लियाम रॉचे त्रि. गो. रॉय ३१, रॉबर्ट चिमहिन्या पायचीत गो. रॉय ०, तिनाशे नेनहुन्झी पायचीत गो. अभिषेक १४, ऍलिस्टर फ्रॉस्ट यष्टिचीत देसाई गो. अभिषेक ७, टॉन हॅरिसन पायचीत गो. अर्शदीप ८, एन्कोसिलाटी नुंगू त्रि. गो. रॉय २, जोनाथन कोनोली नाबाद २, अवांतर १०, एकूण ४८.१ षटकांत सर्वबाद १५४
गोलंदाजी ः शिवम मावी ७-०-३०-१, कमलेश नागरकोटी ८-०-३५-०, शिवा सिंग ८-१-१६-०, अर्शदीप सिंग ७-०-१०-२, रियान पराग ५-०-१७-१, अभिषेक शर्मा ६-०-२२-२, अनुकूल रॉय ७.१-१-२०-४
भारत ः हार्विक देसाई नाबाद ५६, शुभमन गिल नाबाद ९०, अवांतर ९, एकूण २१.४ षटकांत बिनबाद १५५
गोलंदाजी ः लियाम रॉचे ६-२-२७-०, एन्कोसिलाटी नुंगू ६-०-४४-०, डिऑन मायर्स २.४-०-२६-०, वेस्ली माधेवेरे २-०-१४-०, टॉन हॅरिसन १-०-१२-०, जोनाथन कोनोली १-०-९-०, रॉबर्ट चिमहिन्या २-०-२०-०, मिल्टन शुंबा १-०-३-०