झारखंड विधानसभेच्या तिसर्या टप्प्याच्या निवडणुकीत काल सुमारे ६१ टक्के एवढे मतदान झाले. काल या राज्यातील ८ जिल्ह्यांमधील १७ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. तर विभाजनवाद्यांनी मतदानावर बहिष्काराची हाक देऊनही जम्मू-काश्मिरमधील तिसर्या टप्प्याच्या निवडणुकीत ५८ टक्के एवढे मतदान झाले.गेल्या ५ रोजी जम्मू-काश्मिरमधील ४ दहशतवादी हल्ले होऊन त्यात ११ जवान शहीद झाले होते. या पार्श्वभूमीवर कालच्या मतदानास मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. काल या राज्यातील १६ मतदारसंघांसाठी शांततेत मतदान झाले. त्याआधी सुमारे ४०० जणांना सावधगिरी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
बुदगाम, पुलवामा, बारामुल्ला या जिल्ह्यांमधील १६ मतदारसंघांमध्ये एकूण ५८ टक्के मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त उमंग तरुला यांनी पत्रकार परिषदेत दिली. एकूण १४४ उमेदवारांचे भवितव्य कालच्या मतदानामुळे सीलबंद झाले आहे.