जम्मू व काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीअंती त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून मुफ्ती महंमद सईद यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे, तर भाजपाने दुसरा मोठा पक्ष म्हणून राज्यात आपले स्थान बळकट केले आहे. झारखंडमध्ये मात्र भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या असून सरकार स्थापनेच्या दिशेने प्रयत्न चालवले आहेत.जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला हे सोनावर मतदारसंघात पराभूत झाले, मात्र बीरवाह मतदारसंघात त्यांना विजय मिळाला. २००८ मधील निवडणुकीत राज्यात सर्वांत मोठा पक्ष बनलेल्या त्यांच्या नॅशनल कॉन्फरन्सला यावेळी मतदारांचा फार कमी प्रतिसाद मिळाला.
पीडीपीचे नेते मुफ्ती महंमद सईद हे अनंतनागमधून विजयी झाले आहेत. एकेकाळचा फुटीर नेता सज्जाद गनी लोण याने नॅशनल कॉन्फरन्स सरकारमधील मंत्री चौधरी महंमद रमझान यांचा हांडवारात पराभव केला. राज्याचे उपमुख्यमंत्री ताराचंद (कॉंग्रेस) यांचा भाजपचे कृष्णलाल यांनी छांब मतदारसंघात चौदा हजार मतांनी पराभव केला.
झारखंडमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा दुसर्या स्थानी आहे. भाजपा व अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेने यावेळी एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. ८१ सदस्य संख्या असलेल्या या विधानसभेतील बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ४२ जागांच्या दिशेने या आघाडीने वाटचाल चालवली आहे. भाजपाला स्पष्ट बहुमत प्राप्त करता आले तर राज्यातील हे पहिलेच बहुमताचे सरकार असेल.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे बेरहैट मतदारसंघातून विजयी झाले, तर दुमका या त्यांच्या सध्याच्या मतदारसंघात मात्र ते पराभूत झाले. तीनवेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवलेले भाजपचे ज्येष्ठ नेते अर्जुन मुंडा हे खर्सावान येथून पराभूत झाले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवर दास हे जमशेदपूर पूर्वमधून विजयी झाले. भाजपच्या साथीने निवडणूक लढणार्या एजेएसयूचे प्रमुख व माजी उपमुख्यमंत्री सुदेश महातो हे सिली या त्यांच्या मतदारसंघातून पराभूत झाले. तेथे ते गेली पंधरा वर्षे आमदार होते.
झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) ने काही जागांवर यश संपादन केले असले तरी त्या पक्षाचे प्रमुख व झारखंडचे पहिले मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी हे गिरीधमधून पराभूत झाले. धानवर मतदारसंघात मात्र त्यांनी आघाडी घेतली. जय भारत समता पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री मधू कोडा हे मझगाव मतदारसंघात पराभूत झाले, तर त्यांची पत्नी गीता कोडा यांनी जगंथपूर जागा कायम राखली. झारखंडमध्ये भाजपने ७२ जागा लढवल्या होत्या, तर एजेएसयूने आठ जागा लढवल्या होत्या. एलजेपीने एक जागा लढवली होती. २००९ च्या निवडणुकीत भाजपने राज्यात १८ जागा जिंकल्या होत्या.