>> अमलीपदार्थविरोधी पथकाची रेल्वे स्थानकाबाहेर कारवाई
परराज्यातून सुमारे ६ लाख रुपयांचा गांजा घेऊन गोव्यात आलेल्या झारखंड येथील मुस्कान रोहित कारूवा (१९ वर्षे) या युवतीला गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने करमळी रेल्वे स्थानकाबाहेर काल अटक केली. अमलीपदार्थांचा व्यवहार करणार्या परराज्यातील एका व्यक्तीने सदर युवतीला अमलीपदार्थ घेऊन गोव्यात पाठविले होते. त्या युवतीकडून सुमारे ६ किलो गांजा हस्तगत करण्यात आला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अमलीपदार्थाची किंमत सुमारे सहा लाख रुपये एवढी आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अमलीपदार्थविरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी अमलीपदार्थप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपींकडून परराज्यातून अमलीपदार्थ पाठविला जातो, अशी माहिती प्राप्त झाली होती.
ही माहिती प्राप्त झाल्यानंतर गोव्यात पाठविणार्या हस्तकाचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. परराज्यातून गोव्यात अमलीपदार्थ पाठविणार्या हस्तकाशी बोगस ग्राहकाच्या आधारे संपर्क साधण्यात आला. त्याने रेल्वेतून एका युवतीकडे अमलीपदार्थ पाठविले. तसेच, त्या युवतीबाबत माहिती दिली. सदर युवती रेल्वेतून करमळी स्थानकावर उतरल्यानंतर अमलीपदार्थ विभागाच्या पथकाने तिला ताब्यात घेऊन तिची झडती घेतली असता, तिच्याकडे अमलीपदार्थ आढळून आले.