ज्वालामुखीच्या तोंडावर

0
162

मे महिन्यातील ६३ रुग्णांच्या तुलनेत जून महिन्यात राज्यात कोरोनाचे १२४३ रुग्ण सापडले आहेत. गेल्या अकरा दिवसांतच राज्यामध्ये कोरोनाचे नवे ६३३ रुग्ण सापडले. म्हणजे सरासरी दिवसाला ५८ व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या. नवे रुग्ण सापडण्याचे हे प्रमाण सध्याच्या सरासरीनुसार असेच सुरू राहिले तर या महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात आणखी कमीत कमी १७०० रुग्णांची भर पडेल. म्हणजे राज्याची एकूण रुग्णसंख्या जी सध्या १३०० पार गेलेली आहे, ती या महिन्याअखेरीलाच ३ हजारांची संख्या सहज पार करील.
राज्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागताच एकाएकी कोरोना रुग्णांना बरे झाल्याचे सांगून केंद्र सरकारच्या नव्या एस. ओ. पी. नुसार चाचणी न करता घरी पाठवण्याचे प्रमाण सध्या राज्य सरकारने वाढवले आहे. जून महिन्यामध्येच एकाएकी मोठ्या संख्येने रुग्ण बरे व्हायला सुरूवात झालेली दिसते ती त्यामुळेच. राज्यात रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण सध्या ४८.३ टक्के दिसते. ते जमेस धरले तरीदेखील सध्याच्या सरासरी सातशे ऍक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत या महिनाअखेर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्याच्या सरासरीनुसारच किमान दीड हजारावर जाईल. गेल्या काही दिवसांत राज्याच्या कानाकोपर्‍यातून आढळत असलेले वाढते नवे रुग्ण पाहता येणार्‍या दिवसांत असे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाणही अधिक वाढण्याची चिन्हे आहेत, ती वेगळीच. म्हणजेच सरकार काहीही म्हणो, कोरोनाचे संकट आता आपल्या आटोक्याबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
जूनच्या पहिल्या पंधरवड्यात नवे ५२० रुग्ण सापडले, तर उत्तरार्धात ७२३. म्हणजे जून महिन्यात राज्यात कोरोनाचे तब्बल १२४३ रुग्ण सापडले. विशेष म्हणजे ते विशिष्ट भागामध्ये नव्हे, तर गोव्याच्या कानाकोपर्‍यातून सापडत आहेत. मात्र, तरी देखील राज्यात कोरोनाचा सामाजिक संसर्ग असल्याचे स्वतःचे विधान मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले. अर्थात, त्यांनी हे विधान मागे घेणे आणि राज्यात पर्यटन व्यवसाय सुरू करण्यास मान्यता देणे या दोन्ही गोष्टी परस्पर संबंधित आहेत हे स्पष्ट आहे. राज्यात पर्यटक येण्यासाठी गोवा कोरोनापासून पूर्ण सुरक्षित आहे असे चित्र निर्माण व्हायला हवे त्यासाठीच त्यांना हे घुमजाव करावे लागले आहे. आकडेवारीच्या खोलात जाताच आपल्याला हा सामाजिक संसर्ग नसल्याचे कळून चुकले असे जर त्यांना म्हणायचे असेल तर आधी आकडेवारी न तपासता एवढे बेजबाबदार विधान कसे केलेत हा प्रश्न निश्‍चितच विचारला जाऊ शकतो. खरे तर कोरोनाची एकूण आकडेवारी आणि प्रसार राज्यामध्ये सामाजिक संसर्ग झाल्याचेच पावलोपावली सूचित करतो आहे. ते जर खोटे असेल तर दिवसागणिक नवनव्या गावांमध्ये आढळणारे कोरोना रुग्ण कुठून कसे बाधित झाले त्याचा तपशील सरकार का उघड करीत नाही? आरोग्य खात्याची ‘आयसोलेटेड केसेस’ ची व्याख्या काय? ही जी काही लपवाछपवी आरोग्य खात्याने सातत्याने चालवलेली आहे ती दिवसेंदिवस सरकारचे अधिकाधिक वस्त्रहरण करीत चालली आहे.
कोरोनाच्या राज्यातील सद्यस्थितीनुसार दक्षिण गोव्यामध्ये त्याचे प्रमाण उत्तरेपेक्षा अधिक दिसते. मांगूर, मांगूरशी संबंधित आणि वास्कोच्या विविध भागांतील रुग्णांची एकूण संख्याच १ जुलैपर्यंत ६११ वर गेलेली आहे. शेजारच्या जुवारीनगर झोपडपट्टीतील ४८ रुग्ण जमेस धरल्यास ही संख्या ६५९ भरते. म्हणजे राज्यातील एकूण रुग्णांच्या ४७.५ टक्के रुग्ण हे वास्को परिसरातच सापडले आहेत. सुरवातीला मांगूर हिल आणि वास्कोपुरता कोरोना मर्यादित होता. नंतर कुडतरी, आंबेली, लोटली, मडगाव करीत सालसेतमध्ये तो पसरत गेला. आता पोलिसांच्या कृपेने तो फोंड्यात आला आहे. फोंडा पोलीस स्थानकातील पोलिसांच्या कोविड चाचण्या झाल्या, त्यात १६ पोलीस बाधित आढळले आहेत. आता त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती या सार्‍यांच्या चाचण्या घेण्याचे आव्हान आरोग्य खात्यापुढे उभे राहिले आहे. म्हणजे ही संख्या अधिक वाढणे अपरिहार्य आहे.
भाजपच्या दक्षिण गोव्यातील आमदाराची पत्नी व मुलेही काल कोरोनाबाधित आढळली आहेत. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या दहा आमदारांची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली होती, त्यामुळे आमदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कोरोना म्हणजे विशेष काही नाही, सर्दीसारखाच साधा आजार आहे असे हीच नेतेमंडळी काही दिवसांपूर्वी जनतेला सांगत होती. मग आता का तंतरली आहे? तिकडे भाजप प्रदेशाध्यक्षांच्या गावात पीर्णमध्ये कोरोनाबाधित आढळल्याने शेजार्‍यापाजार्‍यांच्या कोविड चाचण्या त्यांनी करून घेतल्या. मुख्यमंत्र्यांच्या साखळीमध्ये रुग्णसंख्या ३१ वर गेली आहे. ती अजून वाढण्याची शक्यता आहे. कोरोना आता बेदरकार नेत्यांच्या बुडाशी पोहोचलेला आहे.
दक्षिण गोव्याच्या किनारपट्टीच्या भागामध्ये कोरोनाचा प्रसार मोठा आहे. असे असताना सरकारने पर्यटनाला चालना देण्याच्या नावाखाली हॉटेल्स सुरू करण्याचा आततायी निर्णय घेतला आहे. उद्या हे पर्यटक आणि हॉटेल कर्मचारी बाधित होऊन सर्वत्र कोरोना फैलावत नेऊ लागले तर त्याची जबाबदारी पर्यटनमंत्री घेणार आहेत काय?
नुकताच ताळगावच्या कामराभाटात कोरोनाबाधित आढळून आला आहे. म्हणजे जुवारीनगर, इंदिरानगर, मोतीडोंगर, कामराभाट असे कोरोनाचे सुप्त ज्वालामुखी आता धगधगू लागले आहेत. सरकारने तेथेही हलगर्जीपणा केला तर संसर्गाचा लाव्हा सर्वत्र फैलावत जायला वेळ लागणार नाही. मांगूरहिलची पुनरावृत्ती होऊ द्यायची नसेल तर सरकारने आपले सारे लक्ष कोरोनावर केंद्रित करणे आवश्यक आहे. त्याला क्षुल्लक मानाल तर पस्तावाल हेच त्याचा वाढता फैलाव पदोपदी सांगतो आहे.