ज्योतिरादित्यांचे बंड

0
144

कॉंग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल रंगपंचमीच्या दिवशी आपले रंग दाखवत कॉंग्रेसला रामराम ठोकला. पिता कै. माधवराव शिंदे यांच्या जयंतीचेही औचित्य त्यांनी या पक्षांतरासाठी साधले. ज्योतिरादित्यांनी राजीनामा सादर करताच त्यांच्या समर्थक आमदार व मंत्र्यांची पक्षातून गळती सुरू झाली. या सार्‍याचा परिणाम म्हणून मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार तर संकटात आलेच आहे, परंतु केवळ तेवढ्यापुरता हा परिणाम सीमित राहणार नाही. ज्योतिरादित्यांसारखा तडफदार तरुण नेता अठरा वर्षांची साथ सोडून चालता होणे हा कॉंग्रेससाठी मोठा हादरा आहे. मध्य प्रदेशमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या विजयाचे ते एक महत्त्वाचे शिल्पकार होते, परंतु राज्यातील कमलनाथ – दिग्विजयसिंह – ज्योतिरादित्य या पक्षांतर्गत संघर्षात ज्योतिरादित्य यांची उपेक्षाच होत राहिली, त्यातून या बंडाची बीजे कधीच रोवली गेली होती. पक्षाच्या यशात मोठा वाटा असूनही मुख्यमंत्रिपद तर त्यांना मिळाले नाहीच, परंतु प्रदेश कॉंग्रेसाध्यक्षपदीही त्यांची वर्णी लागली नाही. राज्यसभेच्या येत्या निवडणुकीसाठी देखील त्यांच्या नावाचा विचार झालेला नव्हता. पक्षाची एकूण स्थिती पाहाता आता आपल्याला येथे भवितव्य नाही अशी त्यांची धारणा झाली तर त्यांना सर्वस्वी दोष देता येणार नाही. ते आणि त्यांच्या समकालीन तरुण नेत्यांनी वेळोवेळी हीच उपेक्षेची भावना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे व्यक्त केलेली आहे. राहुल गांधी जोपर्यंत पक्षनेतृत्वात सक्रिय होते, तोपर्यंत या तरुण तुर्कांची सद्दी चालली, परंतु जेव्हा राहुल यांनी नेतृत्वाकडे पाठ फिरवली आणि पुन्हा एकदा सोनिया पर्व सुरू झाले, तेव्हा या तरुण नेत्यांची पक्षांतर्गत गळचेपी पुन्हा सुरू झाली होती. ज्योतिरादित्य, सचिन पायलट, मिलिंद देवरा, जितीन प्रसाद वगैरे तरुण नेत्यांची कॉंग्रेस पक्षात हीच शोकांतिका बनलेली आहे. ज्योतिरादित्यांनी तर आपल्याच पक्षाच्या सरकारवर तोफा डागण्याची एकही संधी सोडली नाही. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीपासून ढिसाळ प्रशासनापर्यंत हरेक गोष्टीवर त्यांनी टीकेची झोड उठवली होती. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कौतुकाची संधीही ते दवडत नव्हते. काश्मीरचे कलम ३७० खालील विशेषाधिकार हटवले गेले, तेव्हा ज्योतिरादित्य यांनी जाहीरपणे मोदी सरकारचे समर्थन केले होते हे येथे लक्षात घ्यायला हवे. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हूडांचे चिरंजीव दिपेंदर हुडा यांनी देखील तेव्हा मोदी सरकारचे गुणगान गायिले होते. मिलिंद देवरा यांनी ‘हाऊडी मोदी’च्या यशाचे गोडवे गायिले होते. या सगळ्याचा अर्थ स्पष्ट आहे. कॉंग्रेस नेतृत्वाने पक्षातील तरुण तुर्कांच्या हिताकडे लक्ष दिले नाही तर ज्योतिरादित्यांच्या मार्गाने इतर नेतेही जाऊ शकतात याचे सूतोवाच या बंडाने केले आहे. ज्योतिरादित्यांनी आपल्या राजीनामापत्रामध्ये ‘पक्षात राहून देशाची व राज्याची सेवा करणे आता अशक्य’ बनले असल्याचे म्हटले आहे ते सूचक आहे. गेले वर्षभर आपल्या या निर्णयाची तयारी चालली होती असेही ज्योतिरादित्यांनी सोनियांना सुनावले आहे. कॉंग्रेस पक्ष यानंतर तरी जागा होणार आहे की नाही? परंतु कॉंग्रेसमधील दुढ्ढाचार्यांचे कोंडाळे सोनियांच्या आडून स्वतःचा पक्षावरील वरचष्मा हटवू द्यायला तयार नाही हेच या पक्षाच्या अवनतीचे खरे कारण आहे. पक्षातील विचारवंत नेते शशी थरूर यांनी अलीकडेच कॉंग्रेसने अंतर्गत निवडणूक घेऊन नवे नेतृत्व निवडावे अशी अपेक्षा जाहीर मुलाखतींतून व्यक्त केलेेली आहे. नुकतेच मोदींनी त्यांचे वाढदिवसाचे निमित्त साधून अगत्यपूर्वक अभीष्टचिंतन केले. कॉंग्रेसच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या एकेका धुरिणाला जवळ करण्याचे आणि त्यांच्या मदतीने मागल्या दाराने का होईना ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ करण्याचे स्वप्न भाजप नेते पाहात आहेत. ज्योतिरादित्यांच्या बंडाला भाजपची फूस असेल हे तर स्पष्ट आहे. त्यांच्या समर्थक आमदारांची ज्या प्रकारे कर्नाटकमध्ये खिदमतगारी चालली आहे ते पाहिल्यास या बंडाची मुळे कुठे आहेत हे उमगते. गेल्या पंधरा महिन्यांत कमलनाथ सरकार उलथवण्याचा प्रयत्न दोन वेळा झाला होता. आता ही तिसरी वेळ आहे आणि ती यशस्वी ठरत असल्याचे दिसते आहे. काही दिवसांपूर्वीच या बंडाची पूर्वतयारी म्हणून काही आमदारांनी जो दिल्ली दौरा केला, तेव्हाच कमलनाथ सरकारवर घोंगावत असलेल्या राजकीय संकटाची चाहुल लागली होती. दिग्विजयसिंगांनी पुत्राकरवी त्या बंडखोरांना तेव्हा माघारी आणले, परंतु आता या गळतीचे प्रमाणच एवढे मोठे आहे की कॉंग्रेससाठी आपले बुडते जहाज वाचवणे अशक्य बनले आहे. जनतेने निवडून दिलेल्या सरकारला अशा प्रकारे उलथवून मागल्या दाराने सत्ता स्थापन करणे, त्यासाठी अन्य पक्षांतील असंतुष्ट आमदारांना पक्षात घेऊन मंत्रिपदे बहाल करणे, आपल्या तिकिटावर पुन्हा निवडून आणणे हे तंत्र पक्षांतरबंदी कायद्यातील दोन तृतियांशच्या अटीतील पळवाट नव्हे, तर एव्हाना तिला हुलकावणी देण्याचा राजमार्ग बनलेला आहे. ज्योतिरादित्यांपाठोपाठ हा राजमार्ग आणखी कोणाकोणाला खुणावतो ते दिसेलच!