कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनी माजी मंत्री ज्योकीम आलेमाव आणि त्यांचे पुत्र युरी आलेमाव यांना कॉंग्रेस पक्षात प्रवेश देण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल दिली.
कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी गोव्यात खाजगी भेटीवर आल्या आहेत. ती संधी साधून आज शनिवार दि. २१ रोजी ज्योकीम व युरी आलेमाव हे पिता पुत्र कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी काल दिली.
माजी मंत्री आलेमाव यांनी कॉंग्रेस पक्षाने गत विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी केली होती. त्या निवडणुकीत आलेमाव यांना पराभवाला तोंड द्यावे लागते. त्या निवडणुकीनंतर आलेमाव यांचे पुत्र युरी यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश करून कार्य करण्यास सुरुवात केली होती. युरी आलेमाव यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा काही दिवसापूर्वी दिला आहे.
सोनिया व राहुल गांधी
विश्रांतीसाठी गोव्यात
कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांचे काल विश्रांतीसाठी गोव्यात आगमन झाले.
सोनिया गांधी यांना आरोग्य समस्या भेडसावत असल्याने कमी प्रदूषण असलेल्या ठिकाणी विश्रांतीला जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी गोव्यात विश्रांतीसाठी येण्याचा निर्णय घेतला. श्रीमती गांधी यांचा गोवा दौरा खासगी स्वरूपाचा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. श्रीमती गांधी यांना आरोग्याच्या कारणास्तव जुलै महिन्यात खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते.