ज्येष्ठ लेखक, पत्रकार शिरीष कणेकरांचे निधन

0
8

ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचे काल निधन झाले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. काल सकाळी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण या विषयांवर त्यांचे लेखन प्रसिद्ध होते. माझी फिल्लमबाजी, कणेकरी ही पुस्तके आणि कथाकथनाचे त्यांचे कार्यक्रम प्रसिद्ध झाले होते. आपल्या खास शैलीतून टोकदार लिखाण करणाऱ्या आणि समस्यांवर विनोदी शैलीतून बोट ठेवणारे लेखक शिरीष कणेकर हे आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

रायगड जिल्ह्यातील पेण हे शिरीष कणेकर यांचे मूळ गाव. 6 जून 1943 रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील रेल्वेमध्ये डॉक्टर असल्यामुळे भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानात त्यांचे संपूर्ण बालपण गेले. 1968 ते 1989 या दरम्यान त्यांनी इंग्रजी वृत्तपत्रात पत्रकारिता केली. याशिवाय ते मुक्त पत्रकारिता आणि मराठी वृत्तपत्रांत स्तंभलेखनही करीत होते.

‘यादों की बारात’, ‘शिरीषासन’, ‘सिनेमाबाजी’, ‘मुद्दे आणि गुद्दे’, ‘चहाटळकी’, ‘सूर पारंब्या’, ‘कणेकरी’, ‘लगाव बत्ती’, ‘आसपास’, ‘मेतकूट’, ‘चित्ररुप’, ‘फिल्लमबाजी’, ‘कल्चर व्हल्चर’ या नावांनी ते स्तंभलेखन करत. ‘कधीही दारु न प्यायलेला बेवडा’ या शीर्षकाने त्यांनी लिहिलेला केश्तो मुखर्जींवरचा लेख आजही लोकांच्या स्मरणात आहे. तिरकस लिहणे आणि जोरकसपणे मुद्दे मांडणे हे त्यांच्या लेखन शैलीचे वैशिष्ट्‌‍य. क्रिकेट, मनोरंजन विश्व आणि राजकारण हे तिन्ही त्यांचे आवडीचे विषय होते.