ज्येष्ठ मराठी अभिनेत्री, निर्मात्या, दिग्दर्शक स्मिता तळवलकर यांचे काल वयाच्या ५९ व्या वर्षी मुंबईतील जसलोक रुग्णालयात निधन झाले. गेली काही वर्षे त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या.
आपल्या दर्जेदार अभिनयामुळे रसिकप्रिय झालेल्या स्मिता तळवलकर यांची कारकीर्द दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून १९७२ साली सुरू झाली होती. त्यानंतर त्या रंगभूमी व चित्रपटांतील अभिनयाकडे वळल्या. ८३ साली रंगभूमीवर, ८५ साली मालिकांमध्ये व ८६ साली ‘तू सौभाग्यवती’ व ‘गडबड घोटाळा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केली.
‘तू तिथे मी’, ‘चौकट राजा’, ‘कळत नकळत’, ‘सातच्या आत घरात’, ‘आनंदाचे झाड’ या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. ‘पेशवाई’, ‘अवंतिका, ‘उंच माझा झोका’, ‘सुवासिनी’, ‘ऊन पाऊस’ अशा अनेक मालिकांची निर्मितीही त्यांनी केली होती. ‘सवत माझी लाडकी’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. त्या चित्रपटाला ५ राज्य पुरस्कार मिळाले.
तळवलकर यांच्या ‘तू तिथे मी’ आणि ‘कळत नकळत’ या दोन चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. ‘कळत नकळत’ ला चार राष्ट्रीय व नऊ राज्य पुरस्कार लाभले. ‘चौकट राजा’ला ९२ साली इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरामामध्ये निवडले गेले होते व त्यालाही १३ राज्य पुरस्कार मिळाले होते. ‘तू तिथे मी’ ला ५ फिल्मफेअर पुरस्कार, ४ स्क्रीन व्हिडिओकॉन पुरस्कार, १२ राज्य पुरस्कार व २ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
त्यांना स्वतःला अभिनयासाठी व्ही. शांताराम पुरस्कार, गदिमा पुरस्कार असे पुरस्कारही लाभले होते. तब्बल चाळीस मराठी मालिका आणि तीन हिंदी मालिकांतून त्यांनी अभिनय केला होता.
‘पेशवाई’, ‘नंदादीप’, ‘नुपूर’, ‘अवंतिका’, ‘उंच माझा झोका’, ‘ऊन पाऊस’, ‘अभिलाषा’, अशा मालिका विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी तळवलकर यांनी निर्मिल्या होत्या. बालाजी टेलिफिल्मच्या ‘मानो या ना मानो’ या मालिकेच्या चार भागांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते.
माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात काल सकाळी दहा वाजल्यापासून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.