ज्येष्ठ पत्रकार, इतिहास संशोधक व मडगावचे माजी नगराध्यक्ष वाल्मिकी फालेरो (71) यांचे काल दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी डेझी व भाऊ असा परिवार आहे.
वाल्मिकी फालेरो हे विविध नियतकालिके व दैनिकांतून लिहित असत. तरुण वयातच त्यांनी राष्ट्रीय वृत्तपत्रात लेखनास सुरुवात केली होती. ते अभ्यासू व धडाडीचे पत्रकार होते. इंडियन एक्स्प्रेससाठी गोव्याचे प्रतिनिधी काम करीत असतानाच, त्यांनी द इलेस्ट्रेटेड विकली, करंट विकली, मिरर या राष्ट्रीय नियकालिकांत लेखन केले होते. गोव्यात सुरू झालेल्या ‘द वेस्ट कोस्ट टाईम्स’ या इंग्रजी दैनिकाचे मडगावचे प्रतिनिधी होते.
वाल्मिकी फालेरो हे 1986 मध्ये मडगाव पालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले व नगराध्यक्ष बनले. ते उत्तम प्रशासक होते. गोवा मुक्ती काळातील घटनावर त्यांनी लिहिलेले ‘गोवा 1961 द कम्प्लिट स्टोरी ऑफ नॅशनलिझम ॲण्ड इन्टिग्रेशन’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले. होली स्पिरिट चर्चवर ‘सोरिंग स्पिरिट’ हे पुस्तक लिहिले होते.