प्रशासकीय प्रक्रियेत गेले तीन महिने रखडलेले ज्येष्ठ पत्रकारांचे निवृत्ती वेतन त्वरित जारी करण्याचे आदेश माहिती व प्रसिद्धी खात्याचे मंत्री मिलिंद नाईक यांनी काल संबंधितांना दिले. यासंदर्भात दैनिक नवप्रभाने रविवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व माहिती मंत्री मिलिंद नाईक यांनी त्याची त्वरित दखल घेऊन पुढील कार्यवाही केली आहे. या आठवड्याच्या आत या सर्व ज्येष्ठ पत्रकारांना त्यांचे गेल्या तीन महिन्यांचे थकलेले निवृत्ती वेतन मिळेल.पत्रकारांच्या मासिक निवृत्ती वेतनात ४ हजार रुपयांवरून ६ हजार रुपये अशी वाढ करण्यात आली असून अर्थ खात्याने या निवृत्ती वेतन योजनेचा फेरआढावा घेऊन नवी योजना तयार केली आहे. त्यानुसार प्रत्येक पत्रकाराला वैयक्तिकरित्याही या निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेता येईल. पत्रकारांना लॅपटॉप वितरीत करण्याची एक योजना सरकारने बनवलेली असून त्यासंदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली आहे. पत्रकारांसाठी गृहबांधणी योजनेचा एक प्रस्ताव असून त्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.