ज्येष्ठ नागरिकांची 1.29 कोटींची फसवणूक

0
4

>> कुडचडेतील सेंट्रल बँकेतील घोटाळा; चौघांच्या तक्रारी नोंद; नवे 17 तक्रार अर्ज

कुडचडे येथील ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करून कोट्यवधींचा घोटाळा केल्याप्रकरणी कुडचडे पोलिसांनी तन्वी वस्त व सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक आनंद जाधव (रा. सातारा) या दोघांना अटक केली असून, पोलीस तपासात 1.29 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला आहे. काल या प्रकरणी 17 जणांनी पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर तपासणीअंती त्यांना 51 लाख रुपयांना फसविल्याचे समोर आले आहे, अशी माहिती दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी काल दिली.

रोझालिना कुरैया (व्हडलेमळ, कुडचडे) यांनी दि. 25 रोजी दाखल केलेल्या तक्रारीत तन्वी वस्त हिने सेंट्रल बँकेत बोलावून अंदाजे 25 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने बदलून बनावट दागिने बँकेत ठेवून फसवणूक केल्याचे नमूद केले होते. पोलिसांनी तपास केल्यानंतर अंदाजे 18 लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले. त्यात सोनसाखळी, दोन सोन्याच्या व दोन हिरेजडीत बांगड्या, एक ब्रेसलेट मिळविण्यात यश मिळविले.
तन्वी वस्त ही बँकेची कायम कर्मचारी नसून, ती व्हिजन इंडियाची एजंट आहे. ती व बँक व्यवस्थापक आनंद जाधव या दोघांनी संगमनताने ही फसवणूक केल्याचे सुनीता सावंत यांनी स्पष्ट केले. कोणीही ग्राहक आल्यास आनंद जाधव हा तन्वीकडे पाठवित होता आणि तन्वी त्यांना भुलवून त्यांची रक्कम आपल्या वैयक्ति खात्यात वळवत असे. मुख्य गुन्हेगार बँकेचा व्यवस्थापक असल्याचे दिसून आले आहे, असेही सावंत यांनी
सांगितले.

आतापर्यंत 4 तक्रारी नोंद झाल्या आहेत आणि 17 जणांनी अर्ज केलेले आहेत. त्या 17 जणांची रक्कम 51 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
सुषमा ब्रिजेश अस्ताना (59) हिचे 21 लाख रुपये, स्टीवन फर्नांडिस यांचे 8 लाख रुपये व पास्कोल पेद्रू वाझ (83) याचे 1.40 लाख रुपये दुसऱ्या खात्यात वळवण्यात आले. हा प्रकार 20 जुलै ते 21 ऑक्टोबरच्या दरम्यान घडला.

संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आणखी कित्येक जणांच्या तक्रारी येत असून, त्या अनुषंगाने तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले. काल सुषमा, स्टीवन व पास्कोल यांनी केलेल्या तक्रारीनुसार तन्वी व बँक व्यवस्थापकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. 4 जणांच्या तक्रारींची शहनिशा केली आहे. नव्या 17 तक्रार अर्जांची तपासणी सुरू आहे, असेही सावंत यांनी सांगितले.