ज्येष्ठ कोकणी कवी आणि लेखक डॉ. भिकाजी घाणेकर यांचे निधन

0
19

ज्येष्ठ कवी तथा गीतकार, आरोग्यविषयक लेखक आणि बहुरंगी व्यक्तिमत्व डॉ. भिकाजी घाणेकर (७९) यांचे काल दि. २८ रोजी संध्याकाळी ६ वा. निधन झाले.

डॉ. घाणेकर यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून १९६६ मध्ये एमबीबीएसची पदवी घेतली होती. १९६८ ते २००० पर्यंत त्यांनी गोवा शासनाच्या आरोग्य खात्यात सेवा बजावली. स्वातंत्र्योत्तर काळात साहित्य, आरोग्य, समाजकार्य अशा उपक्रमात त्यांनी हिरिरीने भाग घेतला. वावराड्याचो इष्ट, सुनापरान्त, गुलाब, कोकण भारती यामधून त्यांनी सातत्याने लेखन केले.

रानफुलां, अमरगीतां, सदाफुली, गांधीजी, महाभारत गीतां, कृष्णगीतां, ख्रिस्तीगीतां, शाकुंतल, अशी त्यांची पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. तसेच सपनसुंदरी, त्या दिसा, सत्यम् शिवम सुंदरम, अशा सीडी निघाल्या आहेत. गोव्यातील १२ मंदिरांतील देवदेवतांवर त्यांनी लेखन केले आहे. सलग आठ वर्षे ते गोवा कल्चरल सोशल सेंटरचे अध्यक्ष होते. तीन वर्षे कला अकादमीच्या कार्यकारी मंडळावर कार्यरत होते. तीन वर्षे ते कोकणी भाषा मंडळाचे सचिव होते. २००५ मध्ये त्यांना राज्य पुरस्कार तर २०१० मध्ये त्यांना फादर थॉमस स्टीफन्स कोकणी पुरस्कार प्राप्त झाला होता.
आपल्या खुमासदार शैलीतील सूत्रसंचालनासाठी ते प्रसिद्ध होते. मांडो महोत्सवाचे ५१ वर्षे त्यांनी सूत्रसंचालन केले होते.