ज्येष्ठ कवी, स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांचे निधन

0
17

>> 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांकडून श्रद्धांजली

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, कवी, साहित्यिक नागेश रामदास नायक करमली (90) यांचे पाटो-रायबंदर येथील राहत्या घरी काल दुपारी निधन झाले. चार दिवसांपूर्वीच त्यांनी वयाची नव्वदी पूर्ण केली होती. नागेश करमली यांनी गोवा मुक्तिलढा आणि साहित्य, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, तसेच सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी 10 वाजता सांतईनेज-पणजी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1933 रोजी काकोडा येथे झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण मराठी आणि पोर्तुगीज भाषेतून घेतले. केपे येथे शिक्षण घेत असताना त्यांना साहित्याची गोडी लागली. त्यांना कविवर्य बाकीबाब बोरकर यांचेही मार्गदर्शन लाभले. शणै गोंयबाब यांचे साहित्यातून त्यांना वाचनाची गोडी लागली. त्यानंतर 1952 मध्ये कोकणी साहित्य लेखनाकडे वळले. त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी पहिली कविता लिहिली. वर्ष 1950 मध्ये नागेश करमली यांच्या वडिलाचे निधन झाल्यामुळे कुटुंबातील सर्वांत मोठा मुलगा म्हणून त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. त्यामुळे बालपणात त्यांना बराच संघर्ष आणि मेहनत करावी लागली.

स्वातंत्र्योत्तर काळात नागेश करमली यांनी खाण उद्योगात नोकरी सुध्दा केली. 1962 मध्ये कामगार चळवळीतही सहभाग घेतला. पाच वर्षे त्यांनी कामगार चळवळीत काम केले. 1966 वर्षापासून आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर स्टाफ आर्टिस्ट म्हणून नोकरीला सुरुवात केली. नागेशबाब यांनी मागील कित्येक वर्षे कोकणी भाषेच्या विकासासाठी लेखक, कार्यकर्ता, संघटक म्हणून कार्य केले.

कोकणी भाषा मंडळाचे संस्थापक सदस्य, अखिल भारतीय कोकणी साहित्य परिषदेशी संबंध, गोव्यात एके काळी गाजलेल्या लळितक या साहित्य दर्शनाच्या कार्यक्रमाचे प्रवर्तक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांना कोकणी भाषेबरोबर मराठी, हिंदी, इंग्लिश, पोर्तुगीज भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांनी उर्दू आणि बंगाली भाषेचा अभ्यास केला. कन्नड लिपीचा अभ्यास करून त्या लिपीतील कोकणी साहित्याशी संपर्क जोडला.
कोकणी पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, गोवा राज्य शिक्षण संस्थेच्या कार्यात त्यांनी सहभाग घेतला. गोवा सरकारच्या गॅझेटियर संपादक मंडळाचे सदस्य, गोवा स्वातंत्र्यसैनिकांच्या चरित्र कोशाच्या संपादन कार्यात सहभाग घेतला.
नागेश करमली यांनी कोकणी आणि मराठीमधून साहित्य निर्मिती केली. त्यांनी कविता लेखनाला प्राधान्यक्रम दिला. आकाशवाणीसाठी विविध प्रकारचे लेखन केले. त्यांचे जोरगत (1979) आणि सांवार (1979), वंशकुळाचे देणे असे कविता संग्रह प्रसिद्ध झाले.

नागेश करमली यांचा विविध पुरस्कारांनी सन्मान
1983 मधील कुडचडे येथील अखिल भारतीय कोकणी लेखक संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून कार्य
जोरगत कविता संग्रहाला कोकणी भाषा मंडळ आणि गोवा कला अकादमीचा राज्य साहित्य पुरस्कार.
1992 मध्ये वंशकुळाचे देणे कवितासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार.
भारत सरकारकडून 1972 साली स्वातंत्र्यसैनिक म्हणून ताम्रपत्राद्वारे गौरव.
2008 मध्ये नवी दिल्लीत तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते सन्मान.

मुक्तिलढ्यातील सहभाग
नॅशनल काँग्रेस गोवाच्या माध्यमातून नागेश करमली यांनी गोवा मुक्तिलढ्यात सहभाग.
15 सप्टेंबर 1954 मध्ये गोवा मुक्ती आंदोलनावेळी भूमिगत असताना रिवण येथे अटक.
मुक्तिलढ्यातील सहभागप्रकरणी लष्करी न्यायालयाकडून 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.
रेईश मागूश येथील तुरुंगात असताना तुरुंगातील स्वातंत्र्यसैनिकांचे अभ्यास मंडळा स्थापना आणि ‘जोत’ नावाचे कोकणी हस्तलिखित चालविले.
1959 मध्ये शिक्षा पूर्ण होण्याआधीच आग्वादच्या तुरुंगातून सुटका. त्यानंतरही गोवा मुक्तीसाठी वेगवेगळ्या स्वरूपात कार्य.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दु:ख झाले. गोवा मुक्तीसाठी त्यांनी दिलेले योगदान गोमंतकीयांच्या सदैव स्मरणात राहील. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

  • डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांचे निधन अंत्यत क्लेशदायक आणि दुःखदायक आहे. गोवा मुक्तिलढ्यातील नागेशबाब यांचे योगदान अनन्यसाधारण असेच होते. त्यांच्या जाण्याने आम्ही एका लढाऊ बाण्याच्या स्वातंत्र्यसैनिकाला, एक थोर कवी आणि सिद्धहस्त लेखकाला कायमचे मुकले आहोत. – श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री