मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे काल हृदयविकाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. चारच दिवसांपूर्वी ३० जानेवारी रोजी त्यांनी आपला ९३वा वाढदिवस साजरा केला होता. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी ही माहिती दिली. गुरुवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
रमेश देव यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये काम केले. त्यातही पत्नी सीमा देव यांच्यासोबतचे सारेच सिनेमे हिट झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. १९५६ साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खर्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. राजश्री प्रोडक्शनच्या १९६२ साली आलेल्या आरती या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. रमेश देव यांनी आतापर्यंत १८० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले.