ज्ञानोबा माऊऽली तुकाऽऽराम…

0
36
  • प्रा. रमेश सप्रे

दिवे घाटातून ही वारी सहजपणे सरकत वर जाते. ते दिव्य दृश्य देवांनाही दुर्लभ असेच असते. नि ती ध्वजारूढ अश्वांनी वेगानं दौडत घातलेली रिंगणं, त्या वारकऱ्यांच्या पताका, डोक्यावरची तुळशीवृंदावनं, घातलेल्या फुगड्या नि एकमेकाला अतीव आदरानं म्हटलेलं ‘माऊली माऊली!’ हीच खरी पंढरीची वारी आषाढी एकादशीची. त्यांच्या पावलात पावलं नि सुरात सूर मिसळून आपणही म्हणूया- ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल!’, ‘ज्ञानोबा माऊऽली तुकाराऽऽम! ज्ञानोबा माऊऽली तुकाऽऽराम!’

सत्संग चालू होता वारकरी संप्रदायाचा. आर्तपणे पण आत्मविश्वासाने सांगितले जात होते-
एवढा मोठा वारीचा सोहळा- पण कुणालाही निमंत्रण नाही;
अठरा पगड जातीचे वारकरी- पण कोणताही वाद नाही;
लाखों वारकऱ्यांचा मेळा- पण एकही उपाशी राहत नाही;
नव्वद वर्षं चालणाऱ्याचं वय- पण कसलाही त्रास नाही;
ऊन वारा पावसाशी सामना- पण कसलीही चिंता नाही;
एकवीस दिवस घराचा त्याग- पण घरच्यांची काळजी नाही;
शंभर गावांची माणसं एका दिंडीत- पण कसलाही दुजाभाव नाही!

  • मंडळी, ही आहे वारकरी संप्रदायाची ताकद!
    खरंच आहे, वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, भागवत संप्रदाय सारे एकच. भागवत ग्रंथाच्या माहात्म्यात स्वतः भक्तीची कथा येते. त्यावेळी ती तरुण आहे, पण तिचे पुत्र- ज्ञान नि वैराग्य हे मात्र वृद्ध, मरणासन्न असल्याचे वर्णन येते. खुद्द नारदांनाही याचे आश्चर्य वाटते. सनक-सनातन-सनंदन नि सनत्‌‍ या ब्रह्मकुमारांकडून श्रीमद्भागवताचा सप्ताह संपन्न होतो नि ज्ञान-वैराग्य या भक्तिपुत्रांना संजीवनी मिळते. भक्ती आनंदून म्हणते- ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.’
    ही भागवत-कथा पंढरीच्या वारीच्या माध्यमातून जिवंत होते. प्रत्यक्ष वारीत मात्र ज्ञान-भक्ती-वैराग्य यांचे प्रसन्न दर्शन होते. ज्ञानोबा माऊलीच्या मधुर शब्दात याचे वर्णन केले गेलेय-

कृष्ण हरी विष्णु गोविंद। या नामाचे निखळ प्रबंध।
माझी आत्मचर्चा विषद उदंड गाती॥
हे सारे फक्त आयोजित केलेल्या सत्संगातच घडत नाही तर संपूर्ण वारीत हे सतत घडत असते. हरिनामाचा गजर निरंतर सुरू असतो. नुसतं नामच दुमदुमून राहत नाही तर ज्ञानाच्या अंगाने होणारी प्रवचने- कीर्तनेही अखंड सुरू असतात. आणि या साऱ्याला उदंड गायनाची म्हणजे भावभावनांची महिरपही असते. हा मोठाच चमत्कार आहे! एवढा मोठा अडीचशे किलोमीटरचा पायी प्रवास, त्यात सामील होणारे लाखो वारकरी, वाटेत अनेक टप्प्यांवर विश्रांती-मुक्काम हे सारे चालू असताना कसलाही गोंधळ-गडबड नाही. सारे कसे स्वयंशिस्तीत घडणारे. जणू एखादी शोभायात्रा किंवा आनंदयात्रा! उगीच नाही अनेक ठिकाणच्या जागतिक विक्रमांत पंढरीच्या वारीचा समावेश असतो.

सारेजण ग्यानबा-तुकाराम म्हणत वाटचाल करत असले तरी प्रत्यक्ष वारीची वाटचाल ज्ञानोबापूर्वीची आहे. ज्ञानदेव-नामदेव-निवृत्तिनाथ यांनी आपल्या आध्यात्मिक अधिकाराने वारीला एक शिस्त लावली. स्वतः चालून वारीचा मार्ग प्रशस्त केला. त्यांच्या महासमाधीनंतर त्यांच्या पवित्र पादुकांची यात्रा सुरू झाली. पादुकांना आधी इंद्रायणी, नंतर चंद्रभागेत स्नान घालून, नंतर विठ्ठल माऊलीसमोर अभिषेक करून वारीची सांगता, अशी प्रथा रूढ केली. अलीकडच्या काळात हैबतराव (सु. तीनशे वर्षं) या वारकरी पंथाच्या मान्यवर प्रमुखांनी वारीचा मार्ग निश्चित केला, जो आजही पाळला जातो.
आता ज्ञानेश्वरांच्या पालखीपूर्वी (ज्येष्ठ व. 8) संत तुकारामांची पालखी निघते (ज्येष्ठ व. 7). ही देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान करताना समोरचा नांदुरकीचा वृक्ष आदरानं लवतो, तसाच ज्ञानोबांची पालखी पंढरीच्या वाटेनं निघताना आळंदीचा सोन्याचा पिंपळ सळसळतो. चराचरांवर संतांच्या प्रेमाचा प्रभाव असतो याचं हे प्रतीकच असतं. असो.

संत नामदेव विठ्ठलाच्या आरतीत म्हणतात-
आषाढी कार्तिकी भक्तजन येती। चंद्रभागेमाजी स्नान जे करिती।
दर्शन होळामात्रे तया होय मुक्ती। केशवासी नामदेव भावे ओवाळिती॥
आषाढ-कार्तिक हे चार महिने उपासकांसाठी- साधकांसाठी अतिशय पवित्र असतात. या कालावधीला ‘चातुर्मास’ म्हणतात. आषाढी-कार्तिकी एकादशींना देवशयनी (देव झोपतात) आणि देवोत्थान (देव उठतात) अशी नावं आहेत. पण याला एक मध्यंतरही आहे. भाद्रपद शु. एकादशी या दिवशी विठ्ठल भगवंत कुशी बदलतात म्हणून याला म्हटलंय- ‘परिवर्तिनी’ एकादशी. मानवानं आपल्या भक्तीच्या सोयीसाठी निगुर्णनिराकार परब्रह्माला सगुण-साकार बनवलं. ऋषी-मुनी, साधुसंत यांनी आपल्या साधनेतून नि प्रतिभेतून अमूर्ताच्या विविध रूपारंगाच्या मूर्ती बनवल्या. विठ्ठल हे याचं उत्तम उदाहरण आहे.

शिवाचे भक्त शैव आणि विष्णूचे भक्त वैष्णव यांच्यात आपलाच देव श्रेष्ठ यावरून वादच नव्हे तर रक्तलांछित लढाया होऊ लागल्या. म्हणून समाजकल्याणासाठी संतांनी एक दैवत अस्तित्वात आणले जे दोन्ही पंथांच्या समन्वयाचे, संगमाचे प्रतीक होते. त्याला नाव दिले पांडुरंग. वर्णाने सावळा असलेल्या कृष्णविठ्ठलाचं वर्णन पांडुर (पांढरं) अंग असं केलं. समाजाला धर्मसहिष्णुतेचा, सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यासाठी हा शैव-वैष्णव म्हणजे हर आणि हरी (किंवा हरिहर) यांचं संयुक्त रूप (मूर्ती) तयार करावं लागलं. बाहेरून दोन प्रतीकं दिसली तरी आतून ही दोन्ही दैवतं एकात्मच आहेत. काया-वाचा-मने एकरूपच आहेत.
समर्थ रामदासांनी ‘मनाचे श्लोक’मध्ये हा विचार अप्रतिम रीतीनं व्यक्त केलाय-
विठोने शिरी वाहिला देवराणा (महादेव)।
तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा॥
निवाला स्वये तापसी चंद्रमौळी।
जिवां सोडवी राम हा अंतकाळी॥
पंढरीच्या विठ्ठलाच्या माथ्यावर शिवलिंग आहे. म्हणजे विष्णूने शिवाला मस्तकावर धारण केलेय. पण त्या शिवाच्या अंतरी ज्या रामाचं नाम अखंड चालू आहे, त्या विष्णूला तुम्ही का मानत नाही. काशीत मृत जीवांचा उद्धार होतो, कारण मृत्युसमयी रामाचं नाम कानात सांगून त्या व्यक्तीला मुक्त करतो तो महादेवच. समर्थांनी असंही म्हटलंय- ‘वाराणसी मुक्तिक्षेत्र रामनामेकरून।’
आपण उगाचच शैव-वैष्णव (आडवे-उभे) असा निरर्थक वाद घालून समाजाचं नुकसान करतो. दूरदर्शी नि समाजहितैषी संतांनी मात्र हे भेद स्वतः तर मानले नाहीतच, पण तुकोबासारख्यांनी जगाला गर्जून सांगितले- हरी हरात भेद फक्त एका वेलांटीचा आहे. कार्य दोघांचंही एकच आहे. भक्तांचं भय-दुःख यांचं ‘हरण’ करायचं. ते नष्ट करायचं. असो.

इथे आणखी एक सांप्रदायिक समन्वयाचा, संकुचित पंथाभिमान नष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्याचा उल्लेख करायला हरकत नाही. तो म्हणजे दत्तात्रेय या दैवताचा. ब्रह्मदेवाची भक्ती करणारे ‘ब्राह्म’, विष्णूची उपासना करणारे ‘वैष्णव’ आणि शिवाची उपासना करणारे ‘शैव’ यांच्यातील मतभेद इतके विकोपाला गेले की त्यातून भीषण रक्तपात होऊ लागला. म्हणून समाजातील संतसत्पुरुषांनी ‘दत्त’ देवताची निर्मिती केली. आज ब्रह्मा-विष्णू-महेशाची पूजा आनंदानं सारे भक्त बिनतक्रार करताहेत. असो.

आपण अनेक देवदेवतांची पूजा करीत असलो, आपले स्वतंत्र असे आराध्य दैवत असले तरी आपली श्रद्धा ‘एकेश्वरी’च असते. मुळात एकच परमेश्वर आहे. एकाच आगीतून जशा अनेक ठिणग्या निघतात तशी एकाच सच्चिदानंद स्वरूपातून आकाराला आलेली ही अनेक रूपं आहेत, ही आपली ठाम श्रद्धा असते. पण आपली ही एकतेच्या पायावर उभी असलेली विविधता जगातील सर्व विचार करणाऱ्यांना लोभस वाटते. देवदेवतांची नुसती रूपंच वेगवेगळी नाहीत तर त्यांची उपासनापद्धतीसुद्धा विविध प्रकारची आहे. हेच पहा ना- आपण देवांना वार-तिथी वाटून दिल्याहेत. लहनपणापासून मनावर बिंबवले जाते- सोमवार शंकराचा, मंगळवार गणपतीचा, गुरुवार दत्ताचा, शुक्रवार देवीचा, शनिवार मारुतीचा तर रविवार सूर्याचा किंवा गायत्रीचा. आपल्या विठूचा वार कोणता तर बुधवार. तिथीसुद्धा गणपतीची चतुर्थी, देवीची पंचमी किंवा अष्टमी, गुरूची पौर्णिमा तर विठुरायाची एकादशी. त्यातही गंमत अशी की शुद्ध एकादशीला विठोबाच्या दर्शनाला जायचे तर वद्य एकादशीला भक्तांनी संतस्थानी त्यांच्या समाधीच्या क्षेत्रात जायचे. जशी आळंदी, देहू, पैठण इ.

आषाढी-कार्तिकी यांना ‘महाएकादशी’ म्हणतात. या दिवशी भक्तांचा महापूर पंढरपूरला येतो. क्वचित वरून कोसळणाऱ्या पावसामुळे भीमेला येणारा पूरही असतो. पण वारकऱ्यांना त्याची पर्वा नसते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आठशे वर्षांत भारतात किती प्रचंड उलाथापालथी झाल्या. सर्व धर्म-संस्कृतींची आक्रमणं झाली. भारतातील जनता त्यांची गुलाम बनली. जगात महायुद्धे झाली. खुद्द भारतात स्वातंत्र्यानंतर युद्धे झाली. आणीबाणी आली. प्रकाशबंदी (रात्रीचा ब्लॅक आउट) झाली. नैसर्गिक आपत्ती आल्या. पण पंढरीची वारी सुरूच राहिली. एकाच वर्षी- 2020 साली- कोविडमुळे वारी बंद नाही पडली, पण प्रतीकात्मक पद्धतीने करण्यात आली; तीही वाजतगाजत, ग्यानबा तुकारामाच्या तालावर नाचत-गात अशी नाही झाली. फक्त पन्नास वारकरी प्रतिनिधींनी ग्यानबा-तुकाराम यांच्या पादुकांना पांडुरंगाच्या दर्शनाला नेऊन आणले. लोकांना वाटले एका अदृश्य कोरोना नावाच्या विषाणूने असंख्यांच्या हृदयमंदिरातल्या विष्णूवर मात केली. पण ‘अवघे विश्व विष्णुमय’ मानणाऱ्या भक्तांनी विषाणूतल्या विष्णूवर मात केली जशी देवांनी असुरांवर वेळोवेळी केली. सामान्य वारकऱ्यांच्या श्रद्धेने कोरोनासुरावर मात केली. दुसऱ्या वर्षापासून वारी अधिकाधिक उमेदीने उत्साहात पार पडली. विशेष म्हणजे जगाच्या सर्व कानाकोपऱ्यांतून वाढत्या संख्येने परदेशी यात्री यात भाग घेऊ लागले. असंख्य यात्रेकरूंना लाभणारा अवर्णनीय आनंद त्यांनाही लाभला यात नवल नाही.

तुकोबासारखा बंडखोर, परखड संत टाहो फोडून सांगतो- ‘व्रत करा एकादशी, गळा माळा तुळशी असो वा नसो. एकादशी व्रताचा महिमा खाण्याचे पदार्थ, विशिष्ट स्तोत्रांचे पठण, ग्रंथांचे पारायण, मंत्रांचा जप यात गुरफटलेला नाही. एकादशी ही जशी सगुण उपासना आहे तशीच निर्गुणाची साधनाही आहे. विटेवरचा विठ्ठल नाम्याचा (नामदेवांचा) नैवेद्य खातो, जनाबाईला दळण-कांडणात मदत करतो, सावता माळ्याचा मळा पिकवतो, तोच विठ्ठल शंकराचार्यांना ‘विटेवरचं परब्रह्म’ वाटतो. विठ्ठलाला पाहून ते उत्स्फूर्तपणे उद्गारतात- ‘परब्रह्मलिगं भजे पांडुरंगम्‌‍।’ स्वतः संतांनाही तो ‘कैवल्याचा पुतळा, उतरला भूतळा’ किंवा ‘निरंजनाचं (अलख निरंजनाचं) धाम’ वाटतो.

आषाढी एकादशीची वारी म्हणजे हा सर्व भेदांच्या पलीकडचा चैतन्याचा अनुभव असतो. घरच्या नि गावातल्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन निघालेल्या वारकऱ्यांची पावलं पंढरीची म्हणजे मुक्तीची वाटच चालत असतात. आपल्या गोमंतकातूनही वाढत्या संख्येनं वारकरी पंढरीला भक्तीनं जाऊ लागलेत. ही मंडळी खरी हरिभक्ती पारायण (ह.भ.प.) आहेत.
आजचे प्रसिद्ध भावकवी गुरू ठाकूर यांचं ‘पंढरीची वारी, जगात भारी’ हे गीत असंख्य भक्तांच्या ओठांवर गुंजतंय. संतशिरोमणी नामदेवांचा पंढरीचं वर्णन करणारा एक अभंग आहे, त्यातील काही ओळी विचार करण्यासारख्या आहेत-
आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी।
जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर।
जेव्हा नव्हती गोदागंगा, तेव्हा होती चंद्रभागा॥
अर्थातच हे मनातलं ‘चैतन्य पंढरपूर’ आहे. या पंढरपूरला पोचायचं कसं? देहानं वारीतून, दिंडी-पालखी यांच्या साथीनं. टाळ-टाळ्या यांच्या गजरात पण आतलं पंढरपूर चिरंतन आहे. ती अंतर्यात्रा आहे. मानसवारी आहे. नाम-ध्यान-अनुसंधानातून ती साधायची असते.
हे जरी खरे असले तरी आपली जनसामान्यांची पंढरी आहे- चोखा मेळ्यांची. ‘विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी। होतो नामाचा गजर, दिंड्यापताकांचा भार॥’ अशी अपार वैष्णवांच्या नामघोषानं दुमदुमलेली पंढरीच खरी आणि वारकऱ्यांनी गजबजलेली वारी.
दिवे घाटातून ही वारी सहजपणे सरकत वर जाते. ते दिव्य दृश्य देवांनाही दुर्लभ असेच असते. नि ती ध्वजारूढ अश्वांनी वेगानं दौडत घातलेली रिंगणं, त्या वारकऱ्यांच्या पताका, डोक्यावरची तुळशीवृंदावनं, घातलेल्या फुगड्या नि एकमेकाला अतीव आदरानं म्हटलेलं ‘माऊली माऊली!’ हीच खरी पंढरीची वारी आषाढी एकादशीची. त्यांच्या पावलात पावलं नि सुरात सूर मिसळून आपणही म्हणूया- ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल!’, ‘ज्ञानोबा माऊऽली तुकाराऽऽम! ज्ञानोबा माऊऽली तुकाऽऽराम!’