ज्ञानस्रोत

0
14

(योगसाधना ः 630, अंतरंगयोग- 216)

  • डॉ. सीताकांत घाणेकर

येणाऱ्या संदेशांची गर्दी झाली की म्हणावे लागते- ‘मी संदेश पाठवला होता, तुम्ही बघितला नाही.’ खरे म्हणजे एका सुंदर संपर्क-साधनाचा हा दुरुपयोग आहे. प्रत्येकाने जर अगदी अत्यावश्यक असलेलेच संदेश पाठवले तर हा घोळ होणार नाही.

आज विज्ञानाने नेत्रदीपक प्रगती केली आहे व अजून करीत आहे. मानवतेसाठी ही भूषणावह गोष्ट आहे. संपर्कक्षेत्राबद्दल तर विचारूच नका! नित्य नवनवीन शोध लागताहेत! यामुळे ज्ञान मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. एक बटन दाबला की लगेच विविध स्रोत उपलब्ध होतात. या संपर्काच्या संदर्भात एक साधासोपा स्रोत म्हणजे ‘वॉट्सॲप.’
‘वॉट्सॲप’वर कितीतरी जणांचे ग्रुप असतात. प्रत्येक ग्रुपमध्ये दरदिवशी अनेक संदेश दिवसरात्र म्हणजे चोवीस तास येतच राहतात. ते बघता बघता वेळ कसा जातो कळतच नाही. त्यांतील काही उपयोगाचे असतात, तर काही व्यर्थ असतात. काही ग्रुप तर नजरेखाली घालायलाच वेळ मिळत नाही. तिथे संदेशांची इतकी गर्दी होते की त्यामुळे काही आवश्यक संदेश पाहायचे राहूनच जातात. अशावेळी म्हणावे लागते की ‘मी संदेश पाठवला होता, तुम्ही बघितला नाही.’ खरे म्हणजे एका सुंदर संपर्क-साधनाचा हा दुरुपयोग आहे. प्रत्येकाने जर अगदी अत्यावश्यक असलेलेच संदेश पाठवले तर हा घोळ होणार नाही. पण सांगायचे कुणाला आणि सांगितले तर ऐकणार कोण? त्यामुळे अनेक ग्रुपांसाठी एक खास व्यवस्था केली जाते- ‘ॲडमीन’- तो पाठवतो तोच संदेश पुढे जातो.
असाच एक छान संदेश (व्हॉट्सॲपवरचा). युधिष्ठिराने एक सत्य सांगितले होते ः ‘मरायचे सर्वांना आहे, परंतु मरावेसे कोणालाच वाटत नाही!’ आजची परिस्थिती तर फार गंभीर आहे.

  • ‘अन्न’ सर्वांनाच हवे, पण शेती करावीशी कोणालाच वाटत नाही.
  • ‘पाणी’ सर्वांनाच हवे, पण पाणी वाचवावे असे कोणालाच वाटत नाही.
  • ‘सावली’ सर्वांनाच हवी, पण झाडे लावावी व जगवावी असे कोणालाही वाटत नाही.
  • ‘सून’ सर्वांनाच हवी, पण ‘मुलगी’ व्हावी असे कोणालाच वाटत नाही.
  • ‘विचार’ करावा असे प्रश्न आहेत, पण ‘विचार’ करावा असे कोणालाच वाटत नाही.
    खरेच! अगदी थोड्याच शब्दांत, अवघ्याच ओळीत विश्वाची आजची परिस्थिती कशी आहे याचे तत्त्वज्ञान येथे सामावलेले आहे. सर्वांच्याच बाबतीत असे घडेलच असे म्हणता येणार नाही. त्यामुळे लिखित जरी सत्य असले तरी संपूर्ण सत्य म्हणता येणार नाही. कारण अपवाद आहेत.
    एक एक शब्द व ओळ बघायला हवी. त्यावर मनन व चिंतन गरजेचे आहे.

1) मृत्यू ः मृत्यू अटळ आहे हे सत्य सर्वांनाच माहीत आहे. पण मरावेसे कुणालाच वाटत नाही. परंतु हे अगदी शंभर टक्के सत्य नाही. याचे कारण म्हणजे जेव्हा माणसाला असाध्य रोग होतो त्यावेळी भयानक शारीरिक, मानसिक, भावनिक त्रास होतो. अशा वेळी त्या व्यक्तीला मृत्यू हवाहवासा वाटतो तो असह्यतेमुळे. कारण त्याला वेदनांपासून मुक्ती हवी असते.
या घटनेला दुसरी बाजूदेखील आहे. मृत्यू अटळ आहे व तो कुठल्याही क्षणाला येऊ शकतो. तसेच व्यक्ती भौतिक संपत्तीमधून काहीही सोबत नेणार नाही हे सत्य माहीत असूनसुद्धा तीच संपत्ती मिळवण्यासाठी ती धडपडते. त्यात कितीही मिळवले तरी त्या व्यक्तीला समाधान मिळत नाही. त्यामुळे तो वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्यावर दुर्लक्ष करतो. विविध तऱ्हेच्या व्याधींना बळी पडतो. आपण स्मशानात अंत्यक्रियेसाठी जातो तेव्हा हे सत्य प्रकर्षाने जाणवते. बाहेर आल्यावर मात्र परत आपल्या मूळ जगात वावरतो.

2) अन्न-शेती ः अन्न ही एक अत्यंत आवश्यक गोष्ट. या अन्नासाठी शेती करावी लागते. पण त्यात कष्ट पुष्कळ असतात. त्यापेक्षा नोकरी बरी असे अनेकांना वाटते. त्यामुळे तरुण मुले गाव सोडून दुसऱ्या राज्यात जातात. आपल्या लहानशा गोव्यात आजूबाजूला नजर फिरवली, चौकशी केली तरी अशी अनेक उदाहरणे सहज सापडतील. इथले अधिकतर कामगार इतर राज्यांमधले आहेत. त्यांच्या गावात शेतजमीन आहे पण ते ती करीत नाहीत. जमिनी पडीक आहेत. अगदी निराश होण्याची गरज नाही, कारण थोड्या प्रमाणात का होईना, हल्ली काही तरुण शेतीकडे वळताना दिसतात. याचे कारण म्हणजे सरकारचे विविध प्रकल्प वाढतच आहेत. शेतीसाठी चांगली आयुधे प्रत्येक काम करण्यासाठी उपलब्ध आहेत. तसेच सरकारतर्फे कमी व्याजात कर्ज मिळते. हा तर शेतकऱ्यांसाठी एक आशेचा दिवाच आहे.

3) पाणी ः विश्वकर्त्याने विश्वाला दिलेल्या पंचमहाभूतांपैकी एक अत्यंत आवश्यक घटक म्हणजे पाणी. अगदी संजीवनीप्रमाणे विश्वातील प्रत्येकाला याची गरज असते- प्राणिमात्र, झाडेपेडे, जीवजंतू, कृमीकिटक… भारतात म्हणूनच पाण्याच्या स्रोतांना देवाचे रूप मानले गेले आहे. त्यांना ‘माता’ म्हणून संबोधले जाते. म्हणून ‘गंगामाता’ सर्वांची जननी आहे. भगवंताला अभिषेक केल्यानंतर हेच पाणी तीर्थ होते.
दुर्भाग्याने हे सर्व माहीत असूनदेखील काहीजण पाणी वाया घालवतात. एका बाजूला लोकसंख्या वाढतच आहे आणि दुसऱ्या बाजूला नद्या सुकताहेत. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. ‘ट्युबवेल’ वापरून आधी पाणी अगदी लगेच मिळत असे. आता अगदी आतपर्यंत गेलो तरी पाणी कमी व माती जास्त येते.
पाणी वाया घालवण्यापेक्षा ते साठवण्याचा प्रयत्न करायला हवा. थोड्या गावांत काही संस्था कार्यरत आहेत, पण त्यांचा प्रयत्नही अपुरा पडतो. इस्रायलसारख्या छोट्याशा देशाकडून आम्हाला पुष्कळ शिकता येईल. त्यांचे विविध प्रकल्प अनुकरण करण्यासारखे आहेत. प्रत्येक घरात पाणी साठवण्यासाठी टाक्या, शेतीसाठी ठिंबक सिंचन पद्धत आहे. देशप्रेमापोटी इस्रायलमधील प्रत्येक नागरिक या प्रकल्पांमध्ये अत्यंत प्रेमाने व उमेदीने सहभागी होतो.

4) सावली ः वृक्ष सूर्याचे प्रखर किरण झेलतो व प्राणिमात्रांना सावली देतो. बहुतेकांना रस्त्यावरून जाताना, रस्त्यावर उन्हात काम करताना सावली हवीहवीशी वाटते. आज वाहनांत- गाड्या, बस यांत वातानुकूलित यंत्रणा असते. त्यांना सावलीची तेवढी गरज वाटत नाही.
झाडांमुळे आम्हाला सावली मिळते हे माहीत असूनदेखील झाडांची कत्तल चालूच आहे. झाडे लावावी व सांभाळावी असे बहुतेकांना वाटत नाही. झाडे लावण्याचे प्रकल्प मधे-मधे छोट्यामोठ्या प्रमाणावर राबवले जातात. त्यांची प्रसिद्धी केली जाते. पण अगदी थोडी झाडे व्यवस्थित सांभाळली जातात.

5) सून ः सून प्रत्येकाला हवी असते. पण अनेकांना आपल्या घरी मुलीचा जन्म नको असतो. त्यामुळे भृणहत्या केली जाते. मुलगी जन्माला आली तर तिला मुलासारखा दर्जा दिला जात नाही. बहुतेक वेळा सून हवी असते ती वंशवृद्धीसाठी. तिला जर मुलगा झाला नाही तर तिचा छळ सुरू होतो. तसेच ‘हुंडा’ हा अर्थप्राप्तीचे साधन बनतो. केव्हा केव्हा सासूला घरची कामे करून घेण्यासाठी एक हक्काची मोलकरीण हवी असते. भारतीय संस्कृतीमध्ये नारीला फार महत्त्व आहे; पण तथाकथित सुधारलेल्या जगात असे विचार कालबाह्य वाटतात.

6) विचार ः असे अनेक विचार करण्यासारखे विषय आहेत, पण विचार करावा असे किती जणांना वाटते? तेदेखील जीवनोपयोगी सद्विचार? अपवाद आहेतच. तसे बघितले तर हा ‘व्हॉट्सॲप’ संदेश कुणीतरी विचार केला म्हणूनच आला ना? येथे एक विचार येतो- कुठल्याही स्वरूपात माहिती मिळाली तर त्यावर मनन, चिंतन, कथन आवश्यक आहे. त्यामुळेच तर चांगल्या ज्ञानाचा प्रसार होतो.