– डॉ. सोमनाथ कोमरपंत
काही विचारांची नोंद धर्मानंदांनी आपल्या रोजनिशीत करून ठेवली होती. स्वानुभवावर आधारलेली ही निरीक्षणे आजच्या पिढीलाही मार्गदर्शक ठरतील. ‘निवेदन’मधून ती वाचायला हवीत. जातिभेदनिर्मूलन, व्यक्ती-कुटुंब यांमधील परस्पर संबंध आणि त्यांची समाजविषयक कर्तव्ये यासंबंधीचे हे चिंतन आहे. ते दीपस्तंभासारखे आहे.
बौद्ध धर्माचे जागतिक कीर्तीचे अभ्यासक आणि पाली भाषेचे प्रकांड पंडित म्हणून आचार्य धर्मानंद कोसंबी यांची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. गोमंतकातील श्रेष्ठ ज्ञानपरंपरा सांगताना आधुनिक कालखंडातील जी महत्त्वपूर्ण नावे अग्रक्रमाने घेतली जातात त्यांत आचार्य धर्मानंद कोसंबी आणि त्यांचे सुपुत्र प्रा. दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा आवर्जून गौरवाने उल्लेख होतो.
आचार्य धर्मानंदांचा जन्म मुरगाव तालुक्यात सांखवाळ या गावी झाला. पूर्वी हा तालुका सासष्टी महालात समाविष्ट होता. त्यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1876 रोजी झाला. अभावग्रस्त परिस्थितीमुळे त्यांना पुरेशा प्रमाणात औपचारिक शिक्षण घेता आले नाही. पण त्यांची कुशाग्र बुद्धी त्यांच्या आप्तजनांनी ओळखली आणि त्यांच्या सुप्त शक्तीला वेळीच प्रोत्साहन दिले. नाहीतर त्यांचे जीवन म्हणजे खडकावरचा अंकुर ठरला असता. खडतर परिस्थितीवर मात करण्यासाठी ज्ञानमार्ग पत्करण्याची अंतःप्रेरणा धमानंदांना झाली. पुणे हे खर्या अर्थाने त्यावेळी विद्येचे माहेरघर होते. तेथे त्यांना प्राच्यविद्यापंडित डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकरांसारख्या असामी भेटल्या. संस्कृत विद्या संपादन करणे ही ज्ञानमार्गावरची पहिली पायरी हे सत्य त्यांनी जाणले. ‘ये गत्यार्थाः ते ज्ञानार्थाः।’ या मंत्राचे त्यांनी तंतोतंत पालन केले. त्यासाठी पुणे-ग्वाल्हेर-बनारस अशी भ्रमंती करीत त्यांनी संस्कृत भाषा आत्मसात केली. तिच्यातील वाङ्मयाचा मनःपूत आस्वाद घेतला. कुणाही ज्ञानमार्गी व्यक्तीला तो प्रेरक ठरावा. आयुष्यात टक्केटोणपे खाऊन ज्ञान कसे मिळवावे याचा आदर्श वस्तुपाठ बघायचा असेल तर तो धर्मानंदांच्या प्रांजळ आणि पारदर्शी स्वरूपाच्या ‘निवेदन’ या आत्मकथनात पाहावा. आयुष्याचा समग्र पट त्यात नसला तरी ज्ञानसाधनेचा उत्कट कालखंड त्यात समरसतेने रंगविला गेला आहे. ‘अनुभव हाच खरा शिक्षक आहे’ याची प्रचिती यांतील पानोपानी येते. बनारसहून धर्मानंद नेपाळपर्यंत जाऊन आले. पृथ्वीचा मानदंड असलेला, नगाधिप हिमालय आणि त्याची उत्तुंग हिमशिखरे न्याहाळत असताना त्यांच्या वृत्ती उचंबळून कशा आल्या याचे नितांत रमणीय चित्रण ‘निवेदन’मध्ये आढळते. ‘स्मृतिचित्रे’सारखे हे मनोज्ञ आत्मकथन आहे.
धर्मानंद नेपाळहून गयेला आले. या बुद्धभूमीत त्यांनी पाली भाषेचा अभ्यास केला. लंका आणि ब्रह्मदेश या देशांतही ते विद्यासंपादनासाठी, अभ्यासासाठी जाऊन आले. पुनश्च एकदा गोव्यात येऊन गेले. त्यांचा विद्यासंपन्न नवा परिवेश घरच्या माणसांना विस्मय वाटायला लावणारा होता.
आचार्य धर्मानंद कोसंबी 1912 मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये पाली भाषेचे प्राध्यापक झाले. त्यांच्या पुढील बौद्धिक विक्रमांचा हा शुभारंभ होता. बुद्धिघोष यांच्या ‘विसुद्धिमग्ग’ या पाली भाषेतील ग्रंथाचे संपादन करण्यासाठी प्रा. जे. एच. वुड्स यांचे अमेरिकेहून त्यांना निमंत्रण आले. अमेरिकेहून परतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठात तसेच लेनिनग्राड येथे पाली भाषेचे अध्यापन केले. कोलकाता युनिव्हर्सिटीत व्याख्याता म्हणून ते रूजू झाले. येथे असताना ते जीवनात स्थिरस्थावर झाले. कोलकात्यात त्यांना हरिनाथ दे, मनमोहन घोष आणि अरविंद घोषांचे धाकटे बंधू बारींद्र घोष यांचा सहवास लाभला. त्या सहवासातील क्षणचित्रे धर्मानंदांनी ‘निवेदन’मध्ये रंगविली आहेत. जीवनाच्या संघर्षकाळात त्यांना बडोद्याच्या गायकवाड यांनी मदतीचा हात दिला. अध्यापनक्षेत्रात कालक्रमणा करीत असताना धर्मानंदांच्या जीवनात अनेक समरप्रसंग आले. अनेक कटू प्रसंगांशी त्यांना सामना करावा लागला. पण निष्ठेने स्वीकारलेल्या ज्ञानमार्गावरून ते किंचितही विचलित झाले नाहीत. यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची महत्ता साठवलेली आहे. त्यांचा जीवनप्रवास समजून घेण्यासारखा आहे. हावर्ड विद्यापीठात किंवा बिर्हाडी ते व्यासंग करण्यात वेळ घालवीत. विशुद्धीमार्गाच्या संशोधनकार्यात मग्न राहत असत. कठीण पाठांचा निर्णय करण्यात वेळ घालवीत. बॉस्टन येथे निरनिराळ्या संस्थांनी आयोजित केलेली व्याख्याने ऐकायला ते जात असत. आपल्या देशबांधवांच्या शारीरिक आणि मानसिक सौख्यासाठी त्यांचे चिंतन चाले. चाकोरीबद्ध धर्मसंकल्पनांतून बाहेर पडून मुक्त विचारांची उपासना करण्याची संधी त्यांना अमेरिकेच्या वास्तव्याने प्राप्त करून दिली.
सहज मनात विचार येऊन जातो, धर्मानंदांना बालपणापासून ही प्रेरणा कुणी दिली? त्यासाठी ‘निवेदन’मधील त्यांच्या कोवळ्या वयातील जडणघडणीचा आलेख समजून घ्यावासा वाटतो. गोव्यात त्यावेळी पोर्तुगिजांची राजवट होती. अभ्यासाची मुक्तद्वारे नव्हती. अशाही प्रतिकूल काळात विष्णू रंगाजी शेळडेकर आणि श्रीधर प्रभू म्हांब्रे या समानधर्मी मित्रांचा सहवास त्यांना लाभला. वामनपंडित, मोरोपंत इत्यादींचे काव्य त्यांनी अभ्यासले. ‘निबंधमाला’, ‘आगरकरांचे निबंध’, ‘ज्ञानेश्वरी’, वर्तमानपत्रे, मासिक पुस्तके आणि कादंबर्या यांमुळे त्यांच्या मनाचे पोषण झाले. आणि “त्या काळी हेच काय ते आत्मोन्नतीचे साधन माझ्या हाती होते,” असे त्यांनी ‘निवेदन’मध्ये म्हटलेले आहे. समाजचिंतनाचे मूलबीज त्यांच्या अंतरंगात पडले ते असे! “सगळ्या जगाचे, राष्ट्राचे, कुटुंबाचे व स्वतःचे हित जर साधण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने सद्गुरू बुद्धाला शरण गेले पाहिजे,” अशी त्यांची धारणा बनली. त्यांची विपुल ग्रंथसंपदा हे त्यांच्या बौद्धधर्माविषयीच्या चिंतनाचे फलित होय.
धर्मानंद जसे ज्ञानयोगी होते; तसेच ते कर्मयोगी होते. राष्ट्रीय स्वातंत्र्यसंग्रमात त्यांनी भाग घेतला. महात्मा गांधींच्या असहकारितेच्या आंदोलनात ते आघाडीवर होते. ज्ञान आणि कर्म जिथे एकत्र येते तेव्हा ते समाजाच्या अभ्युदयासाठी, पर्यायाने राष्ट्रनिर्माणाच्या कार्यासाठी प्रेरक ठरते. गोमंतकाच्या या थोर सुपुत्राने आपले संपूर्ण जीवन राष्ट्रकार्यासाठी वाहिले. या कृतिशील प्रज्ञावंताचे अवघे जीवन ज्ञानप्रकाशात उजळून निघाले. कविश्रेष्ठ बा. भ. बोरकर आपल्या कवितेत ः
जीवन त्यांना कळलें हो
असे उद्गार काढतात, तेव्हा धर्मानंदांसारख्या व्यक्ती त्यांच्या डोळ्यांसमोर असतात. “अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह हे चार याम आमचे दैवत होत,” असे धर्मानंदांचे मत. मार्क्सवादी आणि समाजवादी विचारांची त्यांना ओढ वाटत असे. पण कोणत्याही पोथीनिष्ठ विचारसरणीचे अंधानुकरण करणे हा त्यांचा मनःपिंड नव्हता. डोळस परिशीलन केल्यानंतर गतिमान काळात सुसंगत ठरेल असे नवनीत स्वीकारण्याकडे त्यांच्या मनाचा कल होता.
1899 साली विद्यार्जनासाठी गृहत्याग करताना काही विचारांची नोंद धर्मानंदांनी आपल्या रोजनिशीत करून ठेवली होती. स्वानुभवावर आधारलेली ही निरीक्षणे आजच्या पिढीलाही मार्गदर्शक ठरतील. ‘निवेदन’मधून ती वाचायला हवीत. जातिभेदनिर्मूलन, व्यक्ती-कुटुंब यांमधील परस्पर संबंध आणि त्यांची समाजविषयक कर्तव्ये यासंबंधीचे हे चिंतन आहे. ते दीपस्तंभासारखे आहे.
आचार्य धर्मानंदांच्या विचारांचा वारसा हा असा आहे.