ज्ञानपीठ विजेते लेखक अनंतमूर्ती यांचे निधन

0
115

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ख्यातनाम कन्नड लेखक यू. आर. अनंतमूर्ती यांचे काल येथील खासगी इस्पितळात ह्रदयविकारामुळे निधन झाले. कन्नड साहित्य क्षेत्रात त्यांना मानाचे स्थान होते. देशातील महत्त्वाच्या लेखकांपैकी ते एक होते. ८२ वर्षीय अनंतमूर्ती गेल्या दहा दिवसांपासून इस्पितळात उपचार घेत होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी इस्तेर तसेच एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. किडनीच्या आजारामुळे गेली काही वर्षे अनंतमूर्ती डायलीसीस उपचार घेत होते. ह्रदविकार व मधुमेहाचा आजारही त्यांना होता. परवा रात्रीपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.
अनंतमूर्ती यांना साहित्यसेवेसाठी १९९८ साली पद्मभुषण, १९९४ साली ज्ञानपीठ, १९८४ साली राज्योत्सव पुरस्कार लाभला. २०१३ साली जागतिक महत्त्वाच्या पुरस्कारांपैकी एक मॅन बुकर पुरस्कारासाठी त्यांना नामांकन लाभले होते. ८०च्या दशकात ते केरळच्या महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलगुरू होते.
१९६५ साली सर्वप्रथम ङ्गसंस्कारफ या कादंबरीतून ते प्रकाशात आले. त्यानंतर घटश्राद्ध, भारतीपुरा, अवस्थे, भान अशा त्यांच्या कादंबर्‍या गाजल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनंतमूर्ती यांना श्रद्धाजली वाहिली. काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकांआधी अनंतमूर्ती यांनी मोदी पंतप्रधान झाल्यास आपण देश सोडणार असल्याचे म्हटले होते. मोदी पंतप्रधान झाले तेव्हा, भावनेच्या भरात ते विधान केल्याचे अनंतमूर्तींनी सांगितले होते.