चंद्रमे जे अलांच्छन | मार्तंड जे तापहीन ॥
ते सर्वांहि सदा सज्जन | सोयरे होतु ॥
काल दिवंगत झालेले गोमंतकीय ज्ञानतपस्वी पद्मश्री सुरेश गुंडू आमोणकर यांच्या बाबतीत ज्ञानेश्वरीतील पसायदानाच्या या ओव्या शब्दशः लागू होतात. गोव्यातील भाषावादाच्या अवघ्या कोलाहलामध्ये, भाषा हे वादाचे नव्हे, तर संवादाचे माध्यम आहे यावर दृढ विश्वास ठेवून ‘एकला चलो रे’ या निष्ठेने आपले विधायक अनुवादकार्य एकहाती पुढे घेऊन चाललेल्या आमोणकरांच्या निधनाने धर्म, भाषा, प्रांतांमधला हा संवादसेतूच आज निखळून पडला आहे. ‘उत्कट भव्य तेचि घ्यावे | मळमळीत अवघेचि टाकावे | निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी’ या समर्थांनी वर्णिलेल्या महंताप्रमाणे अन्य धर्मांतील, अन्य भाषांतील, अन्य संस्कृतींतील भव्यदिव्य असे विचारभांडार, साहित्यभांडार आपल्या कोकणीमध्येही यावे अशा आत्यंतिक कळकळीने त्यांनी जणू त्या कामाला स्वतःला वाहून घेतले होते. ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीपासून फादर स्टीफन्सच्या ख्रिस्तपुराणापर्यंत आणि बौद्धांच्या धम्मपदांपासून शिखांच्या जपुजीसाहिबपर्यंत हे सर्व विचारभांडार कोकणीमध्ये आणण्यासाठी त्यांनी अथक, अविश्रांत परिश्रम घेतले. कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीने घेरले, परमप्रिय अर्धांगिनीने अर्ध्यावर साथ सोडली, तरीही विचलित न होता, स्वतःच्या मनीचा तोल यत्किंचितही न ढळू देता शांत, प्रसन्नचित्ताने त्यांनी जे कार्य आरंभिले होते, ते त्यांच्यातील कमालीच्या सकारात्मकतेचे व संतवृत्तीचेच प्रतीक म्हणावे लागेल. मुंबईच्या पदपथावर सापडलेले बुद्धाचे धम्मपद समजून घेण्यासाठी पालीसारखी प्राचीन भाषा आत्मसात करणार्या आमोणकरांची जातकुळी धर्मानंद कोसंबीचाच वारसा सांगणारी होती. त्यांचे वडील गुंडू आमोणकर हेही एक व्यासंगी विद्वान होते. पद्मश्री सुरेश आमोणकर यांना भगवद्गीतेतील विचारांनी भारून टाकले होते. ज्ञानेश्वरीचे अमृतसार ‘रोंसाळ कोकणी ज्ञानेश्वरी’ च्या रूपाने तब्बल पाच वर्षे खपून त्यांनी कोकणीमध्ये आणले. गीतेतील मूळ संस्कृत श्लोक, डावीकडे मूळ प्राकृत मराठीतील ज्ञानेश्वरी आणि उजवीकडे त्याचा तितकाच रसाळ कोकणी अनुवाद अशी ही अभ्यासकांना अनोखी पर्वणी आहे. हा अनुवाद त्यांनी गुरुदेव रानड्यांना आणि आपले मामा बा. भ. बोरकरांना अर्पण केला आहे. ज्ञानेश्वरीच्या या वाचनाने वाचणार्याचे जीवन परतत्त्वाच्या स्पर्शाने उजळेल असा विश्वास त्यांनी त्यात व्यक्त केला आहे. गीतेमधला विचार सर्वसामान्यांपर्यंत गेला पाहिजे म्हणून त्यांनी संतांनी आणि विचारवंतांनी अनुवादिलेले ६१ श्लोकांतले गीतासार ‘पंचवेणी गीतामृता’च्या माध्यमातून संकलित केले. ते ‘कोकणी व मराठी वाचकांना गीताविचाराच्या ठेव्याचा सखोल अभ्यास करण्याची स्फूर्ती देईल’ अशी त्यांची त्यामागील भावना होती. फादर स्टीफन्सने मराठीत लिहिलेले ख्रिस्तपुराण सतत सहा वर्षे वाहून घेऊन त्यांनी मेहनतीने कोकणीत आणले. दुर्धर व्याधीशी झुंज घेत असतानाच विल्यम शेक्सपिअरच्या ग्रंथांचे कोकणी अनुवाद केले. शेक्सपिअरच्या ‘ज्युलियस सिझर’च्या त्यांनी केलेल्या ‘ज्युलियस चेजार’ या अनुवादाला असलेली त्यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावनाच तब्बल ६६ पानांची आहे. ‘सिझरचा मृत्यू ही सिझरची नव्हे, तर ब्रुटसची शोकांतिका आहे. ती त्या व्यक्तीची नव्हे, तर साधनांची शूचिता नाकारणार्या, ध्येयप्राप्तीसाठी हिंसेचे खोटे तत्त्वज्ञान स्वीकारणार्या मानवजातीची शोकांतिका आहे आणि ती केवळ त्या काळापुरतीच मर्यादित नाही, तर तो प्रवास आजही चालू आहे’ असे त्यात त्यांनी म्हटले आहे. शेक्सपिअर वाचून आपल्या मनाला उभारी आल्याचे ते म्हणायचे. त्याच्या विचारमौक्तिकांचे संकलनही त्यांनी ‘विल्यम शेक्सपिअरचे सुवर्णी विचारभांडार’ मध्ये केले आहे. आम्ही सुदैवी की त्यांच्यासारख्या ज्ञानतपस्व्याचा लोभ आम्हांस लाभला. आपली सर्व पुस्तके तर त्यांनी आम्हाला भेटीदाखल दिली होतीच, शिवाय अलीकडेच प्रसिद्ध झालेला नवप्रभेचा दीपावली अंक खास माणूस पाठवून मागवून घेऊन त्याचे भरभरून कौतुकही केले होते. मूळ पेशा शिक्षकाचा असल्याने आमोणकरांची कमालीची शिस्त आणि टापटीप पाहण्याजोगी असे. आपल्या न्यू गोवा हायस्कूलच्या पिछाडीला असलेल्या घरामधील ग्रंथभांडाराच्या कुशीत एखाद्या ध्यानमग्न ऋषीसारखा हा ज्ञानतपस्वी अखंड वाचन – मनन – लेखनात गढलेला असे. मनोहर पर्रीकर यांनी आपल्या अखेरच्या आजारपणाच्या काळात गोवा कोकणी अकादमीच्या अध्यक्षपदी आमोणकरांची अत्यंत सार्थ निवड करून त्यांच्या विधायक कार्याची पोचपावती दिली होती. आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धात आमोणकरांनी आधी केनियामध्ये आणि नंतर म्हापशात विद्यादान केले. अनेक सामाजिक संस्थांची पदेही भूषविली, परंतु उत्तरार्धात त्यांनी आपल्या भाषेची सेवा करणे हेच जीवितध्येय मानले आणि जिद्दीने ते एकेक संकल्प सिद्धीस नेले. गोव्यामध्ये कलावंत अगणित असतील, परंतु विचारवंतांची वानवाच आहे. आमोणकरांच्या निधनाने एक विचारवंत, प्रज्ञावंत ज्ञानतपस्वी आपल्यातून कायमचा निघून गेला आहे…