जोसेफ फ्रान्सिस परेरा बनले भारतीय नागरिक!

0
9

>> सीएएअंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारे गोव्यातील पहिले नागरिक; मुख्यमंत्र्यांकडून नागरिकत्व बहाल

नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (सीएए) पाकिस्तानी नागरिक असलेल्या जोसेफ फ्रान्सिस परेरा ह्या मूळ गोमंतकीय इसमाला काल पणजीत भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले. काल पणजीत आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना भारताचे नागरिकत्व बहाल केले. गोव्यात सीएए कायद्यांतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारे परेरा हे व्यक्ती ठरले आहेत. हे नागरिकत्व स्वीकारताना जोसेफ परेरा हे अत्यंत भावूक झाले.

जोसेफ फ्रान्सिस परेरा यांचा पोर्तुगीज राजवटीत गोव्यात जन्म झाला होता; मात्र गोवा मुक्तीपूर्वीच त्यांनी पाकिस्तानात स्थलांतर केले होते. नंतर त्यांनी एका गोमंतकीय महिलेशी लग्न केले होते. लग्नानंतर ते गोव्यात परतले होते. कांसावली येथे ते आपल्या पत्नीसह राहत आहेत. आपणाला भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी त्यांनी ऑनलाईन अर्ज केला होता. चार सदस्यीय समितीने त्यांच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर तो अर्ज केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवून त्यांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्याची शिफारस केली होती. यासंबंधीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर काल सीएएअंतर्गत त्यांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेल्या मार्च महिन्यात सीएएअंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी नियम अधिसूचित केले होते. 2019 मध्ये लोकसभा व राज्यसभेत याविषयीचे विधेयक मंजूर करण्यात आले व त्यानंतर सीएए कायदा लागू झाला होता. या कायद्यानुसार 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात प्रवेश केलेल्या आणि पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेश या देशांत धार्मिक छळ सोसावा लागलेल्या हिंदू, ख्रिश्चन, जैन, बौध्द, शीख, पारशी व सिंधी या धर्माच्या लोकांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे.

अखेर स्वप्न साकार झाले : परेरा
गेल्या 11 वर्षांपासून आपण भारतीय नागरिकत्व मिळव्यासाठी प्रयत्नरत होतो; मात्र भारतीय नागरिकत्व मिळवणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्या कामात अनंत अडचणी आल्या. मात्र, शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपले स्वप्न साकार झाले, असे भारतीय नागरिकत्व स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जोसेफ परेरा हे म्हणाले.