जोरदार वाऱ्यांमुळे पडझडीचे सत्र सुरूच

0
8

राज्यात मागील दोन तीन दिवसापासून पावसाचे प्रमाण कमी झाले असले, तरी जोरदार वादळी वाऱ्यांमुळे झाडांची पडझड सुरुच आहे. राज्यभरात चोवीस तासांत झाडांच्या पडझडीच्या आणखी 172 घटनांची नोंद झाली आहे. दरम्यान, चोवीस तासांत 1.54 इंच पावसाची नोंद झाली असून, राज्यात आत्तापर्यंत एकूण 110.40 इंच पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने 27 जुलैसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
वादळी वाऱ्यांमुळे घरे, रस्ते, वीज खांबावर झाडे कोसळत असल्याने मोठी हानी होत आहे. पणजी शहरात 18 जून रस्त्यावर एका कारवर झाड कोसळून नुकसान झाले. तसेच, भाटले पणजी येथे घरावर झाडे मोडून पडल्याने मोठे नुकसान झाले.
अग्निशामक दलाकडे मागील चोवीस तासांत झाडांच्या पडझडीच्या आणखी 172 घटनांची नोंद झाली. त्यात उत्तर विभागात 50, मध्य विभागात 71 आणि दक्षिण विभागात 51 झाडांच्या पडझडीच्या घटनांची नोंद झाली. या पडझडीमुळे सुमारे 13 लाख 11 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तेरा विभागांपैकी 11 विभागांत पावसाने इंचाचे शतक ओलांडले आहे. सर्वाधिक पावसाची नोंद वाळपई येथे 134.12 इंच एवढी झाली आहे, तर दाबोळी आणि मुरगाव या दोन विभागात पावसाने इंचाचे शतक पूर्ण केलेले नाही.