जोरदार पावसाने राज्याला झोडपले

0
9

>> अनेक ठिकाणी घरे, वाहनांवर झाडांची पडझड; रस्ते पाण्याखाली; आजही वरुणराज बरसणार

राज्यात मंगळवार रात्रीपासून धो-धो कोसळत असलेल्या पावसाचा जोर काल दिवसभरातही कायम राहिला. दिवसभरात सातत्याने जोरदार सरी कोसळल्या. या पावसाने राज्याच्या सर्व भागांना झोडपून काढले. रात्री देखील पावसाच्या मोठ्या सरी बरसत होत्या. पावसाचा जोर गुरुवारी देखील कायम राहणार असून, हवामान विभागाने दि. 29 रोजी काही भागात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच, 30 व 1 जुलै रोजी पावसाची शक्यता व्यक्त करून यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात चोवीस तासांत 5.74 इंच पावसाची नोंद झाली असून, पणजी येथे सर्वाधिक 8 इंच पावसाची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत एकूण 20.13 इंच पावसाची नोंद झाली असून, राज्यातील पावसाच्या तुटीचे प्रमाण आता 38 टक्क्यांवर आले आहे. जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे पडझडीच्या सुमारे 33 घटनांची नोंद झाली.

राज्यात पावसाने सोमवारी थोडी उसंत घेतली होती. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला. परिणामी स्मार्ट सिटी पणजीमध्ये अनेक भागात पावसाचे पाणी तुंबून रस्ते पाण्याखाली गेले होते. शहरातील अनेक दुकानांत पावसाचे पाणी घुसले. त्यामुळे दुकानांतील किमती वस्तू व खाद्यपदार्थांची नासाडी होऊन दुकानदारांचे मोठे नुकसान झाले.

स्मार्ट सिटी योजनेखाली पणजीतील रस्त्यांच्या कामाचा दर्जा आत्ताच्या पावसाने उघड होऊ लागला आहे. जोरदार पाऊस आणि पाणी साचत असल्याने शहरातील प्रमुख रस्ते खराब होण्यास आणि खचण्यास प्रारंभ झाला आहे. शहरातील सांतइनेज भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच त्या ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहत असल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे.

राज्यात चोवीस तासांत झाडांच्या पडझडीच्या 33 घटनांची नोंद झाली. बस्तोडा येथील श्री सिध्देश्वर मंदिराजवळील एका घरावर झाड मोडून पडले. सुर्ला-साखळी येथील सरकारी प्राथमिक शाळेवर काजूचे झाड कोसळले. सांकवाळ येथे एका वाहनावर झाड कोसळले. तसेच, आल्त सांताक्रुझ, थिवी, नास्नोडा, रेवोडा, डिचोली, कारापूर-साखळी, आमठाणे, मये, कुडचिरे, नानोडा, न्हावेली-साखळी, विर्नोडा-पेडणे, आगरवाडा-पेडणे, साट्रे-सत्तरी, नाणूस-वाळपई, दाबोस-सत्तरी, खोर्ली, मुगळ-मडगाव, मोतीडोंगर, कुर्टी, पालवाडा-उसगाव, कोपरवाडा-कुर्टी, फोंडा पोलीस स्थानक, सावईवेरे, बेतोडा, वागोण दाभाळ, शेल्डे, सांगे, केपे, काणकोण, साळगाव, पर्वरी आदी भागात झाडांची पडझड झाली.

आगशी येथील नवीन झुआरी पुलाजवळील रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली. नव्याने तयार केलेल्या पुलाच्या जोड रस्त्यावरील पाण्याचा योग्य निचरा होत नाही. तसेच, बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाजवळील महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर पाणी साचल्याने गैरसोय झाली.
राज्यात आत्तापर्यत सर्वांधिक पावसाची नोंद मडगाव येथे झाली आहे. मडगाव येथे एकूण 26.14 इंच पावसाची नोंद झाली असून, मुरगाव येथे सर्वांत कमी 17.40 इंच पावसाची नोंद झाली आहे. साळावली या राज्यातील प्रमुख धरण असलेल्या सांगे येथे एकूण 20.53 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात चोवीस तासांत सर्वच विभागात पावसाची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील प्रमुख धरणातील पाण्याची पातळीमध्ये वाढ होण्यास सुरुवात
झाली आहे.

मुरगाव : झाडांची पडझड, दरडी कोसळल्या
काल दिवसभरात मुरगाव तालुक्यात सर्वच भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला. ओरुले, बेलाबाय येथील रस्त्यावर पाणी साचले होते, त्यातून वाट काढताना वाहनचालकांचे हाल झाले. पावसाच्या तडाख्यात मेर्सीस वाडे येथे एक भलेमोठे आंब्याचे झाड कोसळले. ते वीज खांबावर आणि तारांवर कोसळल्याने वीज खात्याचे नुकसान झाले. वाडे, हार्बर, होलांत येथे झाडे कोसळली. तसेच रुमडावाडा, अप्पर जेटी येथे डोंगराळ भागात दरडी कोसळल्या.

डिचोली : जनजीवन विस्कळीत
डिचोली तालुक्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. आयटीआय डिचोली येथे एका कारवर झाडाची फांदी पडून नुकसान झाले. सुर्ला येथे सिद्वेश्वर मंदिर परिसरात वीजवाहिन्यांवर झाड पडून किरकोळ हानी झाली. कारापुर येथे विहिरीत पडलेल्या बैलाला अग्निशामक दलाच्या जवानांनी वाचवले.

पणजीत 8 इंच पाऊस
पणजीमध्ये मागील चोवीस तासांत उच्चांकी 7.98 इंच पावसाची नोंद झाली आहे. मागील 50 वर्षांतील जून महिन्यातील पावसाची उच्चांकी दहावी नोंद आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. 12 जून 1999 ला 14.43 इंच, 16 जून 1992 ला 13.81 इंच आणि 15 जून 1996 ला 13.5 इंच अशी उच्चांकी पावसाची नोंद झाली होती.

नव्या झुआरी पुलावर पाणी साचले
नवीन झुआरी पुलावर पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू होती. पुलावरील पाण्याचा निचरा होत असल्याने ही समस्या निर्माण झाली होती. या पाण्याचा सर्वाधिक त्रास दुचाकीचालकांना झाला. मोठ्या गाड्या आल्यानंतर उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्याने दुचाकीचालक अक्षरश: भिजून गेले.

पणजी स्मार्ट सिटीवरील कोट्यवधींचा खर्च पाण्यात
पणजी शहरातील विविध भागांत स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून विकासकामे राबविण्यात आली आहेत. त्यामुळे यावर्षी पणजी शहर पाण्याखाली जाणार नाही, अशी अपेक्षा नागरिक बाळगून होते; मात्र पहिल्याच पावसात पणजी शहर पावसाच्या पाण्याखाली गेल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे. विकासकामांवर खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.