जोती-सावित्री एक विचारधारा

0
167
  • देवेश कु. कडकडे
    (डिचोली)

सावित्रीबाईंनी समाजाला दिलेले आचार, विचार, त्यांनी जपलेली संस्कृती, संस्कार, माणुसकी आत्मसात करणे हे आजच्या समाजासाठी आवश्यक आहे. जोती-सावित्री होत्या म्हणून आजच्या स्त्रिया समाजात स्वावलंबी बनून मोठ्या निर्धाराने विद्याविभूषित, उच्च पदस्थ होऊन देशाची सेवा करतात आणि सार्वजनिक क्षेत्रात मानाने जगतात.

जानेवारी महिना हा नव्या वर्षाच्या सुरुवातीचा महिना अशी ओळख असण्याबरोबर विविध कारणांसाठी महत्त्वाचा आहे. या महिन्यात भारताच्या संविधानावर शिक्कामोर्तब होऊन आपल्या देशाला गणतंत्र देश म्हणून घोषित करण्यात आले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तीन तत्त्वांवर या संविधानाचा ढॉंचा उभा आहे. धर्म, वर्ण, जात, पंथ, लिंग असा भेद न करता सर्वांना समान अधिकार देण्यात आला. १७० वर्षांपूर्वी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करण्यासाठी दोन आभाळाएवढ्या विचारांच्या माणसांनी स्त्री शिक्षणाच्या दिशेने एक पाऊल टाकले. सावित्रीबाईंशिवाय महात्मा जोतिबा फुले अपूर्ण आहेत, तसेच जोतिबांच्या पाठिंब्याशिवाय सावित्रीबाईंचे कार्य पूर्ण होऊच शकत नाही. अपूर्णत्वातून पूर्णत्वाकडे जाणार्‍या एका संघर्षाचा इतिहास हा फुले दांपत्याचा आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याचा उहापोह करताना त्यांचा जोती-सावित्री असाच उल्लेख केला जातो. या जानेवारी महिन्यात सावित्रीबाईंचा जन्म झाला. अठराविश्‍वे दारिद्—यात खितपत पडणार्‍या, अज्ञानाच्या अंधारात गटांगळ्या खाणार्‍या, वर्णव्यवस्थेच्या चौकटीत बंदिस्त असलेल्या, अडलेल्या नडलेल्यांना, शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या सर्व दीनदलित शोषित समाजाच्या स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली केली. १ जानेवारी १८४८ साली जोती-सावित्रीने पुण्यात भिडे वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली आणि सावित्रीबाईंनी देशातील पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका बनण्याचा बहुमान मिळवला. विविध समाजातील लोकांना त्यांनी बुद्धीवंतांच्या पंक्तीत बसवण्याचे कार्य केले. समाज सुधारला पाहिजे, शिक्षित झाला पाहिजे, समाजाची प्रगती झाली पाहिजे, तर आधी स्त्री शिकली पाहिजे. स्त्रीचे शिक्षण हे किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी पटवून दिले.

सावित्रीबाईंनी शिक्षणाशी आपले घट्ट नाते बांधले, कारण शिक्षण हे मनुष्याला त्याच्या मनुष्यत्वाची ओळख करून देते. त्याच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करते त्यांनी भिडे वाड्यात सहा मुलींच्या हातात पाटी-पेन्सिल देऊन त्यांना शिकवण्यास प्रारंभ केला. या मुलींपैकी चार ब्राह्मण, एक मराठा आणि एक धनगर समाजाच्या होत्या, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. कारण फुले दांपत्य हे काही एका समाजाची मक्तेदारी नसून त्यांनी सर्व समाजासाठी कार्य केले आणि सर्व समाजातील व्यक्तींनी त्यांना या कार्यात सहकार्य दिले आहे. महात्मा फुलेंनी आपल्या ध्येयपूर्तीची सुरुवात आपल्या घरातून केली. त्यांनी आपल्या धर्म पत्नीला प्रथम शिक्षणाच्या प्रवाहात आणले. सावित्रीबाईंनी आपले शिक्षण घेतले ते निसर्गाच्या सान्निध्यात. चार भिंतींआडच्या फळ्यावर धडे न गिरवता काळी माती, धरणी माय यांचा त्यांनी फळा म्हणून वापर केला. गवताची पाती, काड्या त्यांच्या लेखणी बनल्या. धरणी मातेच्या फळ्यावर त्या अक्षरे गिरवू लागल्या. हातात दगड, धोंडे घेऊन बेरीज-वजाबाकी मांडत त्या गणित शिकल्या. जीवनावश्यक तत्त्वज्ञान त्या निसर्गाच्या सान्निध्यात शिकल्या. त्या स्वत: शिक्षित झाल्या आणि इतर स्त्रियांना शिकवण्यास सज्ज झाल्या. मुळात स्त्री शक्ती आहे आणि ती शिक्षित झाल्यावर ती कुळाचा नाश करेल, त्यांचे संसाराकडे दुर्लक्ष होईल, तिला लवकर विधवापण येईल, अशी तत्कालीन समाजाची भ्रामक कल्पना असताना ती झुगारून इथली स्त्री शिकली पाहिजे हाच उदात्त हेतू होता. त्यावेळी त्यांची धर्मद्रोही, घरबुडव्या म्हणून हेटाळणी झाली. त्यांच्यावर दगड, शेण, चिखल मारला तरीही त्यांनी आपले ध्येय सोडले नाही. काळाला आव्हान देणार्‍या प्रवासात त्यांची वाट सुद्धा अपमान, छळ आणि काट्याकुट्यांनी भरली होती. जोतिबा एका वर्षाचे असताना त्यांच्या मातेचे निधन झाले, तेव्हा त्यांची मावस बहीण सगुणाबाईंनी त्यांना मातेचे प्रेम देऊन त्यांचा सांभाळ केला. सगुणाबाईंनी जोतिबांच्या शिक्षणावर भर दिला, तसेच सावित्रीबाईंनी शिकावे यासाठी प्रोत्साहन दिले. याच सगुणाबाई सावित्रीबाईंसोबत मुलींना शाळेत मोफत शिकवू लागल्या. ज्या ज्या माणसांनी सावित्रीबाईंच्या विचारांची कास धरली ती माणसे ग्रामपंचायतीचे पंच बनण्यापासून राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचले.
सावित्रीबाईंनी रुजविलेल्या एका विचारातून आपल्या देशात राष्ट्रपती प्रतिभा पाटील, ऐश्‍वर्या राय सारखी विश्‍वसुंदरी, तर लता मंगेशकर यांच्या सारख्या गानकोकिळा घडल्या. मुलींचे केवळ शिक्षण झाले पाहिजे असे नव्हे, तर त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणासोबत अनेक स्त्रियांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडविण्यात योगदान दिले. एखाद्या विधवा स्त्रीला अथवा कुमारिकेला चुकून गर्भ राहिला, तर त्या आपले पाप म्हणून जीव द्यायच्या. अशा ३२ स्त्रिया आणि त्यांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी बाल हत्या प्रतिबंध केंद्राची स्थापना केली. त्यातील एका मुलाला यशवंतरावांना दत्तक घेऊन डॉक्टर बनवले. विधवा विवाहाला प्रोत्साहन देऊन सती प्रथेला कडाडून विरोध केला. विधवेची केशवपन ही प्रथा बंद पाडण्यासाठी जोती-सावित्री यांनी नारायण लोखंडे यांच्या सहकार्याने सर्वप्रथम न्हाव्यांचा संप घडवून आणला. महात्मा गांधींच्या ८५ वर्षा आधी त्यांनी सेवा मंडळाच्या माध्यमातून सूतकताई करून खादीचा पुरस्कार केला. १८७६-७७ साली जेव्हा पुण्यात दुष्काळ पडला, तेव्हा त्यांनी ब्रिटिश सरकारला शेतकरी, सामान्य लोकांना मदत करण्यासाठी स्त्रियांच्या आंदोलनाद्वारे भाग पाडले. सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने त्यांनी धर्मातील कर्मकांडांना नाकारत केवळ पती-पत्नी या दोघांनी एकनिष्ठेची शपथ घेऊन विवाह लावण्याची सुरुवात केली. फुले दांपत्याने आधुनिक भारतातील पहिला आंतरजातीय विवाह लावला. सावित्रीबाई या आधुनिक काळातील पहिल्या कवयित्री होत्या. त्या उत्कृष्ट वक्त्या होत्या. त्यांची अनेक भाषणे उपलब्ध आहेत. त्यांच्या कविता समाजाला जगायला शिकवतात. दुसर्‍यावर प्रेम करायला शिकवतात, अंधश्रद्धेवर प्रहार करतात.
‘विद्या हे धन रे श्रेष्ठ सार्‍या धनाहून,
त्याचा साठा जयापाशी तो ज्ञानी मानावा’
अशा कविता त्यांनी लिहिल्या. जोतिबांनंतर त्या सत्यशोधक समाजाच्या अध्यक्ष बनल्या. जोतिबांच्या पश्‍चात त्यांच्या जीवनात अनेक संकटांनी पिच्छा पुरवला. मात्र, आपले ध्येय, कार्य याला बाधा येऊ न देता अधिक नेटाने पुढे नेले. सावित्रीबाई फुलेंचे नाव आधुनिक शिक्षणाच्या शिल्पकार म्हणून भारताच्या इतिहासात नोंदवले गेले आहे. त्यांच्या विचारांमुळेच आजची भारतीय स्त्री ताठ मानेने वावरत आहे. ती विविध बंधनातून मुक्त झाली आहे. सावित्रीबाईंनी समाजाला दिलेले आचार, विचार, त्यांनी जपलेली संस्कृती, संस्कार, माणुसकी आत्मसात करणे हे आजच्या समाजासाठी आवश्यक आहे. जोती-सावित्री होत्या म्हणून आजच्या स्त्रिया समाजात स्वावलंबी बनून मोठ्या निर्धाराने विद्याविभूषित, उच्च पदस्थ होऊन देशाची सेवा करतात आणि सार्वजनिक क्षेत्रात मानाने जगतात. सावित्रीबाईंच्या कार्यातून प्रेरणा घेऊन अनेक संस्था, विद्यालये, महाविद्यालयात नवीन नवीन सामाजिक उपक्रम राबवले जातात. स्त्रीला माणूस म्हणून उभे करणे, त्याची जाणीव समाजाला करून देणे हे अवघड कार्य जोती-सावित्रीने केले. जोती-सावित्री यांची विचारधारा समाजापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.