जोकोविच अंतिम फेरीत

0
160

>> केनिनने बार्टीला नमविले, मुगुरुझाचा हालेपला धक्का

सर्बियाच्या अव्वल मानांकित व विद्यमान विजेत्या नोवाक जोकोविच याने स्वित्झर्लंडचा दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर याचा सरळ तीन सेटमध्ये ७-६ (१), ६-४, ६-३ असा पराभव करत आठव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. टेनिस सँडग्रॅन याच्याविरुद्धचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना खेळताना फेडररच्या जांघेला दुखापत झाली होती. त्यामुळे बुधवारच्या सराव सत्रात फेडरर सहभागी झाला नव्हता. त्यामुळे जोकोविचचा विजय अपेक्षित होता.

महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धक्कादायक निकालाची नोंद झाली. १४व्या मानांकित अमेरिकेच्या सोफिया केनिनने ऑस्ट्रेलियाच्या अव्वल मानांकित ऍश्‍ले बार्टीला ७-६ (५), ७-५ असा धक्का देत अंतिम फेरी गाठली. या पराभवामुळे ही स्पर्धा जिंकणारी यजमान देशाची ४२ वर्षांतील पहिली खेळाडू होण्याचा विक्रम बार्टी नोंदवू शकली नाही. १९७८ साली ख्रिस ओनल हिने अमेरिकेच्या बेट्‌सी नेगलसन हिचा ६-३, ७-६ असा पराभव करत ही मानाची स्पर्धा जिंकली होती. २३ वर्षीय केनिन ही सेरेना विल्यम्सनंतर अमेरिकेची क्रमांक दोनची खेळाडू असून या सामन्यापूर्वी बार्टीविरुद्ध तिचा रेकॉर्ड १-४ असा खराब होता. पण, केनिनने इतिहास विसरून आपल्या ‘फोरहँड’ अस्त्राचा चतुराईने वापर करत बार्टीला निष्प्रभ केले.

विंबल्डन विजेती सिमोना हालेप व माजी फ्रेंच ओपन विजेती गार्बिन मुगुरुझा यांच्यातील सामना रंगतदार झाला. परंतु, जागतिक क्रमवारीत ३२व्या स्थानावर असलेल्या स्पेनच्या मुुगुरुझाने तिसर्‍या स्थानावरील व चौथ्या मानांकित रोमानियाच्या सिमोना हालेपला ७-६, ७-५ असा बाहेरचा रस्ता दाखवला.

भारताचे आव्हान आटोपले
भारताच्या रोहन बोपण्णाला मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. बोपण्णा व युक्रेनची त्याची जोडीदार नादिया किचेनोक यांना पाचव्या मानांकित निकोला मेकटिच व बार्बरा क्रेसिकोवा यांनी ६-०, ६-२ असे केवळ ४७ मिनिटांत हरविले.