योगसाधना- 637, अंतरंगयोग- 223
- डॉ. सीताकांत घाणेकर
दैव ही देवापेक्षा जास्त प्रभावी शक्ती आहे. या अशा परिस्थितीत मानवाच्या हातात काही गोष्टी आहेत, त्यांचा सखोल विचार व चिंतन करणे आवश्यक आहे तरच वर्तमान जीवन सुखी-समाधानात जाईल.
विश्वातील प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या प्रारब्धाप्रमाणे जन्म घेत असते. प्रारब्ध हे संचिताप्रमाणे व संचित हे क्रियमाणाप्रमाणे घडत असते. त्यामुळे प्रारब्धात जसे घडायचे असते तसे ते घडतच राहते. जीवनात विविध तऱ्हेच्या घटना- चांगल्या व वाईट, सुखदायक व दुःखदायक घडतच राहतात.
शास्त्रकार म्हणतात की हे त्रिकालाबाधित सत्य आहे. स्वतः देवदेखील त्यात हस्तक्षेप करीत नाही. कारण दैव भगवंत बदलू शकत नाही. काहीजण सांगतात की दैवाला दोन मात्रा आहेत व देव शब्दाला एक मात्रा आहे. त्यामुळे दैव ही देवापेक्षा जास्त प्रभावी शक्ती आहे. या अशा परिस्थितीत मानवाच्या हातात काही गोष्टी आहेत, त्यांचा सखोल विचार व चिंतन करणे आवश्यक आहे तरच वर्तमान जीवन सुखी-समाधानात जाईल.
- कर्मफळाचा फायदा अगदी स्पष्ट आहे. जैसे कराल तैसे भराल! आंबे लावले तर आंबेच खायला मिळतील. काजू लावले तर काजू आणि काटेरी वृक्ष लावले तर काटेच मिळतील. त्यामुळे स्वतःच्या प्रारब्धाला व्यक्ती स्वतःच जबाबदार असते याची स्पष्ट जाणीव दर व्यक्तीने ठेवावी.
आपण भगवंताकडे प्रार्थना करायची असते- सुखात व यशात अहंकार वाढू देऊ नकोस व दुःखात व अपयशात मला आत्मशक्ती दे, म्हणजे मी समस्यांना सहज सामोरे जाईन व त्यावर योग्य उपाय काढीन. पण हे उपायदेखील भगवंताने सुचवायला हवेत. कारण त्याला तिन्ही काळाचे- भूत, वर्तमान, भविष्याचे ज्ञान असते. त्यासाठी इथे हवे ते म्हणजे संपूर्ण भावपूर्ण समर्पण! - वर्तमान जन्माचे फळ माझ्या हातात नाही, कारण ते भूतकाळातील कर्मांवर आधारित असते. पण भविष्यकाळातील प्रारब्ध वर्तमानातील कर्मावर आधारित आहे. म्हणजेच आपले भविष्यातील जन्म सुखदायक जावेत यासाठी मलाच आता सत्कर्म करावे लागेल. त्यासाठी भगवंताकडे आपण भावपूर्ण प्रार्थना करू शकतो- सद्बुद्धी देण्याची.
कर्माचे हे दोन्ही सिद्धांत एवढे मोहक व मार्गदर्शक आहेत की ज्या व्यक्ती त्याप्रमाणे विचार, चिंतन व कर्म करतील त्यांना स्वतःच्या जीवनात कसलीही चिंता करायची गरज नाही. संपूर्ण समर्पण हा एकच मंत्र आहे.
भारतीय साहित्यात अशी पुष्कळ उदाहरणे आहेत जी अत्यंत बोधदायक आहेत. उदा. 1) हनुमान श्रीरामाला समर्पित- त्याच्या छातीत म्हणजे हृदयात तर राम-सीतेचे दर्शन घडते.
2) थोर धनुर्धर अर्जुन. त्याने तर स्वतः भगवंताकडे आपल्या रथाचा सारथी बनण्याची नम्र मागणी केली. त्यामुळे अर्जुन कौरवांच्या बलाढ्य सैन्याशी लढताना अगदी आत्मविश्वासाने लढत होता. निद्रावस्थेत म्हणे त्याच्या तोंडून ‘श्रीकृष्ण श्रीकृष्ण’ असा ध्वनी निघत होता. 3) महासम्राज्ञी द्रौपदी. पाच शूर पांडवांची पत्नी. पण वस्त्रहरणावेळी जेव्हा तिला ज्येष्ठांकडून व पतींकडून तिची अब्रू वाचवण्यासाठी प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा तिने दोन्ही हात वर करून आर्द्रस्वराने श्रीकृष्णाला स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी विनंती केली. द्रौपदी तर श्रीकृष्णाची मानलेली बहीणच होती. एका क्षणात श्रीकृष्ण तिच्या मदतीला पोचले.
आमच्या बालपणी आजी वस्त्रहरणाची घटना सांगताना म्हणत होती ः
भरजरी गं पीतांबर दिला फाडून
द्रौपदीशी बंधू शोभे नारायण
ही घटनाच अत्यंत भावपूर्ण आहे. शेवटी भगवंतदेखील भावाचाच भुकेला आहे.
सारांश एकच- जीवनाचे तत्त्वज्ञान समजून भाव व भक्तीपूर्ण समर्पण आवश्यक आहे.
शेवटी जीवनात प्रत्येक व्यक्तीला एक भूमिका असते. प्रारब्धाप्रमाणे ती भेटत असते. हे तत्त्वज्ञान प्रत्येकाला समजायला हवे व मिळालेली भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे व प्रभावीपणे निभावणे गरजेचे आहे.
एका महापुरुषाने सांगितलेली गोष्ट आठवते- लहानपणापासून नाटकात काम करायची त्याला भारी हौस. त्यामुळे शाळेमध्ये त्याला एकापेक्षा जास्त भूमिका मिळायच्या.
एका कार्यक्रमात म्हणे त्याला दोन विविध भूमिका मिळाल्या. पहिली भूमिका राजाची. सिंहासनावर ऐटीत बसायचे व सर्वांना हुकूम सोडायचे. आजूबाजूला शिपाई, प्रधानमंत्री, सेनापती व इतर सर्व मोठमोठे अधिकारी. नाटक छान रंगले. राजाची भूमिका चांगली झाली. क्षणाक्षणाला टाळ्यांचा कडकडाट झाला. अशावेळी नटाच्या मनाची अवस्था कशी असेल?
त्यानंतर लगेच दुसरे नाटक सुरू. त्यात त्याला भूमिका होती सावकाराच्या नोकराची. कपडे लगेच बदलून त्याचा रंगमंचावर प्रवेश झाला. सावकार उच्च आसनावर व ही व्यक्ती मान खाली घालून हात जुळवून नम्रपणे उभी. सावकाराने नोकराला काही हुकूम द्यायला सुरुवात केली. याची राजाची खुमारी काही अजून उतरली नव्हती. त्याला राग आला. प्रत्युत्तर देणार एवढ्यात त्याला आठवण झाली की या नाटकात तो नोकर आहे. बक्षीस मिळायला हवे तर यावेळी ही भूमिका उत्कृष्ट वटवायला हवी! कुशल नट असल्यामुळे त्याने लगेच गरजेप्रमाणे स्वतःचे कर्तव्य बजावले. या त्याच्या भूमिकेलादेखील टाळ्या मिळाल्या. बक्षिसेदेखील मिळाली.
सारांश एकच- भगवंताने जी भूमिका दिली आहे ती उत्कृष्ट निभावणे! ती व्यवस्थित व्हावी म्हणून त्याच्याकडे सद्बुद्धी व मार्गदर्शन मागणे.
प्रत्येकाच्या संसारात विविध घटना घडतच असतात. घरात वेगवेगळ्या प्रकृतीच्या व्यक्ती असतात. त्यामुळे स्वतःला हवे तसे आपल्या कुटुंबात घडलेच असे नाही. त्यामुळे आपली भूमिका समजून जर प्रतिक्रिया न देता विचारपूर्वक वागलो तर घरातील शांतता चिरकाल टिकेल. हल्ली तर पिढी-पिढ्यांच्या विचारात पुष्कळ अंतर आहे व ते वाढतच आहे. त्यामुळे कुुटुंबात भांडणे, घटस्फोट, आत्महत्या वाढतच आहेत. उदाहरणे घेतली तर मुद्दा व्यवस्थित समजेल.
- काही व्यक्ती व्यवस्थित तर इतर अव्यवस्थित. समजा वडील सर्व गोष्टी व्यवस्थित जागेवर ठेवतात, पण मुलगा अव्यवस्थित आहे. त्यामुळे वडिलांना राग येणे साहजिक आहे. पण त्यांनी आपला मान राखून आपल्या भूमिकेप्रमाणे वागले व मुलाला व्यवस्थित समजावले तर मुलगा सुधारण्याची शक्यता वाढेल, नाहीतर भांडणेच होतील.
- पती-पत्नी दोघांना आपापल्या विविध कार्यक्रमांना जायचे आहे- सायंकाळी त्याचवेळी. प्रत्येकाला आपल्या भूमिकेची कर्तव्ये समजली व त्याप्रमाणे समजूतदारपणे बातचित करून तोडगा काढला तर घरात सहज शांती लाभेल. असे नाही की तथाकथित पुरुषप्रधान संस्कृतीत दरवेळी पुरुषांनाच प्राधान्य द्यायचे. प्रत्येकाने थोडी तडजोड करणे आवश्यक असते.
- सासूने एरव्हीप्रमाणे चांगले मिचमिचित जेवण बनवायचे ठरवले. त्याचवेळी सुनेचा विचार वेगळाच- उकडलेल्या भाज्या बनवायच्या. (हल्लीच्या काही सुना आरोग्यासंबंधी वेगळाच विचार करतात- अपवाद आहेतच.) अशावेळी दोघांनी आपापले विचार न लादता आवश्यकता बघून सुवार्ता केली तर घरातील शांती अबाधित राखता येईल. प्रत्येकाच्या घरात असे विविध प्रसंग वेळोवेळी येतच राहतात. अशावेळी देवाला समर्पित होऊन जर त्याने दिलेली भूमिका यथायोग्य पार पाडली तर सर्वांचे कल्याणच होईल. शेवटी तोच नाटकाचा खरा सूत्रधार आहे!