जैविक विविधतेचे पणजी मनपातर्फे ‘रोड मॅपिंग’

0
183

पर्यावरण चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
पणजीतील जैविक विविधता नष्ट होत चालली आहे, त्यादृष्टीने पणजी महापालिकेतर्फे ‘रोड मॅपींग’ करण्यात येणार आहे व आवश्यक झाडे लावली जातील, असे पणजी पालिका आयुक्त संजीत रॉड्रीग्स यांनी सांगितले. ‘कलाकृती’तर्फे कला अकादमीत आयोजित केलेल्या पर्यावरण चित्रपट महोत्सवाचे शुक्रवारी उद्घाटन झाल्यानंतर ते बोलत होते.
उद्घाटक या नात्याने ‘सॅक्युअरी एसिया’चे संपादक व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण कार्यकर्ते बिट्टू सेहगल उपस्थित होते. सेहगल बोलताना म्हणाले की, गोव्याच्या दृष्टीने निसर्गाचा विचार झाला पाहिजे. सेहगल म्हणाले, गोव्यात खाण उद्योग गरजेचा आहे पण कायदेशीररित्या तो चालला पाहिजे. पर्यावरणप्रेमी ऍड. सतीश सोनक, कलाकृतीच्या अध्यक्ष प्रेरणा माईणकर व्यासपीठावर उपस्थित होत्या.रोपट्यांना पाणी घालून उद्बोधकरित्या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. प्रेरणा माईणकर यांनी स्वागत केले. सुनीता रॉड्रीक्स यांनी सूत्रसंचालन केले. संस्कृती नाईक व सुखदा गावस यांनी म्हादई नदीवर नाटीका सादर केली. श्री सेहगल यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. लक्ष्मी भरणे यांनी आभार मानले.
चित्रपट महोत्सव आज व उद्या कला अकादमीत चालू राहणार आहे.
म्हादईवर चर्चा
म्हादईवर झालेल्या चर्चात्मक कार्यक्रमात श्री सेहगल यांनी सांगितले, की बेकायदेशीर खाणींवर दहा वर्षे बंदी घालायला हवी. नैसर्गिक संपत्तीला हानी पोचवून खाण व्यवसायाला उत्तेजन देता कामा नये. खारफुटीच्या झाडांचे रक्षण, जलस्त्रोतांचे रक्षण, आरोग्य व पर्यटन यासाठी नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करून गोवा हे चांगले उदाहरण म्हणून दाखविता येईल. पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी सांगितले की, म्हादईचे पाणी वळविण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार ज्या पध्दतीने करीत आहे पर्यावरणप्रेमींनी त्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे परंतु त्याचे उत्तर आलेले नाही. हरित लवादाकडे जाण्यासाठी आम्ही सरकारलाही मदत करू.